आम्ही साहित्यिकमहाराष्ट्रशैक्षणिक

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष; सर्वांनी नक्की वाचवा असा लेख

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष; सर्वांनी नक्की वाचवा असा लेख

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री मुक्ती संदर्भात उचललेले पाऊल वाखाणण्याजोगे आहे. त्यासाठी त्यांनी हिंदू कोड बील मांडले होते. त्यात ते म्हणतात कि ,”महिलांच्या सामाजिक उत्कर्षामध्ये कायद्याचे जे अडथळे येतात ते दूर करण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलात करण्यात आला आहे. स्वातंत्र्य हे धनसंपत्तीवर अवलंबून असते आणि प्रत्येक महिलेने आपले स्वातंत्र्यअबाधित राखण्यासाठी आपली धनसंपत्ती आणि अधिकार यांची काळजीपूर्वक जपणूक केली पाहिजे.

हिंदू कोड बिलाचा मसुदा २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संसदेत मांडला गेला. भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी व परंपरा यापासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा फार संशोधनाअंती अभ्यासपूर्ण लिहीला.बाबासाहेबांनी ४ वर्ष १ महिना आणि २६ दिवस यावर अहोरात्र काम करून हे हिंदू कोड बिल तयार केले.

स्त्री एक ” स्वातंत्र्य, समता, बंधुभावाच्या सामाजिक उत्थानाची पहिली आणि अंतिम पायरी आहे. ज्या देशाची स्त्री जागृत आहे त्या देशाचे भविष्य उज्ज्वल असते ” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटंले होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण सर्वजण डॉ बाबासाहेब आंबेडकरांना गौरवतोच पण त्यांच्या जीवनातील सर्वात गौरवशाली व
संस्मरणीय पर्व आहे ते हिंदू कोडबील व त्यासाठी केलेला संघर्ष.

भारतीय स्त्रियांना हजारों वर्षाच्या भीषण अंधकारातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हे हिंदू कोड बील तयार केले. या बिलामुळे प्रत्येक स्त्रिला विवाह ,वारसा, दत्तक विधान ,उत्तराधिकारी, पोटगी, घटस्फोट यासंबंधीचे महत्वपूर्ण अधिकार मिळणार होते.

परंतु तत्कालीन सनातनी व धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांनी आपले विशेषाधिकार शाबूत ठेवण्यासाठी या बिलास कडाडून विरोध केला तथा डॉ आंबेडकरांनाही लक्ष करून प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला शेवटी हे बिल मागे घ्यावे लागले.

तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा क्षणिक पराभव झाला असे वाटत असले तरी, तो त्यांच्या दूरगामी विचांराचा विजयच होता. कारण हिंदू कोड बिलात सुचविलेले बहुतेक अधिकार
नंतर स्वतंत्रपणे कायदे करून प्रत्यक्षात आणले गेले हे आपल्याला आता लक्षात येतच आहे.

त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदर्शी विचारांचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचाच हा विजय आहे यात तिळमात्र शंका नाही.

भारतीय स्त्रियांच्या अधोगतीस कारणीभूत घटक पाहिले तर असे दिसून येईल कि वैदिक धर्म, वर्णसंस्था, जातीसंस्था, पितृसत्ताक व्यवस्था, तसेच त्यांच्याशी निगडित हजारो रूढी परंपरा आहेत. असे डॉ बाबासाहेब आंबडेकरांनी नोंदवले आहे.

त्यातही मनुस्मृतीने महिलांच्या सर्वांगीण अधोगतीला धार्मिक अधिष्ठान मिळवून देण्याचा प्रयत्न केला हे अनेक अभ्यासकांनी साधार नोंदवले आहे. भारतीय स्त्रियांचे होत असलेले आर्थिक ,सामाजिक ,कौटुंबिक आणि धार्मिक शोषण पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यथित होत असत ,याच भावनेतून त्यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी १९७५ च्याहीपूर्वी म्हणजेच २५ डिसेंबर १९२७ सालीच भारतीय स्त्रीच्या गुलामीच्या बेड्या तोडल्या होत्या. त्यावेळी भारतीय समाजमनावर मनूस्मृतीचे राज्य होते. आजही त्याचा कमी अधिक प्रभाव भारतीय जनमानसात दिसून येतो. भारतीय स्त्रियांच्या गुलामीची संहिता म्हणूनच या ग्रंथाकडे पाहिले जाते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या विकृत ग्रंथांचे दहन २५ डिसेंबर १९२७ रोजी करून स्त्रीमुक्तीचा अन् मानवमुक्ततेचा आवाज बुलंद करण्याचा एक युगांतकारी प्रयास केला. त्यामुळे महाड येथील मनुस्मृती दहन दिन म्हणजेच ‘ पहिला भारतीय स्त्रीमुक्ती दिन होय असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही’ .

हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यानेच लढा पुकारला पण, दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ 4 कलमेच मंजूर झाली होती ‌. यास्तव अत्यंत दुःखी कष्टी होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला .

भारतीय स्त्रियांच्या हक्कांसाठी केवढा मोठा त्याग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला. हिंदू कोड बिलाविषयी त्यांनी म्हटले होते की ” समाजातल्या वर्गा- वर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगार्‍यावर राज महाल बांधण्यासारखेच होय “

हिंदू कोड बिलाला मी हे महत्त्व देतो . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कोड बील मंजूर केले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन भारताच्या पाच वर्षाच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती ,पण दुर्दैव भारतीय राजकारणाचे.

अजूनही वेळ गेलेली नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले विपूल ग्रंथलेखन हे ज्ञानाचे महाभांडार आहे . त्याचे काही खंड सरकारने प्रकाशित केले आहेत राहिलेले खंड प्रकाशित करून भारताच्या विकासात या ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा.

स्त्रियांच्या विकासासाठी व शिक्षणासाठी महत्वपूर्ण कार्य केलेले क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले गुरुस्थानी मानले होते.

हेही वाचा – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक कवयित्री शेख यांची समर्पक कविता नक्की वाचा

क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी आपली धर्मपत्नी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना सोबत घेऊन स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली .स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी समाजाचा विरोधही सहन केला. आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुढे जाताना दिसतात ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्यामुळेच . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही यांचा आदर्श घेऊन स्त्री स्वातंत्र्यासाठी अविरत प्रयत्न केले.

त्यांचे कष्ट सर्व स्त्रियांनी लक्षात घेणे व व त्यांच्या विचारांप्रमाणे मार्गक्रमण करणे गरजेचे आहे. हाच विचार लक्षात घेऊन क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या जयंतीनिमित्त समस्त स्त्रियांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन.तुम्ही होता म्हणून आज सर्व भारतीय स्त्रिया मोकळा श्वास घेत आहेत.

litsbros

Comment here