करमाळा तालुक्यातील त्या १३ कंत्राटी आरोग्य सेविका आजपासून बेमुदत संपावर
केम (प्रतिनिधी संजय जाधव); करमाळा तालुक्यातील कंत्राटी आरोग्य सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियन (आयटक) या संघटने अंतर्गत दिनांक 10 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन दिलेले आहे. या निवेदनानुसार आयटक संघटनेने राज्यव्यापी आंदोलन दिनांक १८ जुलै २०२३ पासून सुरू केले आहे.
मुंबई येथील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू असून या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अनेक कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे.
२००७ साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानांतर्गत राज्यामध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक झाली आज पंधरा वर्षे पूर्ण होऊनही या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कायम सेवेत सामावून घेतलेली नाही. गेल्या दोन वर्षात कोरोना सारख्या बिकट परिस्थितीत या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची परवा न करता राज्याला आरोग्य सेवा दिलेली आहे.
तरीही शासनाने या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केलेला नाही; तसेच औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांवर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे या निकालानंतर ही शासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही.
आयटक संघटनेने पुकारलेले ठिय्या आंदोलन हे राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी निर्णय ठरेल कारण दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येईल असे आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत बजेट सत्रात सांगितले होते.
शासनाच्या या आश्वासनाचा विसर शासनाला पडला असल्याने हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनास पाठिंबा मिळत आहे.
या आंदोलनात सहभागी होण्याकरिता करमाळा तालुक्यातील १३ आरोग्य सेविका मुंबईला रवाना झाल्या आहेत. संप आणि ठिय्या आंदोलनात सहभागी होण्याचे निवेदन पत्र तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती श्रद्धा भोंडवे यांना आयटक संघटनेच्या तालुकाध्यक्ष श्रीमती साधना चौधरी व सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिले.
यावेळी संघटनेतील आरोग्य सेविका श्रीमती केसकर व्ही. ए. ,होले एस.पी. , काशीद एम.ई ., शेळके आर.पी. , गायकवाड व्ही.डी. , भोसले पी.एम. , सुरवसे ए.बी. ,तळेकर ए.जी., पोतदार व्ही.बी. , मनेरी एच. बारस्कर एस. तसेच कुंकुले जी.एम. या हजर होत्या.
Add Comment