आम्ही साहित्यिककरमाळा

******* पालखी अन छबीना *******

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

******* पालखी अन छबीना *******


आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काही विषय असे आहेत की आवर्जून कोणी या विषयाकडे पाहत नाही घड्याळाच्या काट्याप्रमाणे जो तो रात्रंदिवस धावत असतो आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये व्यस्त असतो असाच एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पालखी मग तो छबिना असो किंवा पालखी सोहळा दिंडी सोहळा असो खरंतर हा लेख पूर्वी मी लिहिलेला लेख आहे वारीच्या सहवासात आणि मी जवळून पाहिलेला वारकरी संप्रदाय यामध्ये पालखीचा ओझरता उल्लेख केलेला आहे पण पालखी विषय हा विशेष असा सखोल असल्यामुळे मी लेखांमध्ये जास्त मांडू शकलो नाही.


आता राहिला विषय पालखी का छबिना दोन्ही मध्येही भगवंताचे अधिष्ठान पण पालखी म्हटलं तरी एका अर्थाने संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर माऊली संत एकनाथ महाराज अशा विविध अवतारी संत मंडळींच्या पालख्या ज्या ठराविक दिवस किंवा कालावधीमध्ये आपल्या मूळ स्थानापर्यंत जाण्यासाठी आतुर झालेल्या त्या जगजेठीच्या दर्शनासाठी अतुर झाल्यामुळे लागलेली एक अविरत ओढ हा सोहळा ठराविक दिवस नित्यनेमाने चालत असतो पण ज्यावेळी ग्रामदेवतेची यात्रा असते त्या महत्त्वाच्या दिवशी रात्रीच्या वेळी ग्राम प्रदक्षिणा म्हणजे पालखी घेऊन मिरवणुकीच्या व आतषबाजीच्या झगमगटात काढली जाते ती मिरवणूक त्याला आपण छबिना म्हणतो तर पालखी आणि छबिना हा खांद्यावर घेण्यासाठी ठराविक व्यक्तीचाच एक मान असतो आपल्या गावच्या जत्रेमध्ये छबीना तमाशा आणि कुस्तीचा फड असल्याशिवाय जत्रा साजरी केल्याचं समाधान मिळत नाही.


अन विठू माऊलीच्या भेटीसाठी निघालेली पालखी तो समुदाय म्हणजे दिंडी पंढरपूरला गेल्यावर जाताना ऊन पाऊस कितीतरी अडचणीवर मात करून केव्हा एकदा त्या विठूला पाहतोय एक अनामिक ओढ असते भगवंताचे दर्शन काही वेळेस कांही मंडळींना दहा-बारा तास रांगेत उभे राहून घेणं शक्य नसतं ते नुसते मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन धन्यता मानतात दोन्ही कानाच्या पाळ्या धरून भक्तीच्या आनंदामध्ये दोन चार उड्या मारून जीवनातला आनंद पाहतात अलीकडच्या काळात देवतांच्या मूर्ती वाहून नेण्यासाठी मुख्यता पालखीचा उपयोग करतात खेडेगावांमधून ग्रामदेवतेची जत्रा भरवतात तेव्हा उत्सव मूर्तींना पालखीमध्ये ठेवून त्यांची गावातून मिरवणूक काढतात देव देवता… धर्मगुरू…श्रीमंत…सरदार…इत्यादींना खांद्यावर वाहून नेण्याचं एक साधन वाहन म्हणजे पालखीला शुद्ध मराठीमध्ये मेणा तर संस्कृत मध्ये शिबिका किंवा आंदोलीका असे म्हणतात

मेणा हा शब्द प्रामुख्याने सन्माननीय व्यक्तीला वाहून न्यायच्या साधनालाच लावलेला दिसतो पूर्वी मेण्याचा उपयोग पडदासीन स्त्रिया म्हणजे घोशातील घरंदाज स्त्रियांसाठी करायचे प्राचीन काळापासून पालखीचे अनेक प्रकार रूढ होते वारकरी संप्रदायातील लोक आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जातात त्यावेळी ते आपल्याबरोबर संतांच्या पादुकांच्या पालख्या वाहून नेतात महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतामध्ये अनेक श्रेष्ठ भक्त होऊन गेले या भक्तांची समाधी स्थळे भिन्नभिन्न ठिकाणी आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या संतांच्या पादुका घेऊन पालख्या पंढरपूरला जातात त्यांच्याबरोबर भजन कीर्तन करीत हजारो वारकरी जातात पालखीचा सोहळा एक महाराष्ट्राचं वैभव आहे खरंतर पालखी ही लाकडाची असते साधारण तिला मागे व पुढे एक किंवा दोन दांडे असतात मागेपुढे एक एक अथवा दोन दोन व्यक्ती खांद्यावर दांडी घेऊन पालखी वाहतात दांड्याच्या टोकांना हत्ती वाघ घोडे इत्यादी प्राण्यांची लाकडात कोरलेली किंवा धातूची तोंडं बसवलेली असतात
वर रेशमी छत…. जरीचे गोंडे…मखमली बसण्याचं स्थान…मूर्ती किंवा पादुका ठेवण्याची मखमली जागा इत्यादींनी पालखी सुशोभित करतात वृद्ध अपंग पायी फार चालू न शकणाऱ्या व्यक्तींना डोंगराळ किंवा खडकाळ प्रदेशामध्ये वाहून नेण्यासाठी पालखी सारख्या डोली अथवा कावडीचा वापर करतात आणि दुसरीकडे एक वेगळी म्हणजे पालखी हे जुने ऐतिहासिक वाहतुकीचे साधन लाकडापासून बनवलेला एक प्रकारचा आच्छादलेला कक्ष ज्यामध्ये बसण्याची सोय असते त्याला समोर व मागे जाड दांडा असतो कक्षामध्ये माननीय किंवा आदरणीय व्यक्ती बसते पालखी मग दोन व जास्त व्यक्तीद्वारे दांड्यास धरून उचलली जाते मुळ इच्छित स्थळी नेतात राजे राजवाडे यांच्या काळात ते पालखीतून प्रवास करायचे राजाची पालखी फारच सुशोभित राहत होती हिरे माणिक मोती जडवलेले सोन्याचे बाह्य आवरण असलेल्या पालख्या पूर्वी असायच्या त्यावर उत्तम कारागिरी कलाकुसर केलेली असायची त्याला रेशमी गोंडे लावलेले असायचे पालखीतून जाणारा इसम व व्यक्ती बहुमानास म्हणजे आदरास पात्र असायचा
महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा म्हणजे धार्मिक परंपरेचा मान असा भागवत संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाच्या पालख्या अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला जातात आषाढी एकादशीला सर्व भक्तगण पंढरपूरला विठोबा रखुमाईचे दर्शन घेतात व द्वादशीला आपापल्या गावी परततात दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबर ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू संत सोपान देव यांची पालखी ही सासवडहून पंढरपूर कडे रवाना होते महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे सोहळ्यामध्ये रंगलेल्या भक्तांना वारकरी म्हणतात वारकरी हा भक्तीमध्ये गुंग सदाचारी निर्व्यसनी असतो अशी श्रद्धा आहे विशेषता गळ्यामध्ये तुळशी माळा घालून कपाळी केशरी रंगाचा टिळा लावल्यामुळे माळकरी म्हणजेच वारकरी सात्विक असतात एवढे मात्र खरे
पालखी बरोबर मानाचा अश्व…पालखी… अब्दागिरी… ध्वज…छत्र…चामरं…दंड… ही मानाची बिरूदे मिरवली जातात गावोगावी या पालख्यांचे सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकाकडून भव्य स्वागत होते नारळ हार फेटा पागोटे शाल इत्यादी वस्तू त्या त्या दिंडेकर्‍यांना देऊन त्यांचा मान व आदर सत्कार केला जातो आता पालखी संदर्भात अजून बोलायचं झालं तर कोकणातला शिमगा म्हणजे सगळ्याच चाकरमानी लोकांच्या हृदयातला हळवा कोपरा कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरीही होळी आणि गणपतीच्या सणाना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात घरट्याच्या बाहेर उडालेल्या पिल्लांची जशी पक्षीण वाट पाहते तसंच गावं गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पाहत असतात
तर कोकणातला शिमगा म्हटल्यावर डोळ्यासमोर येते पालखी मात्र या पालखीमध्ये शिमग्याच्या उत्सवामध्ये विराजमान होते ती सगळ्यांच्या मनातली ग्रामदेवता आणि शिमग्याचं आकर्षण असतं ते ग्रामदेवतेच्या पालखीचं शिमग्याला म्हणजेच होळीला कोकणात पालखी नाचवायची अनोखी परंपरा आहे सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कोकणामध्ये होळीला सुरुवात होते ग्रामसेवतेला सजवून पालखीत ठेवले जाते. ग्रामदेवता गावातील प्रत्येकाच्या घरी जाते अशी प्रथा आहे खरोखरच आता व्हिडिओ शूटिंगचं फॅड निघालयं पहिलं डोळ्याच्या कॅमेरात ही दृश्य व देखावे कैद करून साठवले जायचे आणि निवांत बसल्यावर एक सिंहावलोकन सारखं म्हणून ते सारं आठवायचं मनात रुंजी घालायचं त्या आठवणीत हरवून जायचं हाच काय तो व्हिडिओ होता

किरण बेंद्रे … … …
थेट कमल कॉलनीतून… पुणे ll
7218439002

litsbros

Comment here