जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांचा आदर्श गाव पाटोदा ला अभ्यास दौरा
केत्तुर – केत्तुर येथील जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशनच्या सभासदांनी नुकतीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा या आदर्श गावाला भेट दिली व येथील कल्याणकारी योजनांचा धावता आढावा घेतला.याप्रसंगी पाटोदा गावचे माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी त्यांना सखोल मार्गदर्शन केले.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श गाव असणाऱ्या पाटोदा गावाला जे काही यश मिळाले त्यामागे गावातील नागरिकांची साथ व ग्रामपंचायत मार्फत राबवले गेलेला पारदर्शक कारभार हे गमक असल्याचे फाउंडेशनच्या सभासदांनी सांगितले.कोणत्याही चांगल्या कामाला सुरूवातीला होणारा विरोध व कुचेष्टा सहन केले तरच गावाचा कायापालट होऊ शकतो हे पाटोदा गावातील सुख सुविधा पाहिल्यानंतर जाणवल्याचे जेष्ठ सभासद लक्ष्मण महानवर यांनी सांगितले.
गावातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत मार्फत वर्षभर मोफत धान्य दळण सुविधा,थंड आर ओ चे पिण्याचे पाणी,व सोलर यंत्रणेवरील आंघोळीसाठी उपलब्ध असणारे गरम पाणी या योजना नक्कीच अनुकरणीय असल्याचे मत ग्रा पं सदस्य महादेव नगरे यांनी व्यक्त केले.चोवीस तास घरोघरी उपलब्ध असणारे मीटरवरील पाणी,इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा,व स्वस्त धान्य दुकान,मोफत इंटरनेट वायफायची सुविधा ग्रामपंचायत पुरवत असल्याचे पाहून युवक सभासद हरिभाऊ खाटमोडे यांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा – भाजपा गटनेतेपदी देवेंद्रजी फडणवीस यांची निवड होताच करमाळा भाजपाकडून जल्लोष
नारायण आबा पाटील यांच्या विजयाने करमाळा तालुक्यात उत्साहाचे वातावरण
याप्रसंगी रावसाहेब जरांडे,रामचंद्र देवकाते,हरिश्चंद्र पवार,दीपक गाढवे,अंबर लोभे,लक्ष्मीकांत पाटील,प्रदीप नरुटे,नितीन पतुले व रेवण पवार हे फाऊंडेशनचे सभासद उपस्थित होते.
गावचा कारभार करणाऱ्या ग्रामपंचायत ने व ग्रामस्थांनी मनात आणले तर प्रत्येक गाव हे स्मार्ट व्हिलेज नक्कीच बनेल,व गांधीजींचा गावाकडे चला हा संदेश खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.
डॉ जिनेंद्र दोभाडा
सभासद जनसेवा हिच ईश्वरसेवा सोशल फाउंडेशन,केत्तुर