क्राइममाढाशैक्षणिक

कमी गुण मिळतील, अपमान होईल या भीतीने तिने संपविले आयुष्य; आणि निकाल लागला तेव्हा मात्र.. माढा तालुक्यातील घटना!

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

कमी गुण मिळतील, अपमान होईल या भीतीने तिने संपविले आयुष्य; आणि निकाल लागला तेव्हा मात्र.. माढा तालुक्यातील घटना!

घोटी (ता. माढा) येथील अमृता दाजीराम लोंढे (वय 17) हिने दहावीला कमी गुण मिळण्याच्या भीतीपोटी शुक्रवारी निकाला दिवशीच आत्महत्या केली. सकाळी शेततळ्यात तिचा मृतदेह तरंगताना आढळला. मात्र, ती तब्बल 81 टक्के गुणांसह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याचे निष्पन्न झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, घोटी येथील दाजीराम लोंढे यांच्या दोन मुलींपैकी अमृता ही त्यांची मोठी मुलगी असून ती हुशार विद्यार्थिनी म्हणून शाळेत परिचित होती. अमृता हिने एप्रिल 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत तिला अपेक्षेप्रमाणे गुण मिळतील की नाही, याबद्दल संशय होता. यामुळे ती सतत तणावात होती. गुण कमी मिळाल्यास इतर लोक काय म्हणतील, यावरून ती तणावात होती. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांनाही जाणवत होती. त्यांनी तिला समजविण्याचा प्रयत्न केला होता; मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही.

गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ती घरातून कुणालाही न सांगता निघून गेली. ती घरात न दिसल्याने नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला; पण ती कोठेच आढळून आली नाही. शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरापासून दोन कि. मी. अंतरावरील शिवराम मोहन लोंढे यांच्या शेतात शेततळ्याच्या पाण्यावर तिचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले.

घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.टेंभुर्णी पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान दहावीचा निकाल दुपारी जाहीर झाला. यावेळी तिला तब्बल 81 टक्के गुण मिळाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे नाहक मानसिक तणावाखाली तिचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेने परिसरात व शालेय वातावरणात हळहळ व्यक्त होत आहे.

litsbros

Comment here