भाजपचा पराभव करुन सत्तेत आला, आता त्यांच्या दावणीला जाऊन बसायची भूमिका घेता; शरद पवारांनी फटकारल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यात सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या कारभारावर टीका केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि इतर नेत्यांचं नाव न घेता टीका केली. शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाणांच्या काळात असाच एक प्रसंग आला होता. लोकं संभ्रमात होते. त्यावेळी केशरकाकू क्षीरसागर यांनी ठाम भूमिका घेतली होती. तशीच भूमिका त्यांचे नातू संदीप क्षीरसागर यांनी घेतली, असं शरद पवार म्हणाले.
देशाची सत्ता चमत्कारीक लोकांच्या हातात आहे. जात ,धर्म आणि भाषेच्या आधारावर लोकांमध्ये अंतर कसं वाढवता येतील, अशी नीती सत्ताधाऱ्यांची आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती कुठं गेल्यात हे तुम्हाला माहिती आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. त्यांनी यावेळी मणिपूर आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या प्रश्नांवरुन केंद्र सरकारवर टीका केली. केंद्रातील सत्तेच्या जोरावर गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील सरकार पाडलं गेलं. स्थिर सरकार देतो म्हणता आणि केंद्राच्या सत्तेच्या जोरावर लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडतात, अशी टीका शरद पवार यांनी केली.
थोडी माणुसकी ठेवा,नाहीतर लोक धडा शिकवतील : शरद पवार
जिल्ह्याचे नेते काय झालं त्यांना माहिती नाही, एका नेत्यानं सांगितलं, एक आमचा सहकारी हा पक्ष सोडून गेला, चौकशी केली काय झालं, कालपर्यंत ठीक होता, नाही म्हणले त्यांना कुणीतरी सांगितलं, काय सांगितलं, कुणी सांगितलं, त्यांना सांगितलं अमरसिंह पंडितांनी, नाही म्हणले आता पवार साहेबांचं वय झालंय, आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडावा लागेल, माझं वय झालं म्हणता तुम्ही माझं काय बघितलंय, तुम्हाला सामुदायिक शक्ती उभी केल्यावर काय होतं हे जिल्ह्यानं बघितलं आहे. अनेकांचे पराभव इथल्या तरुण पिढीनं केले आहेत. तुम्हाला सत्तेच्या बाजूनं जायचंय तर जा, पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतलं असेल. त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवायचा प्रयत्न करा, नाहीतर लोक धडा शिकवतील, असं शरद पवार म्हणाले.
कालच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा पराभव केला. भाजपचा पराभव करुन तुम्ही सत्तेत आलात. आज भाजपच्या दावणीला जाऊन बसायची भूमिका घेत आहेत. आज तुम्ही हे करत आहात, उद्याच्याला ज्यावेळी मतदान करायची संधी लोकांना मिळेल. त्यावेळी कोणतं बटन दाबायचं आणि तुम्हाला कुठं पाठवायचं हा निकाल या जिल्ह्याचा मतदार केल्याशिवाय राहणार नाही, असं शरद पवार म्हणाले.
दिल्लीमध्ये नरेंद्र मोदींनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर मी पुन्हा येईन म्हटलं. राज्याचे एक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते म्हणायचे मी पुन्हा येईन पण ते खालच्या रँकला आले. त्यामुळं तुम्ही पंतप्रधान पदाच्या खालच्या कुठल्या रँकला येणार याचा विचार करा, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
Add Comment