तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

तरुणांनो तुमच्या धडावर तुमचाच मेंदू असुद्या, जग जिंकता येते; शारदा व्याख्यानमालेत जगदीश ओहोळ यांचे प्रतिपादन

बारामती(प्रतिनिधी); बारामती येथील ऐतिहासिक शारदा व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व जग बदलणारा बापमाणूस या आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांचे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

खासदार शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या पुण्यस्मरणार्थ या व्याख्यानमालेचे आयोजन मागील 40 वर्षापासून करण्यात येत आहे. या व्याख्यानमालेत आजपर्यंत देशातील अनेक दिग्गज नामावंतांनी व्याख्यान दिलेले आहे. त्याच मालेमध्ये युवा व्याख्याते जगदीश ओहोळ यांचे ‘चला जग जिंकूया’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाला बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी बोलताना जगदीश ओहोळ म्हणाले की, आजच्या तरुणाईला आजचे जग आणि आजच्या जगामधील आपले स्थान नेमके काय आहे? याची समज आली पाहिजे. जेव्हा ही समज येईल तेव्हा जग कसं जिंकायचं किंवा आपलं नव जग कसा निर्माण करायचे याचे भान तरुणाईला नक्की येईल. संपूर्ण जग जिंकण्याचं स्वप्न पाहिलेला सिकंदर ही शेवटी हात रिकामेच ठेवून गेला.

त्यामुळे आज आपले जीवन जगत असताना आपलं जग जिंकायचं , म्हणजे आपली माणसं, आपले मित्रपरिवार नातेगोते यांची मन जिंकणे गरजेचे आहे. त्यानंतर पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी या गोष्टी आहेत त्यामुळे आजच्या तरुणाने जग जिंकण्याचा स्वप्न पाहत असताना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका क्लिक वरती जग आपल्या हातात आलेल आहे असं म्हणताना ही आपली रक्तामासाची माणसं, मित्रपरिवार, तो आपल्यापासून कोठे आहे? याचा विचार केला पाहिजे.

राजकारण, समाजकारण सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असताना तरुणाईने आपल्या धडावरती आपलाच मेंदू आहे का? याचा विचार केला पाहिजे. स्वतःच्या बुद्धीने विचार करणारी माणसंच आपलं जग निर्माण करू शकतात. अशी मांडणी यावेळी व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी केली.

त्यांच्या या मांडणीला बारामतीकरांनी टाळ्यांचा कडकडाटात प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना पुढे ओहोळ म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या गुलाम झालेल्या मातीत स्वराज्य निर्माण करून नवं जग निर्माण केलं. महात्मा फुलेंनी गुलामीत जगणाऱ्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून एका नव्या आधुनिक सुशिक्षित जगामध्ये आणलं आणि स्त्रियांचं नवजग उभा राहिले, तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारा विद्यार्थी ते जगातील सर्वात आदर्श विद्यार्थी आणि भारताचे संविधानाचे निर्माते होऊन विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतीयांना एक नवं समतेच, लोकशाहीचं जग दाखवलं. हे आपले मार्गदाते आपल्याला माहीत असले पाहिजेत, आपले हे आदर्श आधी समजून घ्या व त्यांच्या पावलांवर वाटचाल करा असे मत शेवटी जगदीश ओहोळ यांनी व्यक्त केले.

हेही वाचा – आपली मुले व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी पालकांनी काळजी घ्यावी : समाजप्रबोधनकार प्रबोधनकार ॲड . डॉ.बाबुराव हिरडे

कुंभेज येथील तरुणाचे यश, महाराष्ट्रातून पाचवा क्रमांक मिळवत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

या कार्यक्रमाचे आयोजन नवनिर्माण युवक संघटना बारामती यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी अनिल गलांडे, सुरज गलांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बारामतीत विविध राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली, सभा असतानाही नागरिकांनी व्याख्यानासाठी हजेरी लावल्याबद्दल आयोजकांनी सर्वांचे आभार मानले.

karmalamadhanews24: