देवदर्शन करून येत असताना पुणे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ११ प्रवासी गंभीर जखमी
देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचा पुणे-सोलापूर महामार्गावरील मळद येथे अपघात झाला असून, या अपघातात ११ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आज सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील काशेवाडी येथील भाविक धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी गेले होते. येडेश्वरी देवीचे दर्शन घेतल्यानंतर तुळजापूर येथील तुळजा भवानी मातेचे दर्शन करून काशेवाडी येथील भाविकांची बस पुण्याच्या दिशेने परत निघाली होती. ही खाजगी ट्रॅव्हल्स बस पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मळद गावच्या हद्दीत उलटली. या बसमध्ये ५० प्रवासी होते. त्यापैकी ११ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातामध्ये जखमी झालेल्या १५ प्रवाशांना दौंड येथील पिरामीड हॉस्पिटलमध्ये तर ५ प्रवाशांना भिगवण येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी दौंडचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, सहायक फौजदार शंकर वाघमारे, किरण शिंदे, आबा शितोळे, राजू भिसे व पाटस टोलनाक्याच्या पेट्रोलिंग पथकाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य केले. घटनास्थळी दौंड व कुरकुंभचे पोलिस पोहोचले आहेत. जखमींना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले आहे.
Comment here