शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी दूरदृष्टीने शाश्वत विकास केला – चेअरमन रणजितसिंह शिंदे
मानेगाव जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये प्रचार दौरा
माढा /प्रतिनिधी- (राजेंद्र गुंड) शेतकऱ्यांचा जलसिंचनाचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी भिमा-सीना जोड कालवा व सीना-माढा उपसासिंचन योजना कार्यान्वित केली. उसाचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठिकाणी साखर कारखाने उभे करून सातत्याने एफआरपी पेक्षा जास्त दर दिला. वीजेचा प्रश्न सोडविण्यासाठी मतदारसंघात ठिकठिकाणी सबस्टेशन व नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले. अद्ययावत व व्यावसायिक शैक्षणिक सुविधेसाठी सीबीएसई बोर्डाचे स्कूल,डी व बी फार्मसी कॉलेजेस,कृषी महाविद्यालय,माध्यमिक विद्यालये व सिनिअर महाविद्यालय सुरू केले. आरोग्य सुविधांसाठी उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांसह ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली.पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह शासनाच्या विविध योजनांमधून आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले.हाच विकासाचा वारसा पुढे अविरतपणे चालू ठेवण्यासाठी निवडणुकीत मला खंबीर साथ द्यावी असे आवाहन जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा माढा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.
ते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानेगाव ता.माढा जिल्हा परिषद गटातील विठ्ठलवाडी,खैरेवाडी,लोंढेवाडी,कुंभेज,खैराव,हटकरवाडी, कापसेवाडी,धानोरे देवी, बुद्रुकवाडी व मानेगाव येथील प्रचार दौऱ्यात बोलत होते.
पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले की,आमदार बबनराव शिंदे यांनी व मी केलेल्या विकासकामांच्या जोरावरच जनतेला मतदान करण्याचे आवाहन करीत आहे परंतु विरोधक मात्र खोटे बोलून व थापा मारुन जनतेची दिशाभूल करीत आहेत.त्यांची विकासाची व्याख्याच वेगळी आहे.जनतेचे मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम करणे म्हणजेच ते विकास समजत आहेत परंतु त्या क्षणभंगुर गोष्टींना जनतेने फसू नये. शासनाने तत्वतः अंतिम मंजुरी दिलेली खैराव-मानेगाव उपसासिंचन योजना नजिकच्या भविष्यात कार्यान्वित करण्यासाठी ठोस प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.यावेळी गावोगावचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून सहकार्य करण्याची ग्वाही दिली. रणजितसिंह शिंदे यांच्या गावोगावच्या प्रचार सभेला शेतकरी,युवक व सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
क्षितिज महिला ग्रुप कडून श्रीराम प्रतिष्ठानच्या लाभार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप
यावेळी अपक्ष उमेदवार रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी खैराव-कुंभेज येथे सीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यात खोल नदी पात्रातील भोव-यात अडकून गुरुवारी बुडालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील चार ऊस तोडणी मजूरांच्या पालावर भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.सर्व उपस्थितांसह त्यांनी त्या चार मजूरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी गावोगावचे आजी-माजी सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,साखर कारखाने, जिल्हा दूध संघ, बँका,मार्केट कमिटी,खरेदी विक्री संघाचे आजी-माजी संचालक यांच्यासह शेतकरी,ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी- धानोरे देवी ता.माढा येथे विधानसभा निवडणुकीनिमित्त प्रचार सभेत बोलताना अपक्ष उमेदवार चेअरमन रणजितसिंह शिंदे बाजूला इतर मान्यवर.