….. बाजार आमटी ……
******************
आज कालच्या जमान्यात कोणत्या गोष्टीला… माणसाला…किंवा खायच्या जिनसाला कवा काय भाव येईल ती काही सांगता येत नाही असंच एक खायचं जिन्नस बहुतेक ग्रामीण लोकांनी ऐकलं आणि अनुभवलं पण असेल त्याचं नाव म्हणजे बाजार आमटी…
शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासासाठी आहेतच मग ते दोन घास खमंग आणि चवदार असले पाहिजेत हे अगदी खरंय पण ते खाल्लेले दोन घास कसे का असेना परिपूर्ण असले तर जेवणाला अजून लज्जत येते खाण्यासाठी जन्म आपुला हेच काही अंशी खरं वाटतं कारण जो तो काहीतरी वेगळं खाण्यासाठी धडपड करत असतो किंवा शोधत असतो अगदी परवा परवा जेव्हा बाहेर बदाबदा पाऊस पडत होता एक झोपडी वजा हॉटेलच पण ढाब्याचं स्वरूप दिलेलं आत गेल्यावर मेन्यू कार्डवर नजर टाकली कारण मेन्यू कार्ड वरची झकास अन खमंग नावं वाचून खरच तोंडाला पाणी सुटलं आणि पोट भरल्या वाणी वाटलं त्या मेन्यू कार्डवर एक नाव लक्ष वेधून घेत होतं पण जो तो त्याचीच मागणी करत होता त्याचं नाव बाजार आमटी…
मी पण बाजार आमटी आणि ज्वारीच्या भाकरीची ऑर्डर दिली पुन्हा वेटरनं विचारलं भाकरी कडक का नरम पुन्हा विचारात पडलो कारण कडक भाकरी म्हणजे माझं फेवरेट ऑर्डर दिल्याबरोबर वेटरनं युद्ध पातळीवर क्षणामध्ये गोल कांद्याच्या चकत्या… रसरशीत लिंबू… आणि थंडगार काकडीचा साज… आणून दिला आणि खरं सांगतो ते बघूनच मन प्रसन्न झालं झाडाचं मुळ आणि ऋषीचं कुळ कधी विचारू नये असं मनात आलं पण उत्सुकता…जिज्ञासा पिच्छा सोडत नव्हती म्हणून डिश येऊ स्तवर मालकाशी गप्पा माराव्यात आमटीचा इतिहास… भूगोल आणि वर्तमानासहित सगळा कुलवृत्तान्त जाणून घेतला अन काही क्षणातच मुख्य डिश बाजार आमटी आणि तीन पातळ भाकरी समोर आल्या पंढरपूर तालुक्यातील करकंब गावचं हे अपत्य पूर्वीच्या काळी व्यापाराच्या उद्देशाने पहिली काय आताच्या सारखी एवढी वाहन नव्हती आपली बैलगाडी जिंदाबाद लांब पर्यंत प्रवासाला जावं लागायचं दूरच्या प्रवासाला जाताना त्या बैलगाडी वाल्या व्यापाऱ्यांचा करकंब गावी मुक्काम पडायचा.
आता ते पडले व्यापारी फक्त व्यापार करणे माहिती रांधण्याच्या नावाने बोंब त्यामुळे दूरच्या प्रदेशात गेल्यावर खाण्याची आबाळ होऊ लागली त्यांना प्रश्न पडला खाण्याचं काय करायचं असा आवश्यक प्रश्न पडल्यानंतर त्यांच्यापैकी काहींना फक्त भाकरी बडवता यायच्या मग त्यांच्यातल्याच हुशार गड्यांनी रात्रीच्या जेवणाला मिक्स डाळीची आमटी बनवली आजही सर्दी…पडसं त्याला आपण बरसन म्हणतो यासाठी ही आमटी जालीम उपाय म्हणून वापरली जाते कसलं पण सर्दी…पडसं असू द्या एक वाटी आमटी किंवा माशाचा रसा ज्याला आपण कडान म्हणतो ते पिलं की सर्दी…पडसं गायब तर असा हा रामबाण उपाय भाकरी चुरून त्याच्यावर गरमागरम आमटी ओतली आणि काला कुस्करून मुखाने रामकृष्ण हरी केलं आणि म्हणता म्हणता संपवली सुद्धा पण दुसरी भाकरी गार झाल्यामुळे ते बदलून देतो म्हणाली तेवढ्यात आमटीची चव चाखावी म्हणून एक भुरका आमटीचा मारला अन अशी जबरदस्त किक बसली भुरका डायरेक्ट नरड्यात नरड्याची पाईपलाईन एकदम ऍक्टिव्ह झाली दिवसा आभाळात चांदण्या दिसायला लागल्या भर पावसात कानाच्या पाळ्या गरम झाल्या नाकाच्या शेंड्यावर घाम दाटला पण आहाहा काय चव जबरदस्त होती म्हणून सांगू
परफेक्ट प्रमाणात मसालेदार तिखट यांचे मिश्रण हे झाल्यावर अशाच अजून दोन भाकऱ्या हाणून पोटाचा विठोबा शांत केला मालकानं एवढं सुंदर जेवण दिल्याबद्दल बिल अन दुवा पण दिला आता इतकं भारी जेवण झाल्यावर भारीपैकी पान हवंय त्यामुळ बुद्धिबळाच्या पटावरच्या उंटा सारख्या तिरक्या चालीनं पानाचं दुकान गाठलं तिथ अगदी सगळं मटेरियल घातलेलं बिना तंबाखू फुलचंद पान खाल्ल्यावर खरंतर ब्रह्मानंदी टाळी लागली आणि दुसरं म्हणजे जवळच असलेलं सोलापूर हे जिल्ह्याचे गाव तिथं येणारे सगळ्या प्रांतातले सगळ्या चवीनुसार डिश देणारं सोलापूर अशी सोलापूरची ख्याती इथं सुद्धा कित्येक दशकापासून फेमस असणारी बाजार आमटी सोलापूर जिल्ह्यातील करकंब हे गाव बाहेर गावाहून येणारे बाजारकरू व व्यापारी बाजारासाठी येत असायचे खाण्यासाठी काहीतरी बनवावं हा उद्देश वर सांगितल्याप्रमाणे ही आमटी बनवली गेली आणि बाजाराला येणाऱ्या बाजार करूसाठी खास… म्हणून याचं बाजार आमटी हे नाव रूढ झालं.
तूर डाळ…शिजवून जिरी…मोहरी… कडीपत्ता… आल…लसूण…हळद… लाल तिखट…हिंग… मीठ…तेल… आणि काळा मसाला…त्याचप्रमाणे सर्व कच्चा आणि खडा मसाला टाकून फोडणी दिल्यावर त्याच्यातलचं भरपूर प्रमाणात अस्सल घरगुती वाणाचं काळं तिखट या सगळ्या सकट हे मिश्रण एकत्र करायचं आणि शिजवलेली डाळ आणि त्या डाळीचं शिजवलेलं पाणी त्याला आपण स्टॉक म्हणतो ती त्याच्यात टाकून शिजवलं की बाजार आमटी तयार आणि आता अगदी अलीकडच्या काळात करकंब गावचे उद्योजक माननीय श्री शशिकांत हेंद्रे यांनी बाजार आमटीचा इन्स्टंट मसाला उपलब्ध केलेला आहे आमटी तयार करताना फोडणीची पूर्वतयारी करून एक 100 ग्रॅमच्या बाजार आमटी मसाला पाऊच मध्ये सर्वसाधारणपणे एक लिटर खमंग बाजार आमटी तयार होते असं साधं सुधं गणित आणि या पाऊचची किंमत फक्त शंभर रुपये आहे खरं बघायला गेलं तर वारीची मजाच न्यारी या वारीत दडल्या आहेत अशाच काही महाराष्ट्रातल्या मातीतल्या खाद्य खनिजा पैकी एक जे आज तुमच्यासमोर आलयं आणि वारीच्या काळात वारकऱ्यांना भोजनासाठी प्रत्येक घरात वापरली जाते ती ही बाजार आमटी…
खरं म्हणजे पंढरपूर दक्षिण काशी संतांचं अन वारकऱ्यांचं माहेर आणि भक्तांचं सुद्धा पंढरपूर हे खवय्यांसाठी आणि इथला प्रसिद्ध पदार्थ जसा पेंड पाला फेमस तशीच पंढरपूरची म्हणजे पंढरपूर क्षेत्रातील करकंब गावची बाजार आमटी कारण ही आमटी म्हणजे करकंब गावची रेसिपी आषाढी वारीला सर्व पालख्या विविध भागातून क्षेत्रातून प्रसंगी पर प्रांतातून येत असतात आणि पालखी बरोबर आलेल्या वारकऱ्यांना सर्रास या वारकऱ्यांना या बाजार आमटी आणि भाकरीचा पाहुणचार दिला जातो आणि विशेष म्हणजे मुक्कामी पोहोचण्यासाठी अन आमटी भाकरीची चव घेण्यासाठी पण हा भगवंत श्रीहरी प्रत्येकाच्या अंगात आणि पायात एक बळ देत असतो आणि या चुलीवर बनवलेल्या आमटीची चव चाखायचा परमानंद प्रत्येकाला मिळत असतो
आता आपण करकंब मध्ये बाजार आमटीचा अगदी खराखुरा इतिहास बघू करकंब मध्ये कोष्टी समाज हा नऊवारी लुगडं विणायचा व्यापारी माननीय हेंद्रे…माननीय नगरकर…माननीय समर्थ…यांना हे कापड दुकानदार लुगडं विकायचे हे व्यापारी लुगडी घेऊन घोड्यावर बाजाराला जायचे बाजाराला जाताना भाकरी बरोबर असायच्या पण कालवण बनवण्यासाठी हे व्यापारी त्या गावातील बाजार झाल्यावर कांदा…खोबरं… शेंगदाणे… आलं…लसूण…आणून त्याचं कालवण बनवायचे कालानुरूप थोडे बदल झाले त्यांचे मापदंड आणि योग्य सुधारित कृती उदयास आल्या पूर्वी लोक दशम्या घेऊन जायचे दशम्या बरोबर हा पदार्थ म्हणजे खाद्यपर्वणीच करकंबच्या घराघरात बनवली गेलेली बाजार आमटीची चव वेगळीच आहे ती चव फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुद्धा चाखायला मिळणार नाही
******************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002