प्रवासी उतरले खाली अन् बसने घेतला पेट
लातूरहून परभणीच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या, धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या लागलेल्या भीषण आगीत शिवशाही बस जळून खाक झाली आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये प्रवासी देखील होते. मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.
ही घटना बीडच्या परळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्रीच्या दरम्यान घडली आहे. तर यादरम्यान परळी नपचे अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होते. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली.
लातूरहून परभणीच्या दिशेने प्रवाशी घेऊन जाणाऱ्या शिवशाही बसने परळी शहरातील बसस्थानकाच्या बाहेर येताच अचानक पेट घेतला. ही बाब काही प्रवाशांच्या लक्षात येताच, त्यांनी वाहकांच्या लक्षात ही बाब आणून दिली.
यानंतर काही क्षणात सर्व प्रवासी बसच्या खाली उतरले. या दरम्यान बघता बघता सर्व एसटी बसने पेट घेतला आणि एका क्षणात बस होत्याची नव्हती झाली.
पूर्ण बस जळून खाक झालीय, मात्र सुदैवाने जीवितहानी टळली असून यामध्ये एसटी महामंडळाचे लाखोचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.