आम्ही साहित्यिकमहाराष्ट्र

बालपणीच्या हिंदोळ्यावर ( यात लेखकाचे बालपण सामावलेलं आहे )

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

🌹🌹 बालपणीच्या हिंदोळ्यावर 🌹🌹
( यात लेखकाचे बालपण सामावलेलं आहे )

तसं बघायला गेलं तर मी काय म्हणतोय….. माझं बालपण कसं गेलं ही सांगायला तवा मी पण लहानच व्हतो ही सगळ्या पोमलवाडीकरानी बघितलयं तसं काही विशिष्ट गुणांमुळे किंवा सवयीमुळे माझं कौतुक करण्याचं एक काम पोमलवाडी च्या काही नामांकित म्हणजे आत्ताचे सेलिब्रिटी म्हणावे लागेल त्यांच्याकडं जायचं खरंच मला बालपणातच या महान लोकांचा संपर्क जाणवला त्यामध्ये माननीय केशव अण्णा…माधव काका व भास्कर आबा ही निसळ भावंड देवकर तात्या…पोपट पाटील…अण्णा माने…बाबुशेठ डॉक्टर… सर्जेराव विघ्ने… शिशुपाल जोशी…दोन्ही सय्यद मास्तर…आपले बदडे सर…इत्यादी… हाताच्या बोटावर मोजता येणारी मोजकीच मंडळी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत…..तो काळ असा होता खरंच माझ्या वडिलांची पुणतांब्याहून पोमलवाडी ला बदली झाल्यावर पसारा आणायच्या अगोदर माझे वडील पोमलवाडी ला चाखा चोळा बघायला म्हणजे माणसं कशी आहेत ते…तर तो काळ होता 1965 तर तिथे डिगा सोनार हे आमच्या मावशीचे दीर त्यांची गाठ येऊन सांगितले तर त्यांनी ताबडतोब तो जो वाडा होता तो उद्धव खेडगीकर यांचा ते त्यावेळी दौंड ला राहायचे पण सर्व कारभार डिगा सोनार बघायचे खेडगीकर यांच्या सासुबाई घोसाळकर आज्जी यांनी आम्हाला एक दहा बाय दहाची खोली दीड रुपये महिना भाड्याने दिली व त्यानंतर आमचं पोमलवाडीत बस्तान बसलं… पोमाईंनी पण साथ दिली…पसारा काय एवढा नव्हता नवरा बायको व मी एकुलता एक मुलगा दिवस कसे गालावर मोरपीस फिरवावा तसे निघून गेले मला शिस्तीचे खरंच लहानपणापासून म्हणण्यापेक्षा 2-4 वर्ष उशीर का होईना पण बाळकडू मिळाले पण काय ते बाळकडू नाही तर आयुष्य सुधारायची गुटी चं म्हणावी लागेल.

आता आमचे वडील फार लाड करायचे पण आई नुसती टायगर होती ते पण एक वळण होतं म्हणून सांगू साधं उदाहरण देतो पोट दुखतयं आज शाळेत जात नाही म्हटल्यावर तो दिवस काय बोलणार नाही पण दुसऱ्या दिवशी सुरुवात मारूनच उठवायची व्हायची तुम्हाला माहितीयं एकदा का बोहाणी चांगली झाली की दिवसभर धंदा चांगला होतो असं म्हणतात तसं या ना त्या कारणाने असा मार बसायचा तवा खरच पोट दुखायचं चुकून खोटं बोललं तर मार हा ठरलेलाच असायचा… चोरी म्हणजे निसळ यांच्या दुकानातून सामनामध्ये ॲडजस्टमेंट करून पाच पैशाची गोळी खाल्ली तर त्यो असा काय वेगळ्या पद्धतीचा मार असतोय त्याला चेचलं म्हणतात शाळा बुडवली तर एक जण मारायचं व्हयं ज्याच्या हातात सापडल त्यानं हात धुऊन घ्यायचा दुसऱ्या दिवशी तर दोघे तिघं गुरुजी मिळून मारायची त्याला काय मोजमाप नव्हतं कि मोजून इतकेच फटके द्यायचे काय टेक्निक व्हतं त्यांचं त्यांनाच माहिती… कधी-कधी कळत पण नव्हतं आपल्याला कोण कोण मारतयं…असलं काय कोण मारतयं व्हयं तिथंन फुडं 4-6 महिने माराबाबत गुरुजींची अन आमची गाठभेट व्हतं नसायची घरी बापाला सांगावं तर ती पण लोक धार्जिनं गुरुजीचीच बाजू घ्यायचं आणि चार लोकात वाईट वकटं बोलायचं अन लाथानं मारायचं त्यात रात्रीची उतरल्याली नसली तर मग काय तुम्ही विचारू नाय अन आम्ही पण सांगू नाय असं मारायचं पण त्याचं फळ आता मिळालं एक आदर्श माणूस म्हणून घडलो.


आता आमचे मित्र काय लयं श्यानी व्हती व्हयं वात्रटपणा अंगाअंगात भिनलेला आई मारल म्हणून भांडणं चांगली शहाण्या माणसासारखी बाहेरच मिटवायची पण आमच्या आईचं नेटवर्क लय भारी व्हतं बरोब्बर आईला टेलीफोन लागायचा तसं बघितलं तर एखाद्या किलोमीटर चौरस क्षेत्रात गुरफटलेलं एक मायेचं गावं गिरणीच्या टोकड्याच्या आवाजाची आणिकं ओढ लागलेली स्वस्थ बसू देत नव्हती आज पण आठवते ती त्याच्यासाठी 4-5 दळणं राहिल्यावर टोकडा लावायचा असा रिवाज असल्यामुळे आम्ही गर्दी कमी झाल्यावर आपल्या हातांनी त्या दळणाच्या फळीवरची दळणं पुढे सरकून दर्शनी चार-पाच ठेवायचं नंतर सर्जेराव मामांची परवानगी घेऊन तो टोकडा सेट करण्यासाठी मागच्या बाजूला जायचं तवा काय आनंद गगनात मावत नसायचा असं वाटायचं आपण काहीतरी पराक्रम केलाय आकाश ठेंगणं वाटायचं बरोबर एखादा अर्ध्या चड्डीतला दोस्त पण असायचाच तो अजून या गोष्टीचा प्रचार करायचा नंतर आठवडी बाजारात शुक्रवारी त्या दिवशी पांडू रासकर हे प्रत्येकी पाच रुपये पंप ड्रायव्हर आणि आगवाल्याला बाजारासाठी द्यायचे त्याच्यामधून आमची आई सुकट बोंबील भाजीपाला भेळ भत्ता आणून रुपयाभर हातखर्चा साठी ठेवायची काही दिवसांनी रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या वसाहतींमध्ये आम्हाला रेल्वे कवार्टर मिळालं दररोज अंघोळ झाल्यावर भिंतीवर पायं देऊन वर चढायचं घराच्या स्लॅबवर चढून पोत्यावर बसून अभ्यास करायचा एकंदर चार खोल्या होत्या चार पाच पोरं मिळून वर अभ्यास करायचो चहा पिल्याला असायचा नाश्त्याला कवळं ऊन खायचं दहा वाजता खाली उतरून आवराआवरी करुन 11 ते 5 वाजेपर्यंत शाळा असायची आता शाळेत धाक अन माराची भीती काय एकाची असती व्हयं लहानपणी मराठी शाळेमध्ये निंबाळकर गुरुजी व्हते शर्ट लांब व्हता पण बाह्या दुमडून त्याचा अर्धा शर्ट केलेला कमवलेल्या शरीर यष्टीचा त्यामुळे कडक अन रगीलपणा वाटायचा असं वाटायचं पैलवान मैदानात कुस्ती खेळायच्या तयारीत आहे एवढी दहशत आपल्याला नक्की चित करणार आणि तिकडे गेल्यावर म्हणजे हायस्कूल ला गेल्यावर जरा बरं वाटलं म्हणलं आपण जरा मोठे झालोय हायस्कूल ला आलोय मोकळं वातावरण असेल पण नंतर कळलं अन अनुभवलं माननीय बदडे सर म्हणजे खरंच जंगलचा राजा… ठीक आहे त्याची सत्ता जंगलावर असतीचं एक प्रकारची दहशत असतीयं त्यातल्या त्यात बारक्या सारख्या प्राण्यांना तर खूपच… कारण सर एक आदर्श… हायस्कुल परीक्षेत्राचे ते सर्वेसर्वा…आता जुनी पोरं म्हणजे आमच्या अगोदरच्या वर्षातली सांगायची सर लय कडक हाय असच मारत्यात तसेच करत्यात उगा आपली हवा भरायची अजून सरांचा चेहरा सुद्धा पाहिला नव्हता पण सरांना नुसतं बघायचं म्हणलं तरी एखादं टरकायचं अहो एखादं पोरगं पाणी प्यायला वर्गाच्या बाहेर आलं पाण्याचं टिपाड व्हरंड्यात ठिवल्यालं असायचं अन त्यांनी सरांना बघितलं तर पोरगं बिगर पाणी पेता वर्गात जाऊन बसायचं अन पुढचा अभ्यास करायचं तरी भीती वाटायची नंतर कळलं खरंच अनुभवातून सांगतो सर म्हणजे फणस… एक स्वभाव शिस्तप्रिय प्रसंगी कठोर पण अंतःकरणातून मायेचा सागर…. आपल्याला वाटायचं कठोर शिस्तप्रिय पण ते त्यांचं एक अडमिनीस्ट्रेशन व्हतं अगदी जंगलासारखं वातावरण सेम टू सेम नाव काढलं तरी अंगावर काटा यायचा सारं लई प्रेमळ पण सांगणारे एव्हढे बनल्याले कि एखाद्याने नुसतं याचं नवं ऐकूनच वळणावर यावं कारण एव्हढे शिस्तप्रिय की विद्यार्थ्यांना काय पण सहकारी शिक्षकांना सुद्धा एक धाक व्हता आता बघा त्यांनी आम्हाला मारलेल्या पट्टी मुळेचं आमचं स्केल वाढलंय आताच्या भाषेत एखाद्या कडक पोलिस अधिकाऱ्याचा सराईत गुंडाना जसा एक प्रकारे धाक असतो तसा वात्रट मुलांना सरांचा धाक होता एक दहशत होती एक वळण होतं आणि त्यानंतर हायस्कूलच्या उत्कृष्ट परंपरेची धुरा आजच्या घडीला मा. मुलानी सर उत्कृष्टपणे सांभाळीत आहेत त्यामध्ये मा. महानवर सर… मा. पानसरे सर इत्यादी नामांकित शिक्षक मंडळी यांचं हायस्कूलच्या उत्कर्षामध्ये मोठं योगदान आहे.

आता त्यानंतर राहिली दुसरी गोष्ट माझी लहानपणची मित्रमंडळी विठ्ठल कुंभार… बलभीम साठे.. दिपक माळवे… मेहबूब शेख…अज्जू सय्यद…भीमराव तांबवे…रमेश देवकर… केतूरचा शिवाजी पाटील… शिवाजी ढवाण…मी कधी मित्रांची वाट पाहिली नाही ठरल्यावेळी दोन भवरे घेऊन आपणच आळीपाळीने खेळायचं आमच्या दप्तरात पुस्तकाबरोबरच चिंचा… भोकरं…चिंचुके… एखादा भवरा असायचा कवातरी दप्तराचं चेकिंग व्हायचं पावसाची सर येऊन गेल्यावर मातीत पाय घालून खोपा करायचा असं वाटायचं 1 BHK चं बांधकाम केलंय तसं बघितलं तर आम्ही लहान मित्र वय असल दहाच्या आसपास एकदम निरागसपणा आमच्या आमच्यातं मित्रात खटके उडायचे त्याच्या दारावरून सुद्धा जायचं नाही चांगलं लांबचा वळसा मारून जायचं म्हणतात ना माणसांनी हलकट असावं पण चांगलं म्हणून हलकटपणा तुसड्या वाणी वागू नये आणि ही कळायचं काय आमचं वय नव्हतं…काय सांगायचं… लिमलेटची गोळी असली पण समोर एक मित्र व मैत्रिण असली तरी शर्टामधी गोळी धरून दातानी तोडायची अन मग चिमणीच्या दाताची गोळी म्हणून ती आणखीनच गोड लागायची आमची परिस्थिती काही बेरजेची नव्हती वजाबाकीची असायची त्यावेळी वजाबाकीच्या काळात निसळ कुटुंब… सरूआई… मथीआई…सय्यद बाई…ढवाणीन आक्का म्हणजे शिवाजी आणि इंदुची आई यांनी वेळोवेळी हात दिला अजून पण आठवतयं त्या काळात सुद्धा भागत नव्हतं कारण वडील छंदिष्ट क्लबचे मेंबर असल्यामुळे आर्थिक वडातान जाणवायची तरीपण आठवड्यातून दोनदा मटण.. मुबलक खाण्यापिण्याची सोय व्हती आई-वडिलांनी कमी पडू दिलं नाही.

हेही वाचा – श्री किर्तेश्वरांची आरती

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करमाळा – माढा मतदारसंघातील ‘या’ ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी 38 कोटी 65 लाख निधीची तरतूद; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

शालन बाई निसळ आणि बदडे सरांनी शालेय प्रवासामधील गाडीमध्ये बसवून आर्थिक भार सांभाळला त्यात आमचे सय्यद मास्तर वेळो वेळी हातात हात घेऊन पुढे चल म्हणून अक्षरशा ओढायचे रात्र पाळी मध्ये गाड्यांची वर्दळ कमी असल्यावर माणूस थोडा रेंगाळतो पण हा बिचारा मी अभ्यास करतोय म्हणल्यावर खरंच पुस्तक घेऊन गुरुजी सारखा रात्री साडेअकरा वाजता अभ्यास घ्यायचा तवा अख्खी पोमलवाडी गाढ झोपेमध्ये असायची उन्हाळ्यात आम्ही ओळीने सगळे कुटुंब बाहेर अंगणात रात्रीच्या चांदण्यात जेवायचो झोपायचो पण रात्री एखादी थ्रो मालगाडी जोरात धडधड करीत गेली तर काही जण उठून पळायचे गंमत वाटायची भारी वाटायचं कुठे कुत्री भुंकायला लागली तर चोर नाही तरी गडी आलं म्हणायचे सगळं पटांगण एका क्षणात मोकळं व्हायचं जो तो आपापल्या घरात झोपलेला असायचा तवा काय पोमलवाडीमधी लाइटी नव्हत्या रॉकेलची चिमणी व्हती ती पण चोराच्या भीतीने विझवायची अंधारात झोपायचं 1975 ला दहावी झाली पंधरा वर्षाचा होतो अजून पण चांगलं आठवतंय मी लहानच होतो मला चांगलं आठवतयं माझी आई सरूआई… मथीआई…चांगल्या मैत्रिणी व्हत्या त्यामुळे दुपारी जेवणानंतर आमची आई दररोज सरूआई कडं टाईमपास साठी जायची गप्पाटप्पा व्हायच्या तिकडून पाच वाजता शाळा सुटल्यावर यायचं आणि आईबरोबर घरी यायचं दुपारचा चहा तिकडेच व्हायचा आपला रोजचा कार्यक्रम पण अजून पण काही चांगल्या लोकांचा आदर्श घेतला आहे म्हणून दोन पायावर उभा आहे माझ्या जीवनात कित्येकांचा सहवास लाभला काही तर आठवत नाहीत पण त्यांचे सुद्धा उपकार आहेत व मा.बदडे सरांबद्दल म्हणावसं वाटतं या वाऱ्याच्या ओघात पाला पाचोळा उडून जरी गेला तरी पर्वा नाही इथं नव्या पालवीला जन्म घालणारा वटवृक्ष उभा आहे
************************************************
# किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here