करमाळाक्राइमसोलापूर जिल्हा

खळबळजनक; करमाळा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांची पोखरापुरात आत्महत्या

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

खळबळजनक; करमाळा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यांची पोखरापुरात आत्महत्या

मोहोळ (सोलापूर) : पोखरापूर (ता. मोहोळ)  येथील जवाहर नवोदय विद्यालयातील   एका बारावीच्या विद्यार्थ्याने शौचालयाच्या खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली. देवानंद ज्ञानेश्वर भोसले (वय 17) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. दरम्यान, आमच्या मुलाने आत्महत्या केली नसून, त्यास आत्महत्येस प्रवृत्त कोणी केले? आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी तक्रार मृत देवानंदच्या नातेवाइकांनी केली. दरम्यान, वस्तुस्थिती समजल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका देवानंदच्या आई-वडील व नातेवाइकांनी घेतल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. आमची दखल घ्या, गरिबाला न्याय द्या, असे म्हणत नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात तसेच पोलिस ठाण्यात आक्रोश केला.


यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवानंद भोसले हा पारधी समाजाचा विद्यार्थी बारावीत शिकत होता. तो खूप हुशार होता. रात्री आठ वाजता सर्व विद्यार्थी भोजनालय कक्षात जेवणासाठी जातात, त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. हजेरी घेताना नेमका देवानंद अनुपस्थित दिसला. शिक्षकांनी चौकशी केली असता तो दिसून आला नाही. मात्र एका सदनातील शौचालय बंद असल्याचे दिसले. आत कोण आहे, असे शिक्षकांनी हाका मारल्या, मात्र आतून प्रतिसाद आला नाही.

ही घटना शिक्षकाने वरिष्ठांना व पोलिसांना कळविली. पोलिस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनीही हाका मारल्या, मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर दरवाजा तोडला. दरवाजा उघडताच देवानंद याने शौचालयाच्या खिडकीला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. मृत देवानंद याचा मृतदेह विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांसमक्ष उतरवला व मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला. दरम्यान, घटनास्थळाला प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे, पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी भेट दिली.


दरम्यान, मृत देवानंदची आई अश्विनी भोसले हिने, माझा मुलगा आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता, त्याच्यावर कोणी ही परिस्थिती आणली याची चौकशी झाली पाहिजे, महाविद्यालयाच्या विरोधात आमची तक्रार आहे, तसेच आमच्या पारधी समाजाचा तो एकमेव व हुशार विद्यार्थी होता. ज्यावेळी देवानंदने आत्महत्या केली त्यावेळी विद्यालय प्रशासनाने आम्हाला का कळवले नाही, आमच्या परस्पर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात का आणला, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज द्या, अशी मागणी करत सर्वांसमक्ष टाहो फोडला.


देवानंद हा मूळचा मांगी (ता. करमाळा) येथील रहिवासी होता. त्याचे प्रशासनात मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न होते. दरम्यान, आम्ही रात्रीपासून ग्रामीण रुग्णालयात बसून आहोत, आमची कुणीही दखल घेत नाही याचा राग मनात धरून देवानंदच्या आई-वडिलांसह इतर नातेवाइकानी सकाळी थोडावेळ मुख्य रस्ता बंद केला. त्यामुळे मोहोळ पोलिस ठाणे व ग्रामीण रुग्णालयात गोंधळाचे वातावरण होते.
देवानंद हा मी कलेक्‍टर होणार, असे तो सर्वांना सांगत होता, त्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती, हे सांगताना आई अश्विनीला दोन वेळा मुर्च्छा आली. देवानंदचा करमाळा तालुक्‍यात असताना हुशार विद्यार्थी म्हणून लोकप्रतिनिधीच्या हस्ते सत्कारही करण्यात आला होता. एवढा हुशार विद्यार्थी आत्महत्या करेलच कसा, असा प्रश्न आई-वडिलांनी उपस्थित केला. या प्रकरणी राजेंद्रप्रसाद विष्णुपंत नाडगौडा यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली असून, तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

litsbros

Comment here