करमाळा-पुणे रोडवरील रस्त्याचे काम अपूर्ण, वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत; अपघाताला निमंत्रण
करमाळा(प्रतिनिधी); कोर्टी-आवाटी रस्त्याच्या सुरू असलेल्या कामात शहरालगत असणाऱ्या पुणे रोड वरील ओढ्याच्या पुढे गेल्या सहा महिन्यांपासून अर्धवट सोडलेल्या सखोल रस्त्यावर प्रचंड प्रमाणात पाणी साचत आहे.
या पाण्यातून वाहनधारकांसोबतच दुचाकी व शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन कमालीची कसरत करत वाट काढावी लागत आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
प्रचंड रहदारी असलेल्या या रस्त्यावरून करमाळ्यासह परंडा, भूम इत्यादी भागातील एस.टी, बसेस, खाजगी बसेस, तरकारी वाहतूक, खाजगी छोटी वाहने यांच्यासह विद्यार्थ्यांची वर्दळ असते. पूर्ण रस्ता पाण्यात गेल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही.
तसेच या रस्त्यावर असलेल्या नवभारत इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी व शिक्षकांना पर्यायी रस्ता नसल्याने धोकादायक परिस्थितीला तोंड देत दुचाकी, सायकल व पायी ये-जा करावी लागत आहे. संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने कपडे खराब होत आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित घटना घडण्यापूर्वी लवकरात लवकर संबंधितांनी या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
Add Comment