उंदरगावात शिवशाही गणेशोत्सव मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
माढा (प्रतिनिधी )
गणेशोत्सव म्हटल्यावर बाल गोपाळांचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. या दरम्यान अनेकविध धार्मिक, सांस्कृतिक, बौद्धिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यावर गणेश मंडळांचा भर असतो.परंतू बऱ्याचदा मोठ्या आवाजात गणपतीची तसेच इतर गाणी लावली जातात. त्यामुळे उत्सवाचा मूळ उद्देश बाजूला पडतो की काय अशी शंका निर्माण होते. या सर्वं प्रकाराला अपवाद ठरले आहे.
उंदरगाव ता. माढा येथील शिवशाही गणेशोत्सव मंडळ. या मंडळाच्या वतीने दरवर्षी लहान मुलांवर अभ्यासाचे संस्कार व्हावेत म्हणून विविध प्रकारचे बौद्धिक तसेच करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. याही वर्षी लहान मुलांसाठी ‘शब्द साखळी’, ‘३० पर्यंतचे पाढे’, ‘लिंबू चमचा’, ‘रंगभरण’, ‘संगीत खुर्ची’ इत्यादी प्रकारचे खेळ आयोजित करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराच्या इंग्रजी विभागात कार्यरत असलेले उंदरगावचे प्रा.राजेंद्र तांबिले यांनी शिवशाही गणेशोत्सव मंडळाच्या आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या तसेच सहभागी बाल सदस्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
प्रा.राजेंद्र तांबिले यावेळी म्हणाले की,‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून त्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा लावला. कर्मवीर आण्णांनी दिलेला विचार या गणेश मंडळातील मुलांच्यात रुजविण्याचा हा प्रयत्न आहे. लहानवयातच मुलांवर जर अभ्यासाचे योग्य संस्कार झाले, तर ही मुले पुढे जाऊन देशाचे सुजाण आणि सुशिक्षित नागरिक घडू शकतात.
हेही वाचा – लहान मुलीची खरेदी करून तिच्याकडून भीक मागून घेणाऱ्या व्यक्तीना अटक; लहान मुलीची मुक्तता
छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते रेश्मा दास यांच्या ‘सुमी” पुस्तकाचे प्रकाशन
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढाचे माजी विद्यार्थी प्रहार शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, जेष्ठ विधिज्ञ अॅड. नवनाथ तांबिले, विष्णू सुतार, प्रगतशील बागायतदार अमोल तांबिले, भागवत तांबिले, नितीन उर्फ रंगा चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष सौरभ साळुंके आणि गावातील नागरिक मोठ्याप्रमाणावर उपस्थित होते.