काळजी घ्या! राज्यात डोळ्यांची साथ फोफावली; आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही ‘ महत्वाची माहिती
महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने थैमान घातलंअसून. महाराष्ट्रात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या २ लाख ८८ हजार ७०३ एवढी आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये डोळ्यांची साथ जास्त प्रमाणात पसरली आहे. या साथीचा मुकाबला करण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या दिवसात जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.
या बैठकीमध्ये राज्यातील मलेरीया, डेंग्यू, चिकनगुण्या इत्यादी आजारांचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये रूग्ण वाढीची कारणं आणि उपाययोजना यांच्यावर चर्चा देखील करण्यात आली. यावेळी डोळे येण्याच्या साथीच्या रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय.
आरोग्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले, साथरोगांच्या प्रभावी नियंत्रणासाठी राज्यस्तरीय वॉर रूमसह ज्या भागात एखाद्या साथरोगाचा उद्रेक झाला आहे त्या भागात साथरोगावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी एक वॉर रूम तयार करावी. ही वॉर रूम राज्यस्तरीय वॉर रूम सोबत संलग्न असावी. वॉर रूमला साथरोग रूग्णांबाबत, फैलावाबाबत २४ तासात माहिती द्यावी. जेणेकरून उपाययोजना करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे घरोघरी सर्वेक्षण करून डासांची उत्पत्ती स्थाने शोधावी. त्यांना नष्ट करून किटकजन्य साथरोग आटोक्यात आणावा. सर्वेक्षणादरम्यान कुटूंबाला प्रतिबंधात्मक उपायांबाबत जागरूकही करावे, अशा सुचना देण्यात आल्या.
Add Comment