‘थू-थू आंदोलनाच्या’ पार्श्वभुमीवर आळजापूर येथे शेतकरी ऊस उत्पादकांची बैठक संपन्न
संपुर्ण तालुक्यामध्ये बैठकांचे सत्र सुरु….
करमाळा (प्रतिनिधी):
करमाळा येथे २८ नोव्हेंबर रोजी बोंबाबोब आंदोलन झाल्यानंतर, आता मकाई कारखान्यातील थकीत ऊस बिलासाठी दशरथआण्णा कांबळे, प्रा. रामदास झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ॲड, राहुल सावंत यांच्या नेतृत्वाखाली ८ डिसेंबर रोजी ‘थू-थू आंदोलन’ करण्यात येणार आहे. यासाठी आळजापूर ता. करमाळा येथे स्थानिक शेतकऱ्यांची सहविचार बैठक संपन्न झाली. यावेळी या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये उपस्थिती लावली होती.
या सहविचार सभेसाठी उपस्थित ॲड. राहुल सावंत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले कि, ८ डिसेंबर रोजी ‘थू-थू आंदोलनासाठी’ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरे, महिला, लहान मुले घेऊन उपस्थित रहावे. मकाई कारखान्याचे नुतन चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी सुध्दा २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या आंदोलनाची दखल घेत, माझी भेट घेऊन मला सांगितले कि, ५ डिसेंबर पासुन बिले देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवू नये.
अशा प्रकारची विनंती केली आहे. त्यामुळे आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात आहे. त्यामुळे फक्त आपण आपला रेटा ठेवणे गरजेचे आहे. असे मत ॲड. सावंत यांनी व्यक्त केले.
यानंतर प्रा. रामदास झोळ सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले कि, आजपर्यंत आपण आपल्या हक्काचे पैसे मागत असताना, न्यायिक मार्गाने मागितलेले आहेत. तरीसुद्धा आपल्याला बागलांनी कोणता ही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळेच आज आपल्याला रस्त्यावरील आंदोलन करावे लागत आहे. आता सदरचे आंदोलन हे आपल्या हक्काचे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत थांबविले जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये इतरही कारखान्यांनी जेव्हा-जेव्हा शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत. त्यावेळी प्रशासनाने त्यांच्यावर कोणती कारवाई झालेले आहे? याचा आम्ही पाठपुरावा करून तीच कडक कारवाई मकाई सहकारी साखर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळावर करण्याचे मागणी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करत आहोत. अशा प्रकारे प्रा. झोळ यांनी सांगितले.
यानंतर दशरथअण्णा कांबळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, आजपर्यंत आपण फक्त भूलथापांना बळी पडत आलो आहोत. तालुक्यातील जनतेला कोणी वाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. करमाळा तालुका म्हणजे एकेकाळी स्वर्गीय नामदेवराव जगताप यांच्या रूपाने, संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वाभिमानाच्या राजकारणाची पेरणी करणारा तालुका होता. त्या अनूषंगाने या तालुक्यातील शेतकऱ्यांनी षंड होऊन जगण्यापेक्षा बंड करून हक्क मिळविलेले बरे…. त्यामुळे येणाऱ्या ८ डिसेंबर रोजी आपल्या हक्कासाठी आपण बंड करत आहोत. जर मकाई सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे पैसे वेळीच अदा केले नाहीत. तर येणाऱ्या ८ डिसेंबर रोजी ‘थू-थू आंदोलन’ करण्यात येणार आहे. सदरील आंदोलनामध्ये तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याच्यावर थूंकण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील जास्तीत-जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून, आपल्या उद्विग्न भावना व्यक्त करावयाच्या आहेत. अशा प्रकारचे आवाहन कांबळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. तर तालुक्यातील इतरही गावात जाऊन आम्ही अशाच प्रकारे आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचे काम दिवसें-दिवस करत राहणार असल्याचे कांबळे यांनी प्रशासन आणि तत्कालीन संचालक मंडळाला इशारा दिलेला आहे.
Comment here