Uncategorized

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 60 कोटींचा निधी द्या- सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी 60 कोटींचा निधी द्या- सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची मागणी

सोलापूर : गेल्या दीड महिन्यात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे 79 हजार 440 शेतकर्‍यांच्या 67 हजार 194.39 हेक्टर क्षेत्राला फटका बसला. त्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 60 कोटी 18 लाख 1 हजार 945 रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, असा प्रस्ताव गुरुवारी शासनाला पाठवला आहे.
सोलापूर जिल्ह्यात मागील दीड महिन्यात अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेती पिकांसह काही ठिकाणी जनावरे, तर काही ठिाकणी वीज, भिंत अंगावर पडून काही जणांना प्राणही गमवावे लागले होते. जिल्ह्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हाता-तोंडाला आलेली पिके ऐन काढणीवेळी पाण्यात गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडेच मोडले होते.

जिल्ह्यातील 51 हजार 458 शेतकर्‍यांच्या 47 हजार 884.10 हेक्टर जिरायत शेतीचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 32 कोटी 56 लाख 11 हजार 880 रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
23 हजार 628 शेतकर्‍यांच्या 15 हजार 865.59 हेक्टर बागायती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यासाठी 21 कोटी 41 लाख 85 हजार 465 रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. 4 हजार 354 शेतकर्‍यांच्या 3 हजार 444.70 हेक्टर फळबांगाना फटका बसला आहे.


त्यासाठी 6 कोटी 2 लाख 4 हजार 600 रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. अशा एकूण 79 हजार 440 शेतकर्‍यांच्या 67 हजार 194.39 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला.

त्यासाठी 60 कोटी 18 लाख 1 हजार 945 रुपयांच्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी शासनाला पाठविला आहे. शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी विविध शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांच्यावतीने करण्यात आली होती.

त्यासाठी राज्य शासनावतीने 10 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. त्यापैकी जिल्ह्याला सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे.

दोन हेक्टरपर्यंत शेतकर्‍यांना मिळणार भरपाई
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 2 हेक्टरपर्यंतच नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी 10 हजार, बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये, तर बहुवार्षिक तसेच फळबांगासाठी प्रतिहेक्टरी 25 हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. शासनाकडून निधी मिळताच थेट शेतकर्‍यांच्या नावावर पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

litsbros

Comment here