आम्ही साहित्यिक

********* आतल्या गाठीचा *********                      

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

********* आतल्या गाठीचा *********

                     

         इथं अजून एक सांगावसं वाटतं एक तर गाठ ही दोरीचीच असते आणि तसं बघायला गेलं तर गाठ शक्यतो सहज सुटते कधी गुंतागुंतीची वाटते काही गाठी ऐन टायमाला धोका देतात ते काही पण असू द्या गाठ कसली पण असू द्या आपण ती सोडवू… थोडा वेळ लागेल…पण नक्की सोडवू पण खरा प्रश्न उभा राहतो तो आतल्या गाठीची माणसं भेटल्यावर

        आम्ही अशी माणसं प्रत्येकाला आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये भेटत असतात म्हणजे बघा गावात… भावकीत…नात्यात…गल्लीत…राहतो त्या बिल्डिंगमध्ये… वरून गोड बोलणारे… आपापल्या ऑफिसमध्ये नाहीतर वर्कशॉप मध्ये… एक वेळ प्रतिस्पर्धी परवडले पण ही माणसं म्हणजे नुसता इच्चू… आपल्याकडून हसून ऐकणार आणि तिकडं रडून सांगणार आपल्या मनातलं हळूहळू सगळं काढून घेणार पण आपलं मात्र झाकून ठेवणार हा त्याचा दोष नाही हा दोष आहे त्याच्या दूषित विचाराचा त्याला आपण तरी काय करणार याला कोणतंच औषध लागू पडत नाही मी पाहिलयं काही साहेब लोकं इतक्या विचित्र स्वभावाचे असतात म्हणजे सर्वच क्षेत्रात बरं का ऑन ड्युटी बंगल्यावरची काम करून घेतात त्याला माहित असतयं ह्यो गडी बंगल्याची झाड लोट करतोय… बाईला गिरणीतनं दळण आणून देतोय…भाजीपाला आणून देतोय… परंतु प्रमोशनच्या नेमक्या टायमाला ह्याच्या हातात असून सुद्धा याच्याकडे लक्ष देत नाही ह्याला कोणती गाठ म्हणायची ह्याला एकच म्हणायचं झालं काम आणि हो लाम…असं त्यांचं तत्त्व असतयं आता प्रश्न आलायं दोरीच्या गाठीचा तर ही गाठ आता आपण सर्वसामान्यपणे बघू एका दोराचे किंवा नाडीचे टोक त्याच्या दुसऱ्या टोकाला आहे त्या वस्तूला घट्ट बांधून ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आणि गाठीचा इथंच जन्म झालायं 

         आता गाठी बांधण्याच्या अनेक पद्धती आहेत विजारीच्या नाडीची टोकं विशिष्ट पद्धतीने आवळून बांधली तर नाडी आपोआप सुटत नाही पण नाडीचं ठराविक टोक ओढलं तर नाडीची गाठ चटकन सुटते आणि याबाबतीत चिडचिड कवा होते जवा आपल्याला अर्जंट लागलेली असते आपण जातो पण अंडरवेअरची नाडी तिची गाठ काही केल्या लवकर सुटत नाही तवा आपण ती मोठ्या अविर्भावामध्ये जोराचा हिसका मारून तोडतो आणि आपण आलेल्या वेळेवर मत करतोय याचं समाधान मिळतं आता बघा विहिरीतून पाणी काढताना बादलीचा उपयोग करत असतो रहाटाच्या दोरीचं एक टोक बादलीच्या कडीमध्ये एका ठराविक पद्धतीने गुंतवलं जातं तर पाण्याच्या वजनाने दोरीची गाठ सुटत नाही परंतु गाठीतील दोरी एका विशिष्ट रीतीने मागे सरकवली तर गाठ लवकर सुटते गोठ्यातील गुरांना खुंटांना बांधून ठेवण्यासाठी दोराच्या गाठी बांधाव्या लागतात त्या गाठी योग्य पद्धतीने बांधल्या तर गुरांनी दोर ओढला तरी त्यांच्या मानेभोवती दोराचा फास बसत नाही या सर्व प्रक्रिया आपल्याला खरंतर शेतात नाहीतर मळ्यात बघायला मिळतात आता बघा या ज्या गाठी आहेत त्यांचा प्रत्येकाचा संबंध समाजात कोठे कोठे येतो अहो साधी गोष्ट आहे शेतावर जाताना घेतलेलं भाकरीचं गठुडं त्याची गाठ अफलातून आहे ती बसते सहज अन सुटते पण सहज बहुतेक तंबू उभे करताना बांधल्या जाणाऱ्या गाठी या विशेष असतात.

         जमिनीत रोवलेल्या खुंट्यांना जलद बांधाव्या लागतात याकरता सोयीस्कर होईल अशी एक विशिष्ट पद्धत ठरवलेली असते दोऱ्या या सुताच्या असतात फक्त दीड गाठ असते पण एकदम पक्की धक्क्यावरील माल जहाजावर चढवण्यासाठी वापरणाऱ्या दोरांना मालाच्या आकाराप्रमाणे किंवा प्रकाराप्रमाणे निरनिराळ्या पद्धतीने गाठी बांधाव्या लागतात गिर्यारोहक… बांधकाम करणारे कारागीर…कापड विणणारे कोष्टी…मासे धरणारे कोळी…पक्षी किंवा लहान लहान श्वापदे धरणारे शिकारी…अशा विविध धंद्यातील लोकांना त्यांच्या विशिष्ट पद्धतीप्रमाणे अनेक निरनिराळ्या गाठी बांधाव्या लागतात ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनाही फाडलेली त्वचा पुन्हा जुळवून सांधण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या गाठी टाक्याच्या रूपात माराव्या लागतात नेकटायची गाठ बांधणं तसं फार अवघड काम आता बघा मनाशी खूणगाठ बांधली असं आपण वारंवार ऐकतो तेव्हा असं म्हणायचं असतं की एखादी गोष्ट नक्कीच करणार किंवा करणार नाही म्हणजे मनाशी केलेली प्रतिज्ञा आपण त्या घट्ट गाठीच्या रूपात बघत असतो शेती किंवा पशुपालन क्षेत्रामध्ये बैलगाठ प्रसिद्ध आहे अशा शेकडो प्रकारच्या गाठी आहेत अगदी आदिमानवापासून गाठी मारण्याची कला विद्या विकसित झाली

         शिवण टिपण करण्याच्या आधीची कला म्हणजे गाठी मारणे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये गरजेनुसार गाठी बांधायची पद्धत आहे काही वेळा भेटवस्तू देताना रिबनच्या गाठी बांधाव्या लागतात त्या गाठीच मुळात आकर्षक असतात दोऱ्या वापरून गाठी मारणं आणि त्या उलगडणं हे एक शास्त्र आहे त्यांना वेगवेगळी नावं आहेत दोरी किंवा रस्सी कोणती वापरावी…जाडी किती असावी…लांबी किती असावी…साधं उदाहरण म्हैस बांधायची आणि मीटर भर सुतळी वापरतोय हाय का काय फायदा म्हणून दोरी घेण्याचं एक वेगळं शास्त्र मानावं लागेल आत्तापर्यंत आपण दोरीच्या गाठी बघितल्या इतरही गाठी असतात त्या योगायोगाने पडतात खरंतर स्वर्गात ठरलेल्या आणि इथं पृथ्वीतलावर बांधल्या जाणाऱ्या लग्नाच्या गाठी त्यांची एक संस्था म्हणजे वधू वर सूचक मंडळ फार मोलाचं कार्य करते

         आता बघा मी रिटायर झाल्यावर पेन आणि वही घेतली काय लिहावं सुचत नव्हतं एके दिवशी एका जुन्या मित्राचा फोन आला तसे जीवनात हजारो लाखो जीवाला जीव देणारे मित्र भेटले पण तो मित्र माझ्या सातवीच्या वर्गातला म्हणजे आम्ही दोघांनी किशोरवयीन काही काळ संगतीनं घालवला होता लहानपणीचा सगळा नकाशा डोळ्यासमोर उभा राहिला आणि मग विचाराला चालना मिळाली बालपणाचे दिवस आठवले एखादी गोष्ट उपलब्ध झाली नाही तर केलेली ऍडजेस्टमेंट म्हणजे रानात गेल्यावर स्लीपरचं पुढचं अंगठा अडकवायचं बंध तुटलेलं असल तर काय करायचं नाही तर अनवानी गेल्यावर दोन-चार काटे पायाला फणका देणारच नाहीतर उन्हामुळं पाय पोळणार बरं ही पडलं खेडंगाव तिथं कुठलं आलयं लगेच बंध मिळायला ताबडतोब बाभळीचा काटा त्याला खालून आडवा लावला चला काम चालू अशा काही आठवणींचा…पाहिलेल्या…अनुभवलेल्या…ऊन सावलीची…आठवण लिहायला लागलो माझी पडली ग्रामीण भाषा लोकांनी मी लिहिलेले लेख डोक्यावर घेतले आणि माझी आणि एका लेखकाची योगायोगाने गाठ पडली

……………………………………………………..

किरण बेंद्रे

 पृथ्वी हाइट्स… कमल कॉलनी… पुणे

 7218439002

litsbros

Comment here