आ.गोपीचंद पडळकर यांचे गाडी वरील सोलापुरातील दगडफेक: एक कारण मिमांसा
काल जून चे अखेरीस भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे गाडीवर 25वर्षाचे युवकाने अचानक समोरून येऊन दगड फेकला ज्यात त्यांचे गाडीची काच फुटली. ज्या युवकाने ही दगडफेक केली त्याचा पाठलाग काही लोकांनी केला परंतु अगोदरच तैनात असलेल्या मोटार सायकलवरून तो निसटण्यात यशस्वी झाला. याचा अर्थ ती घटना उस्फुर्त नव्हती तर ती नियोजनबद्ध रित्या घडवून आणलेली होती.
पुणे येथे जनरल अरुण कुमार वैद्य यांची हत्या करताना खलिस्तान वादी हर् जिंदर कौर आणि सुखदेव यांनी अश्याच प्रकारे यामाहा मोटारसायकल चा वापर केला होता. हे दहशतवादी कृत्य 10ऑगस्ट 1986 साली घडले होते. आ गोपीचंद पडळकर यांचा आणि माझा संबंध हा धनगर आरक्षण प्रश्नावरून चाललेल्या अखेरच्या लढा चे निमित्ताने आला होता. यातील माझी भूमिका लेखक, वैचारिक मांडणी करण्याची होती व ती मी प्रामाणिकपणे पार पाडली.
माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी या चळवळीचे गठण केले होते व अगदी नियोजन बद्ध रित्या ही चळवळ महाराष्ट्र राज्य पातळीवर पोहचवण्यात ते यशस्वी झाले होते. धुमस नावाचा चित्रपट निर्माण करण्याची त्यांची योजना होती व या निमित्ताने आम्ही महाबळेश्वर येथे 8दिवस एकत्रित रहात होतो, या दरम्यान त्यांची विचारसरणी मला परिचित झाली होती. त्यांचा वंचित मधे झालेला प्रवेश ही फक्त राजकीय सोय होती.
त्यांचे विभागातील खा. संजयकाका पाटील यांचेशी त्यांचे मतभेद तीव्र होते ते राष्ट्रवादीतून भाजपात आले होते व खासदार झाले होते. भाजपा त्यांचे तिकीट कापून गोपीचंद पडळकर यांना देईल अशी सुतराम शक्यता नव्हती, आपल्या कडे जात गठ्ठ्याचे जे राजकारण चालते त्यातून महादेव जानकर यांनी निर्माण केलेला रासपा हा पक्ष व त्या पक्षाचे माध्यमातून युवा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी आक्रमकपणे केलेले काम यातून धनगर समाज गठ्ठा त्यांचे मागे उभा होता.
महत्वकांक्षा चे फुटलेले पंख घेऊन ते रासपा मध्ये थांबणे शक्य नव्हते त्यातून ते भिडे गुरुजींच्या सानिध्यात आले आणि राजकीयदृष्ट्या त्यांना भाजपा जवळचा होता.
याचे कारण काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर असणाऱ्या मराठा जाती समूहाचे वर्चस्वात आहे.
या पक्षात धनगर, दलीत आदी वर्गाला राजकीय स्पेस अजिबात शिल्लक नाही. गोपीचंद पडळकर यांनी लोक सभेची निवडणूक लढवायचे निश्चित केल्या नंतर त्यांनी काँग्रेस कडून ही प्रयत्न केले होते त्यात ते यशस्वी झाले नाहीत तेव्हा नव्याने वंचित द्वारे स्थापित झालेल्या जन समुदायाची मते डोळ्या समोर ठेऊन त्यांनी वंचित मधे प्रवेश केला हा त्यांचा प्रवेश लिव्ह इन रिलेशनशिप सारखा होता.
या पक्षाच्या मर्यादा ही त्यांच्या लक्षात आल्या आणि ते वेळीच मूळ भाजपाकडे जाण्याचे त्यांनी निश्चित केले.
धनगर समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून भाजपने गोपीचंद कडे पाहिले तसेच ते उत्तमराव जानकर यांचे कडे ही पाहिले. महादेव जानकर हे भाजपचे सहयोगी होते ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणून स्व पक्षाचा विकास हे सूत्र ठेऊन भाजपने यांना विधान सभेच्या निवडणुका लढवण्यास सांगितले. बारामती ची जागा गोपीचंद यांना देण्यात आली, आपल्या आक्रमकतेने ते अजित दादाना थोपवतील अशी अटकळ यात होती.
आपण हारणारी लढाई लढतो आहोत याचे भान गोपीचंद पडळकर यांना होते तरीही धनगर समाज साथ देईल हा त्यांचा अंदाज फोल ठरला याचे कारण स्थानिक पातळीवर धनगर समाजातील राजकीय नेत्यांनी त्यांचे हित संबंधातून जे पवार घराण्याकडून मिळवले होते ते गमावण्याची तयारी त्यांची नव्हती याचाच वापर करून याच नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना लज्जास्पद पराभवास सामोरे जाण्यास भाग पाडले गेले. यातून वांरवार जी हेटाळणी अजितदादा कडून होत होती त्यातून अपमानास्पद वर्तन म्हणून या दोघातील कटुता ही व्यक्तिगत पातळीवर प्रक्षेपित झाली.
दुसरे नेते उत्तमराव जानकर हे भाजप मधेच होते व त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी चा त्याग करून भाजपात आले होते. तरी ही उत्तमराव जानकर यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे च काम केले या बदल्यात माळशिरस राखीव विधानसभेवर भाजपा तिकीट देईल हा त्यांचा आशावाद मोहिते पाटील यांचे प्रखर विरोधा मुळे मावळला. त्यांना फलटण येथून उमेदवारी लढवावी असे सांगण्यात आले पण ते त्यांनी नाकारले व राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली. या मागे अटकळ ही होती की त्यांचा स्वतः चा धनगर समाजाचा गठ्ठा व त्यात राष्ट्रवादीची सुमारे 40 हजार मते गृहीत होती तो अंदाज राष्ट्रवादी सहयोगी व राष्ट्रवादीतील अंतर्गत विरोधक यांचे मुळे फोल ठरला.
याचाच अर्थ या नेत्यांपैकी विचारधारे आधारे राजकारण न केले जाता व्यक्तिगत राजकीय लाभासाठीचे तडजोडी होत्या. भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे शब्दाला दिलेली किंमत लक्षात ठेऊन गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेच्या रिक्त जागेवर संधी दिली. अशीच संधी त्यांनी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांना ही दिली.
मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादीचे कडवे विरोधक आहेत यात शंका घेण्याचे कारण नाही. परंतु हा विरोध व्यक्तिगत पातळीवर तितका कडवा नाही तो राजकीय विरोधाचा भाग आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी व काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उभे करतील परंतु त्यासाठी व्यक्तिगत खालच्या पातळीवरील टीका करणार नाहीत. धनगर आरक्षण लढा चालू असताना या दुक्कलीने गुजरात मधून हार्दिक पटेल यांना ही बोलावले होते व या मेळाव्यात मोदीवर ही अगदी कठोर टीका केली होती. राजकारणात बोलले पाहिजे हे खरे आहे बोलणाऱ्याचे अंबाडे विकतात न बोलणाऱ्याचे गहू ही विकत नाहीत. बोलणे ही कला आहे ती जमली पाहिजे प्रत्येक बोलणे हे वक्तृत्व ठरतं नाही, शब्द हे शस्त्र आहे असे म्हणतात व ते जपून वापरता आले पाहिजे.
नाही तर त्याचे बुमरँग होते, शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा, शब्दच विझवतात आग.. अस हे आहे. मला बोलण्यामुळे सारे काही मिळेल हा त्यांचा समज दुर्दैवी आहे, आपल्या पेक्षा राजकारणात अनुभवी असलेली व वयाने ही ज्येष्ठ असलेली व्यक्ती यांचा आदर करताच आला पाहिजे. हे साधे तत्व आहे व हा राजकीय तसेच व्यक्तिगत सुसंस्कृततेचा ही भाग आहे. तुमची मते मला मान्य असतीलच असे नाही पण तुमचे मत तुम्हाला मांडता आले पाहिजे त्यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईत मी तुमच्या सोबत खांद्यास खांदा लाऊन लढेन असे ग्रीक विचारवंत थुसिडाईस म्हणत असे.
कोणत्याही नेत्या मागे कोणताही समाज एक मुखी एकवटत नाही ही बाब लक्षात घेणे आवश्यक आहे आणि ती गोपीचंद पडळकर आणि भाजपाने ही ध्यानात घेणे गरजेचे आहे. #रात_गेली_हिशोबात #पोरग_नाही_नशिबात अश्या भाष्या संसदीय चौकटीत बसत नसतात. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मांढरे यांनी लगेच गोपीचंद पळकर यांचे वर टीका केली मांढरे हे ही धनगर समाजाचे आहेत. आ गोपीचंद पडळकर यांचा राग महाराष्ट्रातील राजकीय घराणेशाही वर आहे हे वास्तव आहे परंतु ते ज्या पद्धतीने मांडणी करत आहेत त्यातून भारतीय जनता पक्षाची ही कोंडी होईल यात मला तरी शंका नाही. भाजपात असलेली अनेक मंडळी यातून ही आलेली आहेत ज्यात नगर चे विखे पाटील, अकलूजचे मोहिते पाटील, कोकणातील नारायण राणे आदी त्यांचे काय?? असा ही प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो.
हा दोष प्रदीर्घ राजवटीतील दोषाचा आहे व तो आ. गोपीचंद वडाळकर किंवा माझ्या सारख्या माणसाला खटकतो म्हणून चुटकी सरशी दूर होणारा ही नाही.
गोपीचंद पडळकर व रणजीत सिंह मोहिते पाटील यांना एकाच वेळी भाजपाने विधान परिषदेचे आमदार बनवले,
या दोघांचे वर्तनात जमीन अस्मानाचा फरक आहे. सारे बदल मीच घडवून आणेन असा भ्रामक आशावाद घेऊन आ गोपीचंद पडळकर व्यवस्था विरोधात युद्ध छेडू पाहतात यात त्यांचे नवागतपण आहे अनुभव हीनता आहे.
हेही वाचा-यंदाच्या गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर;कसा असेल गणेशोत्सव? वाचा- सविस्तर
मानव संरक्षण समिती च्या करमाळा तालुक्याच्या ‘या’ विविध पदाधिकार्यांच्या निवडी जेऊर येथे जाहीर
दुबई येथे झालेल्या 2016 मधील शायरी मैफिलीत शबिना आदिब यांनी गायलेली गझल अप्रतिम आहे.
जो खानदानी रईस है वो
मिजाज रखते है नर्म अपना
तुम्हारा लहजा बता रहा है
तुम्हारी दौलत नयी नयी है
के जरासा कुदरत ने क्या नवाजा
के आके बैठे हो पहली सक मे
अभी से उडने लगे हवा मे
अभी तो शौरत नयी नयी है
भारतीय राजकारणात जाती आहेत व जातीचे म्हणून नेतृत्व स्थापित होणे हेच मुळात घातक आहे, यातून जातीचा उध्दार होत नाही पण नवीन नेते जन्माला येतात तर पवार साहेबासारख्या नेत्याकडे ही जात जातीय अस्मितेने पाहत असेल तर या दोन जातीय अस्मीतेत टकराव होईल तो टकराव राजकीय व सामाजिक दृष्ट्या परवडणारा नाही. फार पूर्वीची व सर्वांना माहीत असलेली राजा व माकडाची गोष्ट ज्यात माकड राजाचे लाडके असते व त्याचे कारण राजावर ही त्या माकडाचे प्रेम असते त्यातून राजा झोपला असताना एक माशी राजाला उपद्रव करते हे पाहून माकड तलवार उचलून माशीला मारते, जी राजाचे नाकावर बसलेली असते, माशी उडून जाते व राजाचे नाक तलवारीने कापले जाते.
भाजपा सारख्या धुरंधर पक्षाने हे अवलोकीत करणे आवश्यक आहे.
तूर्त इतकेच….
ऍड अविनाश टी काले
अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर
Comment here