***** झोपडीतला पिझ्झा ****

***** झोपडीतला पिझ्झा *****
. ………………………..

. काही वेळा आपण एखादी गोष्ट मग ती खाण्याची किंवा वापरण्याची असो आपली जिज्ञासा वाढते ती त्याची ए बी सी डी बघण्यामध्ये की ही सर्वप्रथम अस्तित्वात कसं आलं…येण्याचं कारण वगैरे वगैरे तरी आपण हिरव्या मिरचीचा खमंग ठेचा याच्याबद्दल आज जरा बघू खरं बघितलं तर या ठेच्याचा जन्म म्हणजे कोण्या एका आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा घरांमध्ये व ज्यानं आभाळं पांघरू दगड उशाला अशी ज्याची रोजची वावरण्याची पद्धत आणि तडजोड ही इथेच भरपूर प्रमाणात केली जाते व ती कशी करायची याचं प्रशिक्षण जिथे आपोआप नैसर्गिक परिस्थितीनुसार मिळतं अशा चंद्रमौळी झोपडीत झाला
. दिवसभर शेतामध्ये घामाघुम होईपर्यंत कष्ट करणारा आणि दुपारी कोरभर भाकर तुकडा म्हणजे ज्वारीची भाकर… हिरव्या मिरचीचा ठेचा… आणि बुक्कीत कांदा फोडून बारक्या मडक्यातलं पाणी घटा घटा पिऊन तिथेच लिंबाखाली त्या नांगरलेल्या शेतात ढेकळात बिना अंथुरणाचं अंग टाकल्या टाकल्या त्या ढेकळामध्ये त्याची ब्रम्हानंदी टाळी लागते अशा सुखी समाधानी माणसाच्या घरामध्ये झाला आता जरी आपण त्याच्यामध्ये लसूण…शेंगदाणे… जिरे…लिंबू… टाकत असलो तरी चुलीच्या हारामध्ये भाजलेल्या हिरव्या मिरच्या दोन चार मिठाचे खडे ना तेल ना फोडणी अशा या दोन जीवांना त्या मातीच्या बारक्या मडक्याने बांगड्याच्या किणकिणाटात जवा माझी माऊली तो ठेचा रगडते तेव्हा खाताना दाताखाली लागणारा प्रत्येक मिठाचा बारका कण आल्यावर व चतकोर भाकर ज्यादा पोटात गेल्यावर खरा तिची सुगरणपणा कळतो


. ही झाली ठेच्याची प्राथमिक अवस्था आणि सुरुवातीचा प्रवास एका दृष्टीनं बघितलं तर आता ठेचा म्हणजे मिरची परंपरेतला हा उच्च कोटीचा राजेशाही पदार्थ खर्डा आणि याचं कुळ जरी एक असलं तरी दोन्ही भिन्न पदार्थ याच्यामध्ये गल्लत होता कामा नये खर्डा बनवताना दोन्ही हिरव्या व लाल मिरचीचा तर अस्सल ठेचा बनतो फक्त टंच रसरसलेल्या हिरव्या मिरच्यांचा आजकाल बाजारामध्ये पेस्ट सारखा लाल मिरचीचा पदार्थ येतो त्याला ठेचा म्हणून खपवलं जातं ज्याला बाजारपेठेत चिली सॉस असं म्हणून सुद्धा खपवलं जातं पण त्याला म्हणावी तेवढी मजा येत नाही ओबडधोबड शेंगदाण्याचा कूट…मिरच्या… लसूण… तेल…घालून केलेला अस्सल खर्डा त्या गावाकडच्या मस्त शेणा मातीच्या सारवलेल्या अंगणामध्ये दगडी पाट्या वरवंट्यावर आपल्या आई नाहीतर आजीनं वाटून केलेला खर्डा म्हणजे आपली ती माय माऊली त्या दगडी पाट्या वरवंट्यावर हाताने वाटत तन्मयतेने एकजीव करत ती खर्डा खरवडत असताना तिचा चेहरा पाहण्यासारखा असायचा आपली सर्व माया… ममता… प्रेमभाव…त्या खरडण्यामध्ये ती अर्पण करायची त्याचप्रमाणे खर्डा खरडताना वारंवार होणारा बांगड्यांचा किणकिणाट खरडण्याची आणखीनच रंगत वाढवतो या पाट्या वरवंट्यावर वाटलेल्या खर्डयाची चव मिक्सर मधल्या खर्डयाला अजिबात येत नाही मस्त गरम गरम भाकरीचा वरचा पदर म्हणजे पापुद्रा काढायचा आतल्या मऊ भागावर हा लाल मिरचीचा खर्डा छान पेरायचा त्यावर मस्त गरम तेलाची धार मारायची हा लिहिताना पण तोंडाला पाणी सुटलं नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे आले काही ठिकाणी शे दोनशे रुपये मोजून पावाच्या तुकड्यावर चिली फ्लेक्स टाकून केलेला पिझ्झा या अशा खर्डा भाकरी समोर फिका पडतोयं


. पूर्वीच्या काळी कुठे गावाला जाताना हमखास हा पदार्थ भाकरीबरोबर बांधून दिलेला असायचा एखाद्या शेतावर…विहिरीच्या कडेला…हिरव्यागार झाडाच्या सावलीखाली…बसून हे असं भाकरी… लाल मिरचीचा खर्डा…सोबत कांदा…दही..बाजूला आपली कारभारीन असेल तर असं त्याच्यासारखं फाईव्ह स्टारचं सुख कुठेच नाही तसं बघायला गेलं तर जरा बारीक विचार केला तर कष्टकरी ती पोटाची भूक भागवण्यासाठी खातात तर उच्चभ्रू हे फॅशन किंवा चॉईस म्हणून फाईव्ह स्टार हॉटेलात वेटरला त्याची ऑर्डर देतात देहू…आळंदी… पंढरपूरची… वारी करणारे वारकरी पूर्वी झुणका भाकर खाऊनच पायपीट करायचे पालेभाज्या… फळभाज्या किंवा शेंगभाज्या अथवा आमटी करायला कुठे कोणाला वेळ होता वारीचा पुढचा पल्ला गाठायचा असतो आणि त्या चक्रपाणीचे…त्या जगजेठीचे.. त्या जगाच्या मालकाचे वेध लागलेले असतात ती झुणका भाकर खाल्ल्यामुळे त्यांना जी ऊर्जा मिळते ती पंढरपूर पर्यंत त्यांना पुरते आता आपण जरा दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करू मला समाजाचं एक विशेष अन वैशिष्ट्य जाणवलं की तो कुठल्याही समाजाचा असो त्याच्यामध्ये प्रेम…आग्रह…अगदी भरगच्च भरलेला असतो एखादा पाहुणा आल्यावर किंवा आपण कुठेतरी पाव्हणा म्हणून गेल्यावर एखाद्या समारंभामध्ये आवश्यक खायचा पदार्थ मेनू हा ठरवून आखतात आता त्याचं त्या वेगवेगळ्या ठिकाणाप्रमाणे वेगवेगळेपण आपल्याला अवश्य त्याचं


. त्याचं कारण तसं बघायला गेलं तर आपली पडली ग्रामीण संस्कृती म्हणजे काही दृष्ट्या असेल नसेल तरी निभावून नेणारी म्हणजे अड्जस्ट करणारी भाजीला जिरे…मोहरी कमी असेल किंवा नसेल तरी चालतंय पण मिळतं जुळतं हा विशेष गुण आपल्या अंगात मुरलेला असतो आणि त्यामुळे एक प्रकारचा निष्काळजीपणा अन आपल्याला हवं असलेलं जीवन जगता येतं एका दृष्टीने बघितलं तर त्यातलाच हा प्रकार आहे झुणका भाकर मेनू तसं पाहिलं तर अक्षरशा: झोपडीत वास्तव्यास असलेला असं म्हटलं तरी वावगं होणार नाही म्हणजे इथे राहणारा शक्यतो मोजमजुरी करणारा वर्ग असतो म्हणजे कष्ट करून कसतरी तो जीवनाचा आणि संसाराचा गाडा हाकत असतो असलं तिखट जाळ लिहायचं म्हणजे कवा कवा माझी लेखणी थोडं तिखट लिहा म्हणून म्हणते आणि म्हणून हा लिहिण्याचा प्रयत्न आता ठेचा करायचा म्हणजे त्याच्या उत्पत्तीचा कालावधी म्हणाल तर दहा-बारा हिरव्या मिरच्यांची देठं धडावेगळी करायची ती देठं जपून ठिवायची कारण शेवटी किती मिरच्या घेतल्या होत्या याचा हा चष्मदित गवाह असतो गॅस शेगडीच्या केवळ एकाच बर्नरला काडी लावायची कारण बाकीच्यांचं इथं तूर्तास तरी काही काम नसतं त्यावर बुड गरम करायला तवा ठेवायचा एक मध्यम खोलगट चमचा त्याला आपण डाव म्हणतो त्यांनी दोन-तीन चमचे पाण्याचा त्यावर अभिषेक धरायचा आणि मिरच्या सात-आठ लसणाच्या पाकळ्या त्यात घुसळून मंद आचेवर ठेवून त्यावर झाकण ठेवायचं पाच सात मिनिटे घुसमट झाल्यावर त्या मिश्रणाला वाफ येईल त्या वाफेला डोळे भरून पाहायचं आणि मिरच्या… लसूण यांच्या मिश्रणातला ओलावा काढून त्यांच्या संबंधातला ओलावा काढून त्यांच्या संबंधात एक प्रकारची शुष्कता म्हणजेच कोरडेपणा आणायचा हे मिश्रण नॉर्मल रूम टेंपरेचरला आलं की दळलेलं खडे मीठ चवीपुरतं घालून मनोभावे खलबत्यात कुटायचं ज्या व्यक्तीचा तुम्ही जास्तीत जास्त तिरस्कार करता अशी व्यक्ती म्हणजे ऑफिसातील बॉस डोळ्यासमोर ठेवायचा आणि कुटणं मनोभावे करायचं ठेचा चविष्ट होईल या ठेच्यात श्रद्धेनुसार नखभर नाग छाप हिंग… दाण्याचा कूट…जिरे…भाजलेले तीळ…आणि थोडासा लिंबाचा रस घालायची प्रथा आहे त्यानंतर विदर्भाच्या काही भागात शक्यतो नुसता लसुणचं म्हणाना असा लसणीचा ठेचा तर काही आंबट शौकिनांना टोमॅटो ठेचा आवडतो आणि त्यात पण टोमॅटो जर हिरवीगार असतील तर दुधात साखरच म्हणायची काही ठिकाणी दोडक्याची साल त्याला आपण दोडक्याच्या शिरा म्हणतो त्या सालीची चटणी त्याला दोडक्याचा ठेचा काही ठिकाणी भेंडी तव्यावर मोकळी भाजून भेंडीचा ठेचा त्याला वराडी ठेचा आपण आवर्जून चाखतो हा साधारण दोन महिने टिकतो कोणती गोष्ट मनात आणायला मनातलं प्रत्यक्षात उतरायला तसं बघायला गेलं तर लई वेळ लागत नाही त्यापैकी मग सुरवातीच्या जेवणामध्ये भाजी…पोळी…वरण-भात…कांद्याची फोड…लोणचं… पापड…दही… तसेच जर हिरव्या मिरचीचा ठेचा असला तर नक्कीच कोरभर भाकर जास्तीची जाणार
. मिरचीचा ठेचा बनवावा तो घरच्या लोखंडी तव्यावरच हा तो बनवताना उडालेला तिखटाचा धुराळा आणि त्याला मिळालेली ठसक्याची आणि शिंकेची मानवंदना म्हणजे तळपत्या जिभेला एक पर्वणीचं निमंत्रणचं म्हणाना बायकोने कधी डब्यातल्या पोळीमध्ये बांधून दिलेला ठेचा पाहिला की वाटतं जणू तिने तिचं चटपटीत काळीजच डब्यात दडपून दिलयं हिरवी मिरची… तेलाची धार कणभर मीठ…आणि अर्ध्या लिंबाचा रस ही सगळं आपल्या एका अनामिकेने एकत्र करायचं आणि तेच बोट तोंडात घातलं आणि त्या ठेच्याचा सणसणीत स्पर्श जिभेला झाला की ब्रह्मानंदी टाळी लागलीच म्हणून समजा आणि कपाळावरील दव बिंदू आणि डोळ्यातले अश्रू त्या ठेच्याला त्रिवार सलामी ठोकतात भल्याभल्यांना उभ्याचा आडवा करणारा हा ठेचा म्हणजे मिरचीची खानदानी शान खरंतर ठेचा का खर्डा यात डावं कोण अन उजवं कोण हे सांगणं महाकठीण दोन्हीमध्ये जणू अभिनेत्रीच अवतरतात एका मध्ये अदाकारी तर दुसऱ्यामध्ये नजाकत एकामध्ये ठसका बाणा तर दुसऱ्यामध्ये तोरा चुकून ठेचा आणि खर्डा समोरासमोर आले तर लाल शालूतली पारू आणि हिरव्या पैठणीतली चंद्रमुखी देवा देवा करीत मागे लागतात आणखी काय त्या ठेच्याच कवतिक सांगावं
. बाप जाद्याची असलेली तीच जमीन आता याचं वय पण 55-60 च्या आसपास तरीपण तीच जमीन करतोय तीन पोरी आणि एका पोराचं लगीन केलंय जुनं झोपडं कुडाचं घर होतं आता स्लॅबच्या चार खोल्या…गुरांना पक्का काँक्रीटचा गोठा बांधलाय…रानामध्ये बोअर घेतली… जिराईत होतं त्याचं बागायत केलं…पहिलं फक्त जवारी…हरभरा घ्यायचा आता चिकू…केळी…सीताफळ..सफरचंद सारखी फळं आणि पीकं घेतंय पहिल्यातलं एखादं एकर इकलं पण नाही आणि गुंठाभर नवीन घेतलं बी नाही असं चटणी भाकरी आणि मीठ मिरची खाऊन साधं गणित अन इथं 2 बी एच के मधील वीस हजाराच्या बेडवर ए सी लावून पण कधी कधी झोप येत नाही का तर आपल्या मागं व्याप लई तीच माझा शेतकरी राजा ठेचा भाकर खाऊन आभाळाकडं तोंड करून बिना अंथुरणाचं क्षणामध्ये घोरतंय कारण कसलीच फिकीर नाही ह्यालाच म्हणतात सुखाची चटणी भाकर

***************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

karmalamadhanews24: