करमाळाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

२४ जानेवारी हा करमाळा शहर व तालुक्याच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस! क्लिक करून वाचा सविस्तर..

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

२४ जानेवारी हा करमाळा शहर व तालुक्याच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस! क्लिक करून वाचा सविस्तर..

विशेष लेख –

24 जानेवारी हा करमाळा शहर व तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे कारण 1937 साली सार्वत्रिक निवडणुका सुरू होत्या व त्यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वतंत्र मजदूर पक्षाचे उमेदवार जिवापा येदाळे यांना सोलापूर मधून उमेदवारी दिली होती. त्यांच्या निवडणूक प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 24 जानेवारी 1937 या दिवशी करमाळा शहरात आले होते. येदाळे यांच्या प्रचारार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची करमाळा शहरात जाहीर सभा झाली होती व त्यानंतर पुढील सभेसाठी बाबासाहेब करमाळ्यातून नगरला गेले. असा इतिहास व्याख्याते व लेखक जगदीश अशोक ओहोळ यांनी आपल्या संशोधनातून त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले “जग बदलणारा बापमाणूस” या पुस्तकात मांडला आहे. पुस्तकातील त्या प्रकरणातील काही भाग पुढील प्रमाणे…

करमाळ्यात कडाडले..
______________________________________________

करमाळा येथे 24 जानेवारी 1937 या दिवशी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आले होते, करमाळ्यात भव्य जाहीर सभेत त्यांनी प्रचंड स्फूर्तिदायी भाषण केलेले आहे. हा इतिहास करमाळा तालुक्यातील प्रत्येकाला माहीत असला पाहिजे. इथेच बाबासाहेबांनी आपल्या भाषणात ‘आपली राजकीय व्यवस्था निर्माण करा’ हे सांगितले.
______________________________________________

बाबासाहेबांचं सोलापूर जिल्ह्यावर पहिल्यापासूनच विशेष प्रेम राहिलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रियपणे सहभागी होते. सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत आंबेडकरी विचारांची चळवळ जोशात आणि प्रचंड ताकतीने सुरू आहे.
1937 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबंध महाराष्ट्र पिंजून काढून आपला स्वतंत्र मजूर पक्ष खेडोपाडी रुजवण्याचा प्रयत्न केला व त्यास त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळत होता.

सोलापूर जिल्ह्यात बाबासाहेबांच्या अनेक ठिकाणी सभा होत होत्या. त्या सभांना लोक प्रचंड संख्येने गर्दी करत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पाहण्यासाठी, त्यांना ऐकण्यासाठी लोक उत्स्फूर्तपणे सभांना हजेरी लावत होते. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर, बार्शी, कुर्डवाडी, वळसंग आदी ठिकाणी बाबासाहेबांनी सभा घेतल्याच्या नोंदी आहेत.

सोलापूर जिल्ह्यात ‘करमाळा’ हा एक भौगोलिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा तालुका आहे. पुणे – सोलापूर रेल्वे मार्ग करमाळा तालुक्यातूनच जात असल्याने व उजनी धरणाच्या निर्मिती नंतरच्या कृषी प्रगतीने करमाळा तालुक्याचा विकास झपाट्याने झाला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे मार्ग तालुक्यातून जात असल्याने पूर्वीपासून रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, राजकीय नेत्यांना करमाळा तालुका ज्ञात होता. तालुक्यातील जेऊर हे गाव रेल्वे स्थानक असून त्याच्या उत्तरेला 19 किलोमीटर अंतरावर तालुक्याचे ठिकाण असणारे ‘करमाळा शहर’ आहे.

करमाळा तालुक्याचा इतिहास पाहता करमाळा तालुका हा सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर असणारा व अहमदनगरला जोडणारा तालुका आहे. इतिहासात अहमदनगर वर निजाम बहमनी राजांचा अंमल होता.
तर करमाळा ही राजे रावरंभा निंबाळकर यांची जहागिरी होती. राजे रावरंभा निंबाळकर यांनी खऱ्या अर्थाने करमाळा उभा केला, विकास केला व करमाळ्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले. राजे रावरंभा निंबाळकर यांच्या काळात करमाळ्यात कमलादेवीचे मंदिर आणि करमाळ्याचा मजबूत देखणा भुईकोट किल्ला बांधला गेला.
अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या करमाळा तालुक्यात अनेक मातब्बर राजकीय मंडळी आहेत. त्यामुळे करमाळा हा पूर्वीपासून वलयांकित राहिला आहे. या करमाळा तालुक्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ही लक्ष होते. येथील समाज बाबासाहेबांच्या कार्याने भारावून गेलेला होता.

सोलापूर जिल्ह्यातील सहकारी व बाबासाहेब कसबे-तडवळे येथे

पुणे, मुंबई, दिल्ली, अमेरिका, कोलंबिया विद्यापीठ, लंडन अशी सर्वत्र जगभर ख्याती असणाऱ्या बाबासाहेबांबद्दल करमाळाकरांनाही प्रचंड आकर्षण होते. आणि करमाळाकरांसाठी एक ऐतिहासिक दिवस उगवणार होता, करमाळाकरांना वार्ता कळली की जगभर ज्यांच्या ज्ञानाचा डंका वाजतोय, ते देशाचे नेते, आपले उद्धारकर्ते, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर दिनांक 24 जानेवारी 1937 रोजी करमाळयाला येत आहेत.

करमाळा तालुका आणि तालुक्यातील प्रत्येक गावागावात ही आनंदाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्व समाजामध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली. देशाचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर, आपले तारणहार हे करमाळ्यात येत आहेत, सबंध तालुका त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचे शब्द आपल्या कानांनी ऐकण्यासाठी, ‘याची देही’ याची डोळा’ आपल्या उद्धारकर्त्याला पाहण्यासाठी, आतुर झाला होता. प्रत्येक गावागावात, वाड्यावस्तीवर, चौकाचौकात चर्चा सुरू झाल्या की, आपल्या करमाळ्यात देशाचे नेते डॉ बाबासाहेब आंबेडकर येणार आहेत.
सर्वजण आतुरतेने त्या दिवसाची आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाची वाट पाहू लागले. स्वतंत्र मजदूर पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यभर सभा घेत होते.

त्यातीलच ही सोलापूर जिल्ह्यातील शेवटची सभा होती. ही सभा करून बाबासाहेब नगर जिल्ह्यात जाणार होते. सबंध देशभर त्यांचं नाव गाजतय, असे महान नेते, अस्पृश्यांचे तारणहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर करमाळ्यात येत आहेत म्हटल्यावर, करमाळा चांगलाच सजला होता,

करमाळ्यात जागोजागी पताका, स्वागताच्या कमानी लावण्यात आलेल्या होत्या. बाबासाहेब ज्या दिशेने येणार होते, त्या वाटेवर ठिकठिकाणी आयबहिणींनी सडा सारवण करून रांगोळी काढल्या होत्या. जागोजागी त्यांच्या वाटेवर लोक त्यांच्या स्वागताला थांबलेले होते. करमाळयात सभेसाठी भव्य मंडप उभा करण्यात आलेला होता. त्या मंडपाला हार तोरणं, केळीच्या पानांची खुंट लावून सजवण्यात आलेले होतं. करमाळा तालुक्यातील सबंध अस्पृश्य समाज गावगाड्यातून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी करमाळ्यात आला होता. सर्वांमध्ये एक नवचैतन्याचे वारे वाहत होतं. आज बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता येणार, त्यांचे शब्द प्रत्यक्ष आपल्या कानावर पडणार हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसत होता. प्रत्येक माणसांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं आणि उत्साह सगळीकडे ओसंडून वाहत होता.

गर्दीने करमाळ्यात येणारे लोक व करमाळा शहरात जागोजागी गर्दी करून उभे असणारे लोक मोठमोठ्याने घोषणा देत होते, “बाबासाहेब कोण हाय? दलितांचा राजा हाय”
“बाबासाहेब आंबेडकरांचा, विजय असो”
अशा उत्स्फूर्त घोषणांनी करमाळा शहर दणाणून गेले होते.
सभेचा मंडप जिथे उभारला होता, त्या ठिकाणी तर प्रचंड गर्दी जमली होती. बाबासाहेब कधी येतात आणि कधी बाबासाहेबांचं दर्शन घेतोय, अशी उत्सुकता सगळ्यांना लागली होती. सर्वजण आतुरतेने बाबासाहेबांची वाट पाहत होते. बाबासाहेबांच्या स्वागतासाठी हलग्या, ढोल, ताशे कडाडत होते. सनई वाजत होत्या. तरुण कार्यकर्ते उभे राहून घोषणा देत बाबासाहेबांच्या येण्याची वाट पाहत होते. व्यवस्था पाहणारे सर्वांना मंडपात बसून घेण्याची विनंती करत होते. मंडप पूर्ण खचाखच भरला होता. त्या काळामध्ये एखादी चार चाकी गाडी गावातून आली गेली, तर लोक ती गाडी बघायला उभे राहायचे, चार चाकी गाडी म्हणजे कोणतरी मोठा माणूस, तर आता आपल्या बाबासाहेबांची ती मोठी चार चाकी मोटार गाडी कधी येते? याची वाट सगळेजण पाहत होते आणि अचानक रस्त्यावरून लांब धुळीचे लोट हवेत वर उठू लागले, लोकांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांची गाडी येत आहे, ढोल ताशाचा आवाज अधिक कडाडू लागला. ‘बाबासाहेब कोण हाय दलितांचा राजा हाय’ ‘बाबासाहेबांचा विजय असो’ या घोषणांनी आसमंत पुन्हा एकदा दुमदुमून गेला.

धुळीचे लोट उडवत बाबासाहेबांची गाडी सभा मंडपा जवळ आली. गाडी थांबली, गाडीचं दार उघडलं गेलं, लोक उभे राहून एकमेकाला ढकलत गाडीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. तरुण पोरांनी हातांची साखळी केली लोकांना मागे सारलं गाडीच्या भोवती तरुणांचं कडं उभं राहिलं. बाबासाहेबांनी गाडीचं दार उघडलं, सुटा बुटातल्या बाबासाहेबांनी गाडीतून आपलं पाऊल बाहेर काढलं आणि करमाळ्याच्या धरतीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला. बाबासाहेब खाली उतरले, आयोजक स्वागताला धावले, गर्दी वाढली अनेकजण बाबासाहेबांच्या पायाला स्पर्श करू लावले, बाबासाहेब वाट काढत एक एक पाऊल टाकत पुढे जायला लागले. बाबासाहेबांच्या मागे गर्दी करून उभे असलेले बांधव, मायमाऊल्या बाबासाहेबांच्या उमटलेल्या पावलांची माती कपाळी लावू लागल्या.
क्रमश;
(संपूर्ण प्रकरण वाचा ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकात.. पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क 8956960801)

जगदीश अशोक ओहोळ, व्याख्याते
‘जग बदलणारा बापमाणूस’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक
संपर्क 9921878801

litsbros

Comment here