करमाळा तालुक्याला कुकडी प्रकल्पाची 2 आवर्तने मिळणार; तिसरे आवर्तन मिळवण्यासाठीही आपण प्रयत्नशील; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती, वाचा सविस्तर
करमाळा (प्रतिनिधी); कुकडी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक काल दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी व्ही . व्ही.आय.पी सर्किट हाऊस पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
सदर बैठकीमध्ये कुकडी प्रकल्पाची 2 आवर्तने अनुक्रमे डिसेंबर आणि मार्चमध्ये सोडण्याचे निश्चित झाले असून मे महिन्यामध्ये तिसरे आवर्तन मिळावे, अशी आपली आग्रही मागणी असल्याची माहिती करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, डिसेंबर मध्ये 15 डिसेंबर 2023 ते 23 जानेवारी 2024 असे आवर्तन प्रस्तावित असून दुसरे आवर्तन 1 मार्च 2024 ते 9 एप्रिल 2024 अशी 2 आवर्तने प्रस्तावित असून आपण तिसरे आवर्तन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच डिसेंबर मध्ये सुरू होणाऱे आवर्तन 15 डिसेंबर ऐवजी 1 डिसेंबर पासून सुरु करावे अशी आपली मागणी आहे.
सदर आवर्तन टेल टू हेड मिळणार असून करमाळा तालुक्याला 13 दिवस सलग पाणी मिळणार आहे.या पाण्याचे मोजमाप करत असताना करमाळा तालुक्याला पाणी पोहोचल्यानंतरच त्याचे दिवस मोजण्यात येतील अशी माहिती ही त्यांनी दिली.
यावेळी यावेळी सहकार मंत्री मा. ना.दिलीप वळसे पाटील ,मा.आ. रोहित दादा पवार , मा.आ.संजयमामा शिंदे व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
Comment here