********* एस टी स्टँडचं आवार **********
………………………………………………………
. प्रत्येक गावाचं एस टी स्टँड म्हंजे एक विशेष आकर्षण असतंय आणि त्यातल्या त्यात एखाद्या नामवंत बाजारपेठेच्या गावचं…तालुक्याचं..नाहीतर जिल्ह्याच्या गावाचं स्टॅन्ड…असेल तर तो एक नजारा असतोय म्हणजे बघा जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या परिसरात त्याचा गवगवा जाणवतोय आता त्याचा पोस्टाचा पत्ताच असा असतोय की बस स्टॅन्ड जवळ मग चारी दिशेला कुठं पण असा त्याचा भौगोलिक अर्थ असतोय
. आपल्या घरी एखादा पाहुणा आला तर संध्याकाळी पाच सहा वाजता आपण पाहुण्याला घेऊन हमखास रेल्वे स्टेशन नाहीतर बस स्टैंड वर आवर्जून जातो त्या बस आवाराला दोन प्रवेशद्वार असतात या दोन्ही दारातून दुकानाची दाटी… भरपूर पादचाऱ्यांची रहदारी… अशा स्थितीतून बस सुखरूप आत आणायची आणि बस बाहेर काढायचं एक दिव्य आमच्या ड्रायव्हर दादाला कराव लागतं दोन्ही गेटला लागूनच एक आतल्या बाजूला आणि दुसरं बाहेरच्या बाजूला असलेलं दिवसभर खुळखुळा वाजवणारं श्री कानिफनाथ रसवंती गृह आजूबाजूचं वातावरण वल्लं आणि गार करतं घुंगरावर गाणं म्हणणारं चरक माणसांची पावलं ऑटोमॅटिक गुऱ्हाळाकडं वळताना दिसतात आता बघा म्हटल्याप्रमाणे काही ठिकाणी आवाजावरून व्यक्तिमत्व कळतं आत गेल्यावर एक विशिष्ट प्रकारचा बसेस आल्या गेल्याचा तपशील माईकवरून एका खणखणीत आवाजात दिला जातो हे पण एक बस स्टॅन्ड वरच गुढ आहे
. मला एकदा सोयरीकीनिमित्त श्रीगोंद्यावरून अहमदनगर आणि पुढं देवीचं केडगाव सोडल्यावर चास या गावाला मिसाळ यांच्या घरी जायचं होतं स्टॅंडवर प्रवाशांसाठी बांधलेल्या मोठ्या इमारती जवळ उभा होतो कुतूहलापोटी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशावर नजर टाकत होतो माझ्या गाडीची वाट पाहत होतो बस स्थानकावर सर्वत्र सुंदर नक्षीदार पद्धतीची फरशी बसवलेली होती त्या फरशीवर मात्र बाहेर पावसाची मधीच येणारी भुरभुर त्यात पाऊस काळाच्या दिवसामुळं प्रवाशांची कायम चालू असणारी ये जा होऊन त्या फरशीवर मात्र चिखलांची एक वेगळीच नक्षी तयार झालेली होती बस स्थानकाच्या समोरच मैदानासारखं पटांगण होतं त्या पटांगणात येणाऱ्या गाड्या रांगेत उभ्या राहायच्या किंवा वळून बाहेरच्या दिशेने जायच्या पटांगणाच्या चारी बाजूने वेगवेगळी दुकानं होती पण त्यात एक छोटीशी टपरी होती त्या टपरीवर इतर दुकानाच्या मानाने गर्दी जास्त होती गुटखा तंबाखू खाणाऱ्यांची गर्दी झालेली होती तसेच नियमित अपडाऊन करणारे काही प्रवासी पण तिथे दिसले सुटा बुटात वावरणारे ते प्रवासी बघून नोकरदार आहेत हे समजलं जुलै महिना सुरू होऊन पंधरा दिवस झाले होते पावसाने नुकताच जोर धरला होता रिपरीप सतत चालू होती
. कालच रविवार संपून नवीन आठवड्याला सुरुवात झाली होती आणि ते ज्ञान पंढरीचे वारकरी रविवारची सुट्टी भोगून सोमवारी शाळेत जाण्यासाठी बस स्थानकावर आलेले होते शाळा खरंतर सकाळी 11 वाजताची होती संध्याकाळी 5 वाजता सुटलेली होती पण परगावची मुलं असल्यामुळे रोजची आपली ये जा पाचवीला पुजलेली दररोज ये जा करणं भागच होतं रविवारच्या आरामानंतर सोमवारी शाळेत जाण्यासाठी मनात एक उत्साह निर्माण झाला होता बस स्टैंड वर सर्वत्र प्रवाशांची रेलचेल दिसत होती वरूण राजामुळे बस स्थानकावर चिखलाचं साम्राज्य पसरलं होतं ठिकठिकाणी डबके साचलेली दिसत होते डबके चुकवत प्रवासी रस्ता काढत पुढे जात होते तर बसचे टायर त्या डबक्यात मनसोक्त आंघोळ करून पुढच्या प्रवासाला निघत होते आणि ज्या वेळेस मी बस स्थानकात आलो तेव्हा दुपारची वेळ होऊन साधारण पाच सहा वाजायला आले होते लोकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या सर्व वयोगटातील लोकं त्या रांगेत उभे होते सूटबूट घालणारे… कुर्ता टोपीवाले व्यापारी… मळके कपडे घालणारे कामगार… मी तिथे पाहिलेले आहेत त्यात काही गृहिणी तर काही महिलांच्या हातात लहान मुलं होती कोणी पेपर व कथेची चांदोबा पुस्तकं वाचत होती काही माणसं आपल्याच चर्चेत मग्न होती खरोखर लोकांचा हा मेळावा वेगळाच होता तेवढ्यात पाच नंबरची बस अर्ध्या तासानंतर आली लोकांनी बस मध्ये चढण्यासाठी गर्दी केली… कोणी खिडकीतून रुमाल… टोपी… टाकून जागा पकडू लागलं… कोणी ड्रायव्हरच्या केबिन मधून शॉर्टकटने बसमध्ये प्रवेश करू लागलं… आता वर चढणाऱ्या लोकांकडे बघून कंडक्टरनं एक…दोन…तीन…चार असं म्हणत जोरात ते खडखडणारं दार लावून बेल वाजवली
. क्षणात आणखी एक बस तिथे आली बस मागे येतानाच लोकांची बस मध्ये चढण्याची घाई सुरू झाली नंतर मात्र तासभर एक पण बस त्या मार्गावरची आली नाही मग प्रवासी वडाप करून निघून गेले पण मला तिथं एक द्रावक दृश्य बघायला मिळालं अशा गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावरचे अन त्यातल्या त्यात गर्दीमध्ये किरकोळ मनोरंजन करणारे कलाकार पण आपल्याला बघायला मिळतात असाच एक कलाकार हात की सफाई करत अवश्य या गर्दीच्या परिसरात फिरत असतो कारण प्रत्येकाची मनस्थिती ही गाडी कवा येती…आली तर जागा मिळलं का नाही… यांनी एक तर डोकं खराब झालेलं असतं अशातच एका म्हाताऱ्यानी कमरेला ठेवलेलं नोटाचं पुडकं एका पठ्ठ्यानी कवानुक भारत ब्लेडनं कापलं आणि पैसे लांबवले आता तिथे त्या म्हाताऱ्याच्या ओळखीचं कुणीच नव्हतं पण बघू कोणी ओळखीचं भेटतय का ह्या खोट्या आशेवर ती शांत बसलं होतं त्यात एकजण शहाणं आलं त्या म्हाताऱ्याची आस्थेने चौकशी केली काय झालं बाबा मी तास झाला बघतोय एक दोन गाड्या मोकळ्या गेल्या तेव्हा म्हातारं रडायला लागलं आणि त्यांनी सगळी कथा त्याला सांगितली त्याला पण दया आली तो पण हळहळला हशीलाला किती पैसे लागतात तसं म्हाताऱ्याने 30 रुपये सांगितल्यावर ह्यांनी पटकन 30 रुपये काढून म्हाताऱ्याच्या हातावर ठेवले म्हाताऱ्याने दोन्ही हात जोडून त्याचं आभार मानलं देवासारखा उभा राहिलाच बाबा पण इतक्यात बसने बेल दिली आणि बस चालू झाली म्हातारं बसमध्ये उभाचं होतं त्यानं खिडकीतनं बघितलं त्या मगाच्याच चौकटी सदऱ्यावाल्या माणसाला चार-पाच जण तुडवीत होते यांनं शेजारच्याला विचारलं काय झालं तर सांगितलं की त्यो खिसे कापू आहे त्यांनी रेड हॅन्ड पकडलं तवा कुदवीत होते तर असं हे जग
. आतमध्ये कॅन्टीन असून पण स्थानकाच्या गेट जवळ एका व्यापारी पिशवीत दोन जर्मलचे मोठाले डबे आणि कागदी डिश घेऊन एक मावशी पोहे आणि उपीट विकत होती तिथे पण बऱ्यापैकी चोखंदळ लोकांची गर्दी होती तेवढ्यात एक हातगाडी मी पाहिली त्या गाडीवर शेंगदाणे…खारे शेंगदाणे…फुटाणे…वाटाणे…असं प्रत्येक परातीत एक एक छोटसं मडकं त्या प्रत्येक मडक्यात एकच लाकडाची बॅटन पण कायम धूर निघायचा आलेल्या गिऱ्हाईकाला मडकं बाजूला करून तो गरम गरम शेंगदाणे द्यायचा आणि एक विशेष असं की त्याचं जी माप होतं ती कोणत्या कंपनीचं होतं ती मी अजून पर्यंत पाहिलं नाही कारण नरसाळ्याच्या सारखा कागदाचा लांब उभा साधारण वितभर कोन त्याच्यात ते एक मापटं शेंगदाणे नाहीतर फुटाणे त्या पुड्याचं झाकण खोलताना एक शेंगदाणा उडाला…एक खाली पिळणीत आडाकला… म्हणजे साधारण 10 रुपयाचे 14 किंवा 15 शेंगदाणे असावेत पण गडी संध्याकाळपर्यंत सातशे ते आठशे रुपये घेऊन जातो मानलं पाहिजे बुवा कारण येणारं गिऱ्हाईकच असं असतं की एकदा आलेलं गिऱ्हाईक परत यांच्याकडं कधी येत नसतं पण इथं गावातल्या दुकानदाराला त्याच गिर्हाईकाची पुन्हा पुन्हा अपेक्षा असते म्हणून ती दुकानदार इमानदारीने वागताना दिसतयं तीच गत रेल्वे स्टेशनवरच्या चहा अन बटाटा वड्याची असतीयं
. अन अजून एक मनात भरण्यासारखं दृश्य मी याचं बस स्थानकावर बघितलयं आता हे बघा हम रस्ता असतो तिथलं ग्रामीण भागातलं बस स्थानक काय एवढं भव्य नसतयं तरीपण त्याच्या अलीकडे एक थांबा असतो त्याला फाटा म्हणतात पण गावातील वस्तीमध्ये राहणारे लोक त्याला सडक पण म्हणतात सडकेपसनं गाव फर्लांगभर आत मध्ये असतं 70 वर्षाची आजीबाई मुक्काम गाडीने लेकीकडे जायला निघाली होती नऊवारी साडी नेसलेली…चापून चोपून विंचरलेले केस… कपाळावर मेण लावून रुपयाच्या नाण्याएवढं मोठं लाल भडक कुंकू…चेहऱ्यावरचे…हनुवटीवरचं… दाढीवरचं…गोंदणाचं ठिपकं.. त्या गोऱ्यापान सुरकुत्या चेहऱ्यावर सौंदर्याची मोलाची भर घालीत होतं… आजी एका दगडावर बसली होती समोरच पाच-सहा वाजताचा सुमार…सूर्य उतरणीला लागलेला पण ती सूर्याची कोवळी लकेर नेमकी आजीबाईच्या तोंडावर त्याच्यामुळे गोरीपान आजीबाई क्षणात घामाने डबडबल्याली दिसायला लागली चेहरा घामानी भिजला कारभारी सोडायला आला होता त्यांनी हा निसर्गाचा नजारा पाहिला नकळत योग घडून आला कारभारी तटकन उठला हातातली काठी टेकवत टेकवत आजीच्या समोर आडोसा धरून उभा राहिला काय सांगू मन गलबलून आलं कारभाऱ्याची सावली आजीवर पडली उन्हाची तिरिप अन ती दाहकता कमी झाली चेहऱ्यावरचा घाम कुठे गायब झाला ती कळालं पण नाही बाजूच्या वाऱ्याची झुळूक गार वाटू लागली अन एक वेगळीच तरतरी चेहऱ्यावर दिसू लागली तिथेच हे प्रेम आणि क्षण मला लैला मजनूच्या प्रेमासारखेच मोलाचे वाटले खरं प्रेम होतं ते…नैसर्गिक प्रेम होतं ते…दोघांच्या वाटेला आलं त्यांनी त्यांचा उपभोग घेतला
***************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002