वाढदिवस विशेष लेख “करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

वाढदिवस विशेष लेख
“करमाळा ते कोलंबिया – वादळात ही पाय रोवून उभा राहणारा माणूस जगदीश ओहोळ”

गवंडी काम करणारे आजोबा.. शेती करणारे आई वडील.. करमाळयात समाजकल्याण होस्टेलला राहून शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी.. अशा बॅकग्राउंड मधून आलेला तरुण ते महाराष्ट्रातील शिव फुले शाहू आंबेडकर अभ्यासू व निर्भीडपणे मांडणारा, महाराष्ट्रातील वाडीवस्ती पिंजून काढत प्रबोधन करणारा एक प्रख्यात सुप्रसिद्ध युवावक्ता, मोटिव्हेशनल स्पीकर, आजच्या तरुणाईचा आयडॉल म्हणजे जगदीश ओहोळ !
चांगली नोकरी, व्याख्यानं, लेखन हे सगळं सुरळीत सुरू असताना 26 मार्च 2018 रोजी जगदीशचा एक भीषण अपघात झाला अन आता सगळं संपतंय की काय? अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्या अपघातातून जगदीश ओहोळ पुन्हा उभा राहील, भाषणं करेल, यावर आम्हा अनेक मित्रांना शंका वाटत होती. परंतु अशा एखाद्या अपघाताने हार मानेल तो जगदीश कसला.? हे आम्हाला पुरतं ठाऊक होतं. ‘हे तुला जमत नसतं’ असं म्हटल्यावर ते करून दाखवणारा, अनेक अशक्यप्राय गोष्टींना आव्हान देणारा जगदीश, त्या अपघातातून सावरत होता.
आम्ही सर्व प्रत्यक्षपणे ते पाहत होतो. त्याचा नियमित चालू असणारा सामाजिक कार्याचा ओढा, व्याख्यानं, लेखन हे सगळं काही काळ थांबलं होतं. तेव्हा या अनेक गोष्टींची आम्हा मित्रांना आठवण व्हायची, पण पुढच्या एक वर्षातच जगदीश त्याच ताकतीने उभा राहील असा मला वाटत नव्हतं. पण जगदीशने आपल्या आत्मशक्तीच्या जोरावर ते करून दाखवलं! आणि पुढच्या एक दीड वर्षात जगदीश पुन्हा नव्या ताकतीने, नव्या जोमाने उभा राहिला. नुसता उभा राहिला असं नव्हे तर पुन्हा त्याचा झंझावात सुरू झाला.


जगदीशने त्या अपघाताच्या वेदना बाजूला सारून, जे गमावलं त्याचा शोक करत न बसता “आता जगलोच आहोत तर समाजासाठी जगू” या ध्येयाने, नव्या दमाने शैक्षणिक कार्याबरोबरच समाजप्रबोधन, व्याख्यानं, लेखन सुरू केले. अपघातानंतर त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला जोड दिली ते ‘जगदीशब्द फाउंडेशन’ ची सुरुवात करून! कोरोना काळात अनेक लोकांचे कोरोनाने निधन झाले. तेव्हा संवेदनशील मनाच्या जगदीश ओहोळ यांच्या मनात उलथापालथ होत होती.. ज्या बालकांचे आई वडिलांचे छत्र हरपले आहे, अशा बालकांच्या भवितव्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात होता आणि तो जगदीशब्द फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी कृतीत आणला. करमाळा तालुक्यातील अशा कोरोनात आई वडिलांविना अनाथ झालेल्या, एकल पालक राहिलेल्या विद्यार्थ्यांचे पालकत्व जून 2019 पासून संवेदनशील मनाच्या जगदीश ओहोळ यांनी घेतले आहे. त्या बालकांना मागील चार वर्षांपासून सर्व शैक्षणिक साहित्य जगदीशब्द फाउंडेशन च्या माध्यमातून पुरविले जात आहे.

दरम्यानच्या काळात जगदीशच्या आयुष्यात पत्नी म्हणून छाया वहिनींची एन्ट्री झाली. जगदीशचं संविधान पुस्तकं व वृक्ष रोपे वाटप करून झालेलं लग्न ही सुद्धा एक वेगळी कहाणी आहे. जगदीशच्या आयुष्याच्या जोडीदार झालेल्या छाया वहिनीही जगदीशच्या प्रत्येक कार्यात खंबीरपणे सोबत उभ्या राहिल्या म्हणून जगदीशला अधिक बळ मिळाले. जगदीश आणि वहिनीच्या आयुष्यात पुत्ररत्न झालं आणि कायम शब्दांच्या दुनियेत रमणाऱ्या या दाम्पत्याने आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘शब्द’ !

अपघातानंतर सावरणाऱ्या जगदीशच्या आयुष्यात भाषण, लेखन, संशोधन सुरूच होतं. पण खऱ्या अर्थाने ही वादळा पूर्वीची शांतता होती.
आपण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर एक पुस्तक लिहीत आहोत असं जगदीश यांनी जाहीर केलं, पण बाबासाहेबांवर आजवर लाखो पुस्तकं लिहिली गेली आहेत, अनेक वक्ते आहेत. जगदीश काय वेगळं लिहिणार? असं अनेकांना वाटत होतं.
पण जेव्हा जगदीशने पुस्तकाचं नाव जाहीर केलं ‘जग बदलणारा बापमाणूस’ तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तसं पाहता प्रबोधन, लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, कुणीही गॉडफादर नसताना जगदीश स्वतःला या क्षेत्रात सिद्ध करत होता व आहे. जगदीशने मागील 8-10 वर्षांपासून ज्या पुस्तकाचे स्वप्न पाहिले होते ते अखेरीस प्रत्यक्षात आले 3 डिसेंम्बर 2023 रोजी!
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, विचारवंत, मा खा. भालचंद्र मुणगेकर यांनी लिहिलेली प्रस्तावना व प्राच्यविद्यापंडित डॉ. आ.ह.साळुंखे यांनी केलेली पाठराखण असलेले ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचे अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत भव्यदिव्य प्रकाशन गंजपेठेत फुलेवाडा येथील सावित्रीबाई फुले सभागृहात झाले.. आणि खऱ्या अर्थाने तिथून एक नवी सुरुवात झाली लेखक जगदीश ओहोळ यांच्या कारकिर्दीची!
जबरदस्त व्याख्याता म्हणून जगदीश महाराष्ट्राला परिचित होता पण त्याची लेखणी ही तशीच नव्हे तर त्याच्या शब्दांहून अधिक धारदार व हृदयाला भिडणारी आहे याची जाणीव साहित्यविश्वाला या पुस्तकामुळे झाली.
हे पुस्तक प्रकाशित झाल्यानन्तर या पुस्तकाबद्दल, जगदीशच्या लेखनाबद्दल कामगार नेते डॉ बाबा आढाव, लोकमतचे संपादक संजय आवटे, बीबीसी मराठी दिल्लीचे संपादक अभिजित कांबळे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, लेखक व उद्योजक प्रफुल्ल वानखेडे, अभिनेता किरण माने, समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे यांसह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी भरभरून लिहिले, कौतुक केले.
पुस्तक प्रकाशित झाले आणि पहिल्याच दिवशी 1000 प्रतींची पहिली आवृत्ती संपली.
पुस्तकाबद्दल मराठी वाचकात तुफान चर्चा सुरू झाली आणि प्रकाशानंतर तिसऱ्या दिवशी 6 डिसेंम्बर रोजी चैत्यभूमीवर ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाच्या 2000 प्रती संपल्या.


वाचकांनी या पुस्तकाला अक्षरश: डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर हजारो पोस्ट, शेकडो समीक्षण, लोकांच्या स्टेट्सला हेच पुस्तक, विविध वर्तमानपत्रात पुस्तका बद्दल भरभरून लिहिलं गेलं. वाहिन्यांवर बोललं गेलं…
मुंबई, कल्याणला नागसेन बुक डेपोच्या वतीने ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तक घराघरात अभियान राबविण्यात आले..
चळवळीत जिकडे पाहावं तिकडं ‘जग बदलणारा बापमाणूस’ गाजत होतं!
“एकप्रकारे या पुस्तकाने जगदीशचं जग बदललं.” सुरुवातीला हे पुस्तक म्हणजे बाबासाहेबांचं नाव, फोटो यामुळे आवडतं असं वाटलं पण हळूहळू लोक पुस्तकातील खिळवून ठेवणारा आशय, लेखकाची जबरदस्त लेखन शैली, सुंदर हृदयाला भिडणारी मांडणी व “आजवर आम्हाला असे मोटिव्हेशनल बाबासाहेब कुणीच सांगितले नव्हते.” अस बोलू , लिहू लागले आणि ते खरं या पुस्तकाचे व लेखक म्हणून जगदीशचे यश होत व आहे.
पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद होता, पुस्तक प्रादेशिक सीमा पार करून अगदी दुबई, फ्रांस पर्यंत पोहोचलं. पण जगदीशच्या कष्टाचं चीज करणारी घटना घडली ती पुस्तक त्या विद्यापीठात पोहोचले जेथे बाबासाहेब उपाशीपोटी शिकले, घडले त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात!

हेही वाचा – भरपूर पाऊस पडू दे,शेतकरी सुखी,समाधानी राहू दे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाकडे साकडं! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ दापत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान

कोरोनात आई बाबा गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा मदतीचा हात; सलग चौथ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात इंटरनॅशनल स्कॉलर डॉ सुरज एंगडे, कोलंबियाचे जर्नालिझम विभाग प्रमुख जॉन कॉब, आंबेडकराईट स्टुडंट ऑफ कोलंबियाचे प्रमुख विकास तातड, मानवतावादी संस्थेचे प्रमुख शिवदास म्हसदे आदी मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यात एप्रिल 2024 मध्ये करण्यात आले. विशेष म्हणजे कमी वेळ व्हिसा पासपोर्ट आदी प्रशासकीय बाबींच्या अटी मुळे स्वतः लेखक जगदीश ओहोळ यांस या कार्यक्रमाला जाता आलं नाही, पण लेखकांच्या अनुपस्थित वाचक व मान्यवरांनी एखाद्या पुस्तकाचा परदेशात सोहळा करावा अशी ही एकमात्र घटना असेल. लवकरच या पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्ती येत आहेत. कोणतीही मोठी पार्श्वभूमी नसताना जगदीश सर्व क्षेत्रात खंबीरपणे लढतो आहे, त्या या पुस्तकाच्या केवळ सहा महिन्यात पंधरा आवृत्त्या प्रकाशित होतात आणि हातोहात संपतात. हे मराठी साहित्य विश्वात क्वचितच घडते.
हे पुस्तक लेखनासाठी जगदीशने किती त्रास घेतला व पुस्तक पूर्णत्वास नेले हे आपल्याला ते पुस्तक वाचताना लक्षात येतेच.

असा सगळा संघर्ष करत, यशाचे एक एक शिखर पदांक्रांत करत जगदीश वाटचाल करतो आहे. त्याच्या डोक्यात कधी हवा जात नाही, तो कायम मातीत पाय रोवून मातीतल्या माणसांसाठी उभा आहे. अशा माझ्या जिवलग मित्राचा आज वाढदिवस..
“जिंदगी लंबी नही बडी होनी चाहीये!”*हे आम्ही तुझ्याकडूनच शिकत आहोत.
जगदीशजी उदंड जगा.. ज्ञानवंत व्हा, किर्तीवंत व्हा.. तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

– गंगासेन वाघमारे, पुणे

karmalamadhanews24: