येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
बिपरजॉय चक्रीवादळाबाबत मोठी अपडेट आहे, पूर्वमध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र असं बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गोव्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 820 किलोमीटर, मुंबईपासून 840 किलोमीटर तर पोरबंदरपासून 850 किलोमीटर अतंरावर आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत हे चक्रीवादळ उत्तर -ईशान्येकडे व त्यानंतर तीन दिवसानंतर ते उत्तर वायव्यच्या दिशेनं सरकणार आहे.
विदर्भातही पुढील तीन दिवस विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. आज अमरावती, यवतमाळ, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर उद्या म्हणजेच 10 जून रोजी अमरावती, वाशीम, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील पाच दिवस तापमानात कोणतीही वाढ होणार नाही, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान बिपरजॉय चक्रिवादळामुळे समुद्राला उधाण येणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेले आहेत, त्यांनी परत यावं असं आव्हान हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.