*बाजारपेठामध्ये चिल्लर टंचाई*
केत्तूर ( अभय माने) बाजारपेठामध्ये तसेच आठवडा बाजारामध्ये रोखीने व्यवहार करताना सुट्ट्या पैशांची टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत. अगोदरच वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठेत मंदीचे सावट सहन करीत असताना बाजारात , प्रवासात, किंवा दुकानात किरकोळ व्यवहार करताना सुट्टे पैसे नसल्याने अडचणी निर्माण होऊ लागले आहेत.
मध्यंतरी नोटबंदीनंतर 500, 200, 100, 50 रुपयांच्या नोटांची संख्या बाजारात वाढली असली तरीही 20, 10 रुपयांच्या नोटा मात्र अतिशय कमी प्रमाणात चलनात आणल्या गेल्या आहेत.(सध्या 5 रुपयाच्या नोटा तर गायब झालेल्या आहेत) त्यामुळे किरकोळ साहित्य खरेदी अथवा कोणताही व्यवहार करताना व्यापारी सुरुवातीला ग्राहकाकडे सुट्टे पैसे आहेत का ? अशी विचारणा व्यापारी करीत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा – अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पुनरागमनानिमित्त आनंदोत्सव
सुट्टे पैसे करण्यासाठी व्यापारी व ग्राहक इतरत्र फिरताना दिसत असून, नोटांना पर्याय म्हणून एक, दोन, पाच, दहा तसेच वीस रुपयांची नाणी वापरात आहेत परंतु येथेही टंचाई आहे. बँकेकडे सुट्ट्या पैशासाठी गेले असता तेथेही सुट्टे पैसे मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. सध्या व्यवहारात दहा वीस रुपयांच्या फाटक्या, जीर्ण झालेल्या नोटा चलणात असल्या तरी, या नोटा कोणीही घेत नाहीत त्यातच राष्ट्रीयकृत बँकाही जीर्ण झालेल्या व फाटक्या नोटा स्वीकारत नाहीत त्यामुळे वादावादी होत आहे. रिझर्व बँकेने फाटक्या व जीर्ण झालेल्या नोटा बँकांना सूचना कराव्यात व सर्वसामान्य नागरिकांची फरपट थांबवावी अशी मागणी होत आहे.