******** दवंडी *******
………..
तसं बघायला गेलं तर गाव म्हणजे गाव असतं म्हणजेच एक कुटुंब…तिथं काहीतरी शिकायला मिळतं आणि त्यात पण कौतुकाची बाब म्हणजे गावातली ग्रामपंचायत आणि चावडी म्हणजेच वडाच्या झाडाचा पार
खरं बघायला गेलं तर राजकारणाची बालवाडी म्हणजे ग्रामपंचायत नाहीतर गावातला पार तिथं गावातलीच काय तर पंचक्रोशीतली माहिती सहज कळते आता जिथं माणसांचा राबता म्हणजे वहीवाट जादा आहे अशा ठिकाणी तर या बातम्यांचं उगमस्थान म्हणजे बघा जिथं सवड काढून थोडं थांबणं भाग पडतं पहिलं म्हणजे कटिंगच दुकान कारण दाढी कटिंग करायला किती पण चलाखी केली तरी अर्धा तास तरी खुर्चीवर बसावं लागतं खुर्चीवर बसल्यावर मुलाखत घ्यायचं काम सुरू होतं म्हणजे अगदी नवखा असला तर कस काय पाव्हंणं… कुठल्या गावचं…कुणाकडं पाव्हणं आलयं म्हणायचं… दुसरं ठिकाण म्हणजे इस्तरीचं दुकान तिथे पण इस्त्री होईपर्यंत कटिंगच्या दुकानात जसं नाईलजाने थांबावं लागतं तसेच हितं पण थांबावं लागतं आणि हॉल्टच्या या कालावधीमध्ये होणारी विचाराची देवाण घेवाण आणि तिसरं म्हणजे खेड्यातलं स्टेशनच्या बाहेरचं अन चौकातलं मारुतीच्या देवळामागचं पानाचं दुकान
किंवा चप्पल…बूट… पॉलिश… किंवा अंगठा लावायच्या निमित्ताने थांबायचं ओघाने ही आलंच तसं बघायला गेलं तर सोनाराच्या दुकानात काय दोन सेकंदापेक्षा जादा थांबता येत नाही बरं लोकं तरी धड हाईती का कटिंगच्या दुकानात गेल्यावर केसावर पाण्याचा फवारा…कंगवा घेऊन भांग पट्टी…थोडासा पावडरचा हात…
हे सगळे फुकट चपलीच्या दुकानापुढं बसून त्याचाच ब्रश घेऊन शेजारच्या पाण्यात बुडवायचा आणि हाताने चप्पल साफ करून स्वच्छ करायची तीच गत हॉटेलची चहा पिऊन झाल्यावर दहा पंधरा मिनिटं बसणं ठीक आहे पण काही बहाद्दर तर सकाळी नऊला चहा घेतल्यावर दुपारी एकलाचं जेवायला घरी जातोय हा हॉटेलवाला तरी बिचारा काय बोलणार अशा काय काय लोकांच्या तऱ्हा ही सर्व मी अनुभवलयं आणि या दहा-पंधरा मिनिटांच्या थांब्यानं बरंच काही शिकवलयं
आणि या आपल्या स्थानिक बोली भाषेतून एखादी गोष्ट…प्रसंग… पुढील कार्यक्रमाचे निमंत्रण… नाहीतर सरकारी आदेश…ही काय कानात सांगता येत नाही तो कमी वेळेत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं व त्याची अंमलबजावणी व्हावी हा हेतु आणि ही ठराविक बातमी गावात प्रसारित व्हावी यासाठी एक यंत्रणा राबवली जाते तिचं नाव आहे दवंडी पूर्वी राजे रजवाडे यांच्या काळात शासन दरबारी होणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असली तर राजसेवक हातात हलगी घेऊन प्रत्येक गल्लीत… मोहल्यात…चौकात…उभं राहून जनतेचं लक्ष आकर्षित करून मोठ्यांनी ओरडून ही वार्ता सांगायचे खरचं ही कौतुकाची बाब होती पण आता ही यंत्रणा बहुतांशी लोप पावलेली दिसते काय झालं आणि काय होतयं याचं व्हिडिओ चित्रण आणि बातमी क्षणात मोबाईल व्हाट्सअप द्वारे सगळीकडे पसरली जाते आणि दुसरं म्हणजे दवंडी ही पूर्वपार चालत आलेली सूचना…जनजागृती…सर्वानुमते गावकऱ्यांचं एखाद्या विषयावर झालेलं एकमत अशा एक ना अनेक कारणासाठी दवंडी दिली जायची रात्री उशिरा गावातील वातावरण शांत असताना मुख्यत्वे दवंडी दिली जायची त्यात पण महत्त्वाचा आणि तातडीचा निर्णय असल्यास वेळेची प्रतीक्षा करत नसायचे कधीकधी दुपारी सुद्धा दवंडी दिली जायची गावातील एखादा प्रमुख निर्णय… क्षण…उत्सव… मोठ्या भाऊबंदकी मधला तंटा असला…तर पारावर किंवा मारुतीच्या देवळात एकत्र येऊन निर्णय घेण्याची प्रथा होती.
आता बघा आदिवासी भागात रेशनवर धान्य आलं तरी दवंडी दिली जायची थोडक्यात या भागात दवंडी म्हणजे आधुनिक युगातील ब्रेकिंग न्यूज म्हणावी लागेल काही गावात तवंडी तसेच इतरही आगळे वेगळे प्रकार अजूनही टिकून आहेत दवंडी देण्यासाठी ऐका हो ऐका… ढूम ढूम धुमाक… ढूम ढूम ढुम ढुमाक…अशी आरोळी देऊन नागरिकांना सूचना वजा इशारा दिला जातो नंतर दवंडी का देत आहेत व सूचना काय आहे ते समजते आता मात्र दिवसागणित हलगीचा आवाज काळागणिक क्षीण झाला आहे यांत्रिकी युगामध्ये नवीन साहित्य साधनं आली आहेत रिक्षा स्पीकर मुळे दवंडी देखील अत्याधुनिक झाली आहे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून दवंडी देण्याची पद्धत होती पूर्वी वीज नव्हती दिवा.. कंदील… मशाल…यामध्ये रात्रीच्या वेळी व्यवहार चालायचे रेडिओ हा एकमेव करमणुकीचं साधन होतं ग्रामपंचायत…पोलीस पाटील… आणि जागल्या… हे फक्त शासन कर्ते म्हणजे सरकार म्हणावे लागायचे दवंडी देणाऱ्याला जागल्या म्हणायचे गावांमध्ये फार पूर्वी पाच सहा ठिकाणी पितळी ताट वाजवून लोकांना जमा करायचे मग ऐका हो ऐका अशी सुरुवात करून सरकारी माहिती द्यायची गावात सरकारी अधिकारी आला तर प्रथम जागल्या व पोलीस पाटील हजर राहायचे बहुतेक ठिकाणी जागल्या अन ग्रामपंचायतीचा कोतवाल ही दोन्ही कामं एकच जण करायचा कारण संपर्काची साधनं उपलब्ध नव्हती हे दोन्ही शब्द लोप पावत चाललेत पुढच्या पिढ्यांना दवंडी…जागल्या हे दोन शब्द माहीत सुद्धा नसणार
………………*****************…………………
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
Add Comment