*तिळगुळाच्या गोडव्याने संक्रात साजरी*
केत्तूर ( अभय माने) मकर संक्रांतीचा सण केत्तूर (ता.करमाळा) परिसरात पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी एकमेकांना साखरेचे तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या… गोड गोड बोला… असे म्हणत शुभेच्छा दिल्या गेल्या.
यावेळी दत्त मंदिर,विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हनुमान मंदिरात सकाळपासूनच महिलांनी गर्दी केली होती.महिलावर्ग नटून थटून,पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या त्यांनी यावेळी महिलांनी सुगड पूजन करून वाण ओवासा दिला.हळदी कुंकूवाबरोबरच उखाणा महिला घेत होत्या.सर्व मतभेद विसरून एकमेकांना गोडव्याने जोडणाऱ्या मकर संक्रात या दिवशी एकमेकिंना प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत होते.
सकाळपासूनच महिलांची लगबग सुरू होती घरोघरी पुरणपोळी, तिळाच्या पोळी असा बेत होता.नवविवाहितांसाठी पहिली संक्रात महत्त्वाची समजली जाते.या दिवशी महिला काळा रंगाच्या साड्या तर पुरुषवर्ग काळ्या रंगाचा शर्ट परिधान करतात.यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणावर फोटोसेशनही करण्याचा ट्रेंड कायम ठेवल्याचेही दिसत होते.
हेही वाचा – जिल्हास्तरीय धावणे क्रीडा स्पर्धेत नेरले शाळेच्या शुभम काळेला उपविजेतेपद
नववर्षातील पहिला आणि महत्त्वाचा आणि महिलांचा सण असणारा मकर संक्रांत यानिमित्त अनेकांनी घरोघरी जाऊन एकमेकांना तिळगुळ वाटप केले.यावेळी बच्चे कंपनी मात्र विशेष खुशीत होती.
ऑनलाइन शुभेच्छावर भर-
गेल्या काही वर्षापासून मोबाईलवर संक्रात सणाच्या शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाचा वापर वारेमाप केला जात आहे.त्यामुळे फोनचा इनबॉक्स शुभेच्छांच्या वर्षावाने हाउसफुल झाला होता याबरोबरच व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आदि समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु होता.एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी विविध हिंदी मराठी गाणी,संक्रात जोक्स, स्टेटस, रिल्स याबरोबरच आकर्षक स्टिकर शुभेच्छा मात्र ” स्मॉल बट स्वीट ” ठरत होत्या.
छायाचित्र :केत्तूर- मंदिरामध्ये संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व ओवासा करण्यासाठी आलेल्या महिला.(छायाचित्र-उज्वला निंभोरे,केत्तूर)