दहा रुपयांच्या नाण्यांची पुन्हा एकदा चलती
केतूर (अभय माने): गेल्या काही दिवसापासून बाजारपेठामध्ये चलनातील दहा रुपयांच्या नोटांची टंचाई जाणवत आहे. चलनात सध्या दोनशे, शंभर, पन्नास, व वीस रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणावर आहेत परंतु, दहा रुपयांच्या नोटा मात्र अतिशय कमी प्रमाणात आहेत या पार्श्वभूमीवर मध्यंतरी केवळ अफवेमुळे दहा रुपयांची नाणी नाकारली जात होती परंतु हीच नाणी आता मात्र स्वीकारली जात असल्याने या नाण्याची ” चलती ” निर्माण झाल्याचे चित्र आहे.
गेल्या चार-पाच वर्षांपासून बाजारपेठामध्ये दहा रुपयांची नाणी कोणीही स्वीकारत नसल्याने व्यापारी व ग्राहक यांच्यामध्ये हमरी तुमरी, वाद होत होते. याबाबत रिझर्व बॅंकेने दहा रुपयाची नाणी न स्वीकारणाऱ्यावर फौजदारी कारवाईची करण्याचे निवेदन प्रसिद्ध केले होते.
.” रिझर्व बँकेने वीस रुपयाची नवीन नाणे चलनात आणले आहे.सध्या ते अल्प प्रमाणात दिसत असली तरी हे नाणे ही दहा रुपयांच्या नाण्याप्रमाणेच असल्याने ते वापरताना काळजी घ्यावी लागत आहे.”
दहा रुपयाच्या नोटा कमी प्रमाणात चलनात असल्याने त्याला फटका छोटया व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे रिझर्व बँकेने दहा रुपयांच्या नोटा मोठया प्रमाणावर चलनात आणणे गरजेचे आहे.
छायाचित्र- दहा रुपयांची नाणी / नोट ( संग्रहित )