…………. ll वानवळा ll……………
………………………….
तसं बघायला गेलं तर हा ग्रामीण…अडाणी व अशिक्षित वर्गाकडून खरोखरच हृदयाच्या कोणत्यातरी ज्याला मनापासून जीव लावायचा अशा अर्थाचा एक कप्पा अन त्यातलाच एक शब्द म्हणजे वानवळा खरंच या शब्दांमध्ये बघा अशी काय जादू आहे की हे देण्याचं माप किंवा प्रमाण हे थोडसचं किंवा जास्त पण माया प्रेम जिव्हाळा काठोकाठ म्हणजे ओसंडून वाहणारी नितळ अशी जीवघेणी ओढ आता वानवळा म्हणजे आपल्याकडं असणारं सबळ प्रमाणातलं दुर्मिळ किंवा रोजच्या व्यवहारातलचं पण त्यातलं अगदी थोडसं काढून ते आपल्या माणसाला पाठवणं म्हणजे वानवळा म्हणजे ठराविक काळात पिकणाऱ्या या गोष्टीला वानवळा म्हणतात.
शहरातून आलेले पाहुणे.. माहेरी आलेली लेक किंवा माहेरी जाण्यास निघालेल्या सुनेच्या घरी… हा वानवळा पाठवला जातो आता बघा गाजर…मटार हे बारमाही मिळत असले तरी पण या गाजर… मटार वानवळ्याची चव अप्रतिम असते तसेच वानवळा म्हणजे नुसता भाजीपाला नव्हे तर आपल्याकडे उत्पादित झालेली… खास बनवलेली फळं…पदार्थ…म्हणजे कुरडया पापड्या सांडगे एवढचं काय तर लाडू…करंजी… शेव…चकली… हे पदार्थ पण पाठवतात आता एखाद्याच्या घरी मिरची कांडप असेल तर ती पण बारका डबाभर मसाला वानवळा म्हणून पाठवतोयं थोडक्यात काय तर पदार्थ काय पाठवला याच्यापेक्षा आवर्जून पाठवलाय ना याला महत्व.
आता साधे टोमॅटो घ्या सगळीकडं एवढा ऊत आलाय काही ठिकाणी तर भाव मिळाला नाही म्हणून रोडच्याकडनी चारीमध्ये चिखल होईपर्यंत फेकला जातो पण बांधावर आलेले गावरान बारके ज्याला टोमॅटो नाहीतर तंबाटे म्हणतात ते लाख मोलाचे आता ते पसाभर…दुरडी मध्ये पाहुण्याकडे पाठवले जातात वानवळा म्हणून तर वानवळा म्हणाल तर तो त्याचं महत्त्व जुन्या लोकांनाच आताच्या जनरेशनला हा प्रकार कमीपणाचा वाटतो आता आपण ऑफिसमध्ये जेवतो चार-सहा जण एकत्र असतात प्रसंगी दहा-बारा जण पण असतील पण जेवताना एकत्र बसतो तवा प्रत्येक जण आपापला टिफिन खोलतो त्यावेळी वानवळा एक सोहळा असतो प्रत्येकाच्या डब्यात त्याच्या बायकोनी त्याच्या आवडीची भाजी दिलेली असते पण डबा खोलल्यावर डब्याचं झाकण आणि तो डबा मधोमध सरकवायचा मग आपल्यातला एखादा प्रत्येकाचा डबा उचलून त्यातील घासभर भाजी त्या पाच सहा झाकणात वाटप केली जाते अन हे दृश्य खरोखरचं एक सोहळा असतो आणि इथं वानवळा काय असतो याची खरी अनुभूती येते
त्या डब्यामध्ये कोणाची बटाटा..कोणाची मटकी… कोणाची ढोबळी…फ्लावर…पण झाकणात तयार झालेली मिक्स व्हेज काय अप्रतिम लागते ती मिक्स व्हेज आपण डब्यातील बटाटा भाजीबरोबर जेवण करतो आणि प्रत्येक घासागणिक दोन बोटात घेऊन ती मिक्स व्हेज भाजी तोंडी लावून एखाद्या ढाब्यावर जेवल्याची अनुभूती देतं आणि तो एक सोहळा असतोय आता बघा खेड्यातली माऊली काय एवढी श्रीमंत नसेलही पण घरात केलेलं साधं कांद्याच्या पातीचं पिठलं कमीत कमी आपल्या डाव्या आणि उजव्या घरामध्ये वाटीभर…घासभर दिल्याशिवाय अन्नाचा घास खाणार नाही म्हणजेच वानवळा देणं ही एक संस्कृती आता वानवळा म्हटलं तर पहिली आठवण येते की आमच्या गावातल्या सरूआईची साधं वांग्याचं भरीत असू द्या तवा काय पोमलवाडीत लाईट नव्हती पण दुपार…संध्याकाळ फर्लँगभर लांब राहणाऱ्या सोनारीण बाईला वाटीभर भाजी पदरा खाली झाकून आणून दिल्याशिवाय तिच्या जीवाला चैन पडत नसायचं असं दोन पाच ठिकाणी देवाण-घेवाण व्हायची मग वाळल्यावर पाच दहा कुरडया तर देणारच पण गरम गरम दूध साखर घालून दिलेला वाटीभर चीक वानवळ्याची आठवण करून देतो मग त्यात घरी केलेलं काळा मसाला… सांडगे… पापड… लोणचं…घरीच विरजण लावलेलं दही काय पण असू द्या
आता आमच्याकडे दौंडला एक कोळीण मावशी यायची आठवड्याला एक दोन वेळा आई संग गप्पा मारायला यायची पण येताना दोन-चार मासे आठवणीने आणायची कारण विकत घेतलेल्या पेक्षा अशा मिळालेल्या वानवळ्यामध्ये खच्चून प्रेम भरलेलं असतंयं कालवणाला चव पण अप्रतिम येतीयं निसर्गामध्ये अनेक वस्तूंचा खजिना दडलेला आहे काही वनस्पती वानवळा हा नुसता पदार्थ किंवा जिन्नसांचा नसून कधी कधी तो विचाराचा पण असतो या वानवळ्यामध्ये सर्वसाधारणपणे म्हणजे कुरडया… पापड्या… सांडगे…शेतातली हुरड्याची कणसं…हरभऱ्याचा डहाळा… चिंचा…बोरं…करवंदं…जांभळं… चांगली चुंगली मेजवानी असल तर वाटीभर दिलेली भाजी असे कितीतरी प्रकार तसं बघितलं तर वानवळा या शब्दाचा अर्थ कळायला आत्ताच्या जनरेशनला जरा उशीर लागल म्हणा.
लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आईबरोबर आजोळी जायचो आई मामाच्या मुलांना कपडे… शुक्रवारच्या आठवडी बाजारातून भेळ भत्ता गावठी दिसणारे बुंदीचे लाडू… गुडीशेव… रेवडी…असा खाऊ नाहीतर मागं परसदारी व शेजारून आणलेल्या अळूच्या पानाच्या डबा भरून वड्या जाताना आम्ही घेऊन जायचं आणि आजोळ कुरकुंभ म्हणजे खेडेगाव लाईटीच्या पत्त्या नायं जाताना दौंडला उतरावं लागायचं मॉडर्न बेकरीमध्ये तीस पैसे डझन बटर मिळायचे ते दोन डझन बटर अजून आठवतंय ती घेऊन आम्ही कुरकुंभला जायचो आणि त्यांच्या कितीतरी पटीनं तिथं आमची परतफेड व्हायची मामा आणि मामी कुठं ठेवू न कुठे नको करायची लय जीव लावायची खायप्यायची तर नुसती चंगळ तशातचं मामानी भट्टीवरून आणलेल्या चुरमुऱ्याचा भडंग…एक घर भरून लावलेली गावरान आंब्याची आढी…तर दुसऱ्या घरात ओळीनं लावलेल्या गुळाच्या ढेपा… उन्हाळ्यामुळे वितळायच्या उंबऱ्याखालून काढलेली छोटीशी चार बोट रुंदीची चारी त्या चारीतून वाहत चाललेला तो पातळ गूळ अजून दिसतोय
तिथेच विहिरीकाठची मळई आणि त्या मळई मधली काटेरी वांगी सगळ्या भाज्या…मामी काढून आणायची एक दिवस मग वडील न्यायला यायचे येताना दोन पिशव्या असायच्या पण जाताना दोन-चार पिशव्या आणि दोन बाचकी असायची बाप म्हणायचा हिथं आंबे मिळत नाही का कशाला वजनाला कहार मामी म्हणायची हे वजन म्हणजे प्रेमाचा… मायेचा वानवळा आहे एकदा मी आताचं उदाहरण सांगतो जेजुरीवरून येत होतो घरचीच गाडी होती जराच कमी दोन व्यापारी पिशव्या भरून शेतमाल यायचा योग आला सगळी माझी शेतकरी मंडळी शेतातून थेट तुमच्या घरात अशा प्रमाणे रोडवरच किरकोळ स्वरूपात दुकानं थाटून उन्हामध्ये रोडच्या कडनं बसलेली त्याच्यात कोथिंबीरच्या पेंड्या…पेरू… वाटाण्याच्या हिरव्यागार शेंगा…खरबूज… कलिंगड अंजीर…कांदे… बटाटे…पांढऱ्या कांद्याच्या माळा… सहज द्राक्षाच्या स्टॉलवर थांबलो भाव विचारला 100 ला दीड किलो म्हणाला म्हटलं दे तीन किलो अगोदरच एक छोटा घड वानवळा म्हणून टेस्ट करायला दिला होता
मला जाणवलं की आसपास गर्दी असते त्याच्या तोंडाला मास्क नाही माझ्या जवळचा जास्तीचा मास्क काढून स्वतःच्या हाताने त्याच्या तोंडाला लावला द्राक्षाचं माप देऊन झालं होतं पुन्हा शेतकऱ्याने दोन मोठे घड पुन्हा पिशवीत टाकले मी म्हटलं दादा मास्कची परतफेड केली का काय तर तो दिलाचा राजा म्हणाला पोरा तू पोटच्या पोरावांनी माझी काळजी केली तर पोरांनी थोडे द्राक्ष खाल्ले तर कुठं बिघडलं तिकडं अख्खा माल सडून चाललाय आणि तुला एखादा घड जास्तीचा दिला तर काय फरक पडणार आहे पोरा असू दे घरी पोरं बाळ खातील खरं सांगू शेतकऱ्यांची जातच अशी असते ना त्याच्या हातात कायम देण्याची दानत असते खोटं वाटत असेल तर एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन बघा वावरात भाजीपाला असेल तर तो तुम्हाला कधीच रिकाम्या हाती परत जाऊ देणार नाही काही ना काही वानवळा तुमच्यासोबत देणारच.
पैसा…अडका सारं काही त्याच्यासाठी गौण आणि माणुसकी…आपुलकी त्याच्या नजरेमध्ये महान असते. अजून एक सांगतो बाय रोडने तुळजापूरहून प्रवास करत होतो मोठी पोरगी लहान होती एका ढाब्यावर थांबलो जेवल्यावर बायकोने पोरीसाठी ग्लासभर दूध मागितलं दूध दिलं पण वीस रुपये बिलामध्ये दुधाचे जास्तीचे घेतले पुन्हा पुढे पाच वाजता चहासाठी एका शेतकऱ्याच्या चहाच्या टपरीवर थांबलो चहापाणी झाला पुन्हा पोरीसाठी दूध घेतलं त्यांनं आमचा चहा पिऊन हुस्तवर एका बाटलीत दूध कोमट करून भरलं पैसे देताना मात्र दोन चहाचे दहा रुपये घेतले दुधाचे विचारल्यावर बारक्या पोरांचे पैसे घेऊन काय बंगला बांधायचा आहे काय ही बाटली राहू दे पोरी पुढच्या वाटेमध्ये तिला भूक लागल्यावर वापर असं माझ्या बायकोला सांगितलं शेतकरी भले आर्थिक दृष्ट्या गरीब असल पण मनाने मात्र कुबेर असतोयं
एवढं मात्र खरंय…
*********************
किरण बेंद्रे
पृथ्वी हाईट्स… पुणे
7218439002