जेऊर येथील भारत महाविद्यालयास नॅक कडून बी प्लस मानांकन
करमाळा( प्रतिनिधी);
जेऊर ता. करमाळा येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत महाविद्यालयास बेंगलोर येथील नॅशनल ॲसेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन कौन्सिल (नॅक) या संस्थेने भेट देऊन महाविद्यालयाच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली. या संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महाविद्यालयास बी प्लस मानांकन प्राप्त झाले आहे.
नॅक समितीद्वारे गठीत करण्यात आलेल्या पिअर टीमचे अध्यक्ष कर्नाटक येथील कुवेंपु विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा.डॉ.टी मंजुनाथन् , समन्वयक म्हणून पश्चिम बंगालच्या रवींद्र भारती विद्यापीठाचे रजिस्ट्रार मा.डाॅ.सुबीर मैत्रा व उदयपूर (राजस्थान) येथील पी.जी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.रतन जोशी यांनी दिनांक १३ व १४ डिसेंबर रोजी भारत महाविद्यालयाचे मूल्यांकन केले. यावेळी नॅक पिअर टीमने भारत महाविद्यालयातील प्राध्यापकांची शैक्षणिक अर्हता, संशोधन कार्यातील प्रगती, अध्यापन,अध्ययन व मूल्यमापन यातील प्रगती, महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद, व्यवस्थापनाचे महाविद्यालयास असलेले सहकार्य आदी याबाबतीत समाधान व्यक्त केले.
भारत महाविद्यालयास फेब्रुवारी 2023 मध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ट्रिपल ए समितीकडून नुकतेच अ दर्जाचे मानांकन मिळाले आहे. नॅक समितीकडून आता बी प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. या संपूर्ण मूल्यांकन प्रक्रियेमध्ये अंतर्गत मूल्यमापन समितीचे समन्वयक म्हणून डॉ. रमेश पाटील यांनी काम पाहिले.
भारत महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष राजूशेठ गादिया, सचिव अर्जुनराव सरक, आदींनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
Add Comment