आम्ही साहित्यिक करमाळा

** एक आठवण… वल्ली भेळ ** ~~~~~~~~~~~~~~~~

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

** एक आठवण… वल्ली भेळ **
~~~~~~~~~~~~~~~~


ही एक आठवण आहे साधारण 1985 ते 1990 च्या दरम्यान ची त्या वेळेला माझं दौंडला वास्तव्य होतं व पुण्याला रेल्वेची ड्युटी करण्यासाठी सकाळी शटलने येणे आणि संध्याकाळी झेलमने दौंडला जाणे किंवा क्वचित प्रसंगी दुपारी तीन वाजता मनमाड पॅसेंजर ने दौंड ला जाणे असा नित्यक्रम असे पण बहुतेक जण असे अप-डाऊन करणारे तिथून पुढे साधारण साडे सात नंतर थोडासा फेरफटका मारायला किंवा खरेदीसाठी म्हणा दौंडच्या बाजारपेठेत जायचे आता बाजारपेठ सुरू व्हायची ती कुरकुंभ मोरी पासून भाजी मंडई व इकडे संभाजीनगर पासून तिकडे मिशन हॉस्पिटल पर्यंत भरगच्च रहदारी दिमाखदार दुकाने तशातच सिनेमाच्या वेळी त्या जुन्या हिंद टॉकीज बाहेरील नजरेत भरण्यासारखी वर्दळ…पण एक सांगतो आपण मूळ विषयावर येऊ
आता फिरायला जाताना किंवा काही कामानिमित्त आलेला हा काही तरी थोडं लाईट का होईना खाऊन जाणारच अशातच अवीट चवीची अशी गांधी चौकातील माननीय वागजकर मेडिकल स्टोअर समोरची माननीय बाबुराव यांची भेळ पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये माननीय रतन शेठ गाठे यांची ओली भेळ व थोडसं पुढे हिंद टॉकीज च्या बाहेरील आवारात माननीय ढोले यांची वल्ली भेळ प्रत्येकाचा वेगळा वेगळा हातखंडा ती भेळ त्या पातेल्यात कालवताना तो मोठा डाव म्हणजेच चमचा असा काय वाजवायचे की ग्राहकाला सांगायला नको या भेळ खायला म्हणून त्या आवाजाने जिभेला पाणी सुटायचं भेळीच्या गाडीकडे लोह चुंबक लावल्यावानी पावलं तिकडं वळायची आणि तिथेच माननीय दादू यांची गरमागरम बटाटा भजाची गाडी…नुसतं नाव आठवलं तरी घरापासूनच तोंड वल्लं व्हायचं त्यांची खासियत अशी होती की एका मासिकाच्या गुळगुळीत कागदावर सात गरम गरम बटाटा भजे त्यावर चिंचेची चटणी आणि वर भुरभूरलेला बारीक चिरलेला कांदा खरचं एकदा घेऊन भागत नव्हतं कारण भजे गरम असल्यामुळे डावा हात भाजायचा उजव्या हाताने घेतल्यामुळे उजवा हात पण भाजायचा आणि आणि खातानी व्हट… जीभ… अन वरचं टाळं म्हणजे सगळं तोंड भाजायचं ती वेगळचं मान वाकडी करून खावं लागायचं तशा चुकल्या माकलेल्या दोन-तीन पाणीपुरीच्या गाड्या पण व्हत्या पण त्या एवढ्या प्रभावित झालेल्या नव्हत्या पण आता पाहिलं तर पाणीपुरी म्हटलं की एक समीकरण एखाद्या वेळेला व्हेज-नॉनव्हेज कडे सुद्धा दुर्लक्ष करतील पण ह्यो बेत सोडायचे नाहीत पण ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांनाच खायला आवडतात पाणीपुरीचं नाव ऐकलं की तोंडाला पाणी सुटतं विशेष म्हणजे महिला मंडळ

यांना पाणीपुरी खाणं म्हंजे विशेष आवडीचे आपण खास पाणीपुरी खाण्यासाठी सहकुटुंब संध्याकाळी बाहेर जातो पण पाणीपुरी खाल्ल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो किंवा या पाणी पुरी ची सुरुवात कुठून झाली असेल आपण या पाणीपुरीचा थोडक्यात इतिहास पाहू
यातील पुरी हा जो प्रकार आहे तो रवा आणि मैदा यांचे मिश्रण आहे या पुरी ला गोल छोट्या आकारात बनवून त्या पुर्‍यांना तेलामध्ये तळतात व छान छोटीशी पुरी बनवतात त्या फुगलेल्या पुरीमध्ये थोड्याशा प्रमाणात उकडलेला बटाटा टाकतात… पुदिना…हिरव्या मिरच्यांची चटणी…कोथिंबीर… आणि काळे मीठ यांचे मिश्रण करून बनवलेले पाणी त्या फुगलेल्या पुरी मध्ये टाकलं जातं आता त्यात आणखी थोडी सुधारणा झालेली आहे बाजारपेठेमध्ये नवीन पाणीपुरीचे स्वादिष्ट मसाले सुद्धा पाण्याची चव वाढवतात पाणीपुरीला सुरुवातीला गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या मगध साम्राज्यात बनवण्यात आलं मगध प्रांत म्हणजे आत्ताचा बिहार सुरुवातीला या पुरीमध्ये सोबत चिवडा व अन्य पदार्थ खायला द्यायचे म्हणजेच पाणीपुरीचा जन्म बिहार मध्ये झाला
आताच्या स्थितीजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येक शहरामध्ये नाक्यानाक्यावर या भेळ व पाणीपुरी च्या गाड्या सापडतील आता सध्याची पाणीपुरी म्हणजे त्याची बातच काही और आहे मस्त चटपटीत थोडी गोड तिखट आंबट अशा अनेक चवीचं सुख कुठल्या पदार्थात एकत्र अनुभवायला मिळत असेल तर तो म्हणजे पाणीपुरी हा पदार्थ आणि वल्ली भेळ आणि एक विशेष म्हणजे वरील या दोन्ही गोष्टी बनवताना तो जे काही प्रोसेस करतो ती सारखी पाहावीशी वाटते व त्यांनीचं पोट भरतयं काही वेळेला ही पाणीपुरी अस्वच्छतेच्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आपण पाहिली पण त्या कालावधी यामध्ये आपण हा बेत हायजेनिक स्वरूपामध्ये घरगुती वातावरणामध्ये साजरा केला आहे मस सॅनिटायझर ने हात धुतले…हॅन्ड ग्लोवज घातले… बिसलरीचं मिनरल पाणी वापरलं…आणि नंतर वातावरण नॉर्मल झाल्यावर पुन्हा या चौका मधल्या पाणीपुरीच्या गाड्यांना गर्दीचा बहर आलाय कारण काय तर तशी पाणीपुरी आपण काय घरी बनवू शकत नाही त्यांची रीतच न्यारी पण कसं बघा प्रत्येकाच्या आवडी निवडी सुद्धा काही खासचं असतात असं म्हणतात नावाप्रमाणे भेळ करायला सोपी आणि सुटसुटीत पण पहिला घास तोंडात घातला की तोंड असं खवळतंय की बस असं वाटतंय खूप सारे मसाले एकत्र करून हा पदार्थ केला का काय यावेळी सर्वात महत्त्वाचा निर्णायक भाग म्हणजे चिंचेची चटणी मस्तपैकी चिंच आणि खजूर घालून केलेली ही काळपट तपकिरी रंगाची चटणी जमली की अर्धे काम फत्ते
मग आंबट-गोड या जोडगोळीला तिखटपणा पूर्ण करायला येतो तो मिरचीचा ठेचा त्याचं काय मोजमाप नसतयं काय ग्रॅम वगैरे काही नाही सारं काही अंदाज पंछे चांगल्या हिरव्यागार मिरच्या
… लसूण… जिरे…थोडा लिंबाचा रस…एकत्र करून ते मिश्रण ठेचून किंवा वाटून घ्यायचं हिरवाईचा रंग वास व चव अजून वाढवायची पुदिन्याची चटणी करून घ्यायची या चटण्या शेजारी शेजारी एका पांढर्‍या शुभ्र चिनी मातीच्या वाटीत ठेवल्या कि इतक्या सुरेख दिसतात की भांड्यातल्या पांढऱ्या शब्द चुरमुऱ्यांना सुद्धा कसं अगदी आसुसलेल्या वानी वाट पहावी लागते चुरमुऱ्याच्या जोडीने मग फरसाण… गाठी… पापडी…टोमॅटो… उकडलेला बटाटा…खारे शेंगदाणे…कांद्याची पात…कैरीचे बारीक तुकडे…असे एकेक करत चावडीवर माणसं जमतात तशी त्या पातेल्यामध्ये एकत्र जमतात आणि हा तोंडाला पाणी सुटावं अशा आंबट-गोड चवीची हिरवीकंच कच्ची कैरी आणि बारीक चिरताना डोळ्यात पाणी आणणारा तो कांदा आणि कोशिंबीर मला तर भेळ तयार करताना हातावर नुसता कच्चा कांदा व कोथिंबीर घालून खायला खूप आवडते आता प्रत्येकाची आवड निराळी आणि आवडही काही वेगळीच असते ती जोपासावी लागते तोंडापासून पोटापर्यंत मस्त दवंडी पिटवली जाते थोडं थांबा… थोडं थांबा….भेळ येतीयं… भेळ येतीयं
आणि हो हे सगळं करताना अधून मधून पाहिजे त्या प्रमाणात चिंचेची चटणी आणि मिरचीचा ठेचा टाकताना भांड्यात तो मोठा चमचा वाजवत भेळवाले जो आवाज काढतात तो ऐकावासा वाटतो जणूकाही पोटोबाची पूजा करण्यासाठी घंटा वाजवली जाते मग भेळवाले थोडीशी भेळ त्या प्लेट मध्ये घेऊन त्यावर छान पिवळ्या रंगाची बारीक शेव… बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर…असा साज चढवतात ही प्लेट हातावर आल्यावर मग आपले हात आणि तोंड सुरू होतात अजून एकच घास असं म्हणता म्हणता चटकदार भेळीची एक प्लेट केव्हा रिकामी होती ते कळत सुद्धा नाही आणि ती भेळ पुठ्ठ्याच्या चमच्याने खाण्यात काय तो आनंद असतो भेळ खाताना तो पुठ्ठा एका बाजूने इतका ओला होतो ही पार मोडकळीला येतो मग चमचा फिरवून दुसऱ्या बाजूने खायला सुरू करायचं खाणारा नवीन भिडू असेल तर चमचा बदलून मागतो अट्टल खाणारा असेल तर एकाचं चमच्यावर भागवतो पेट्रोमॅक्सच्या दिव्याच्या प्रकाशात भेळ खात खात मी मोठा झालोय अशातच अनंत चतुर्दशी किंवा बागेमध्ये फिरायला गेल्यावर हा एवढा साज-शृंगार घरूनच न्यावा लागतो गणपती विसर्जन झाल्यावर मिरवणुकीमध्ये थोडसं नाच काम केलेळ असतयं म्हणून पोटातलं रान थोडसं खवळलेलं अन खडबडलेलं असतयं एव्हढी तिखटजाळ भेळ पण थोडंसं सुद्धा हूं का चुं न करता खाल्ल्यावर समोरची वड्याची व भज्याची गाडी त्यांच्या गावाकडं या असा आवाज करीत बोलावतीयं काही दर्दी भेळवाले तर भेळ खायला पुठ्ठा देत नाहीत भेळ दिल्यावर 2-3 कडक पुऱ्या भेळीवर ठेवतात त्याचाच चमचा म्हणून वापर करायचा आणि नंतर त्या खाऊन टाकायच्या कारण भेळ म्हटलं की खाताना तोंड आणि लिहिताना हात आवरणं थोडंसं अवघडच जाते
असंच एकदा रेल्वेने दौंड अहमदनगर प्रवास करताना श्रीगोंद्याचे स्टेशन वर एक टोपली घेऊन भेळवाला आमच्या डब्यात चढला त्याच्या त्या टोपलीमध्ये भेळ होती त्यांच्या त्या विचित्र हालचाली बघून नवलच वाटले त्या नाना प्रकारच्या हालचाली व ती भे ss ळं म्हणून वराडनं त्या रंगीबेरंगी वस्तू घालून भेळ बनवायची ती प्रोसेस सॉलिड गोजिरवाणी वाटायची त्या कागदाच्या कोनात मूठभर पिवळे चुरमुरे…मस्त उकडलेले काबुली चणे… उकडलेलेचं पिवळे वाटाणे…थोडी मटकी…चिमूटभर शेव… 2-4 मका पोहे फ्लेक्स…थोडासा कांदा…टोमॅटो…आणि कोथिंबीर त्यावर लिंबू पिळून तीस रुपये घ्यायचे या पेक्षा उत्तम मॅनेजमेंट काय असेल… आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ओली भेळ खाऊन एखाद्या वेळेस पोट भरतं परंतु मन भरत नाही
==============================
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!