कोरोनात आई बाबा गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा मदतीचा हात; सलग चौथ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोरोनात आई बाबा गमावलेल्या बालकांना जगदीशब्द फाउंडेशनचा मदतीचा हात; सलग चौथ्या वर्षी केले शैक्षणिक साहित्याचे वाटप

करमाळा(प्रतिनिधी); ‘शब्दांना कार्याची जोड!’ हे ब्रीद घेऊन सामाजिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे व्याख्याते व लेखक जगदीश ओहोळ यांचे जगदीशब्द फाउंडेशनचे वतीने कोरोना काळात आई वडिलांचे निधन झालेले किंवा एकल पालक राहिलेले अनाथ, गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत, त्यांना आर्थिक, मानसिक, शैक्षणिक आधार मिळावा व त्यांनी शिक्षण पूर्ण करावे या हेतूने करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम , शेटफळ ना. हिसरे या गावातील आशा बालकांचे शैक्षणिक पालकत्व ‘जगदीशब्द फाउंडेशन’च्या वतीने घेण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व ‘जग बदलणारा बापमाणूस’ या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या विचारांतून असे विधायक काम सुरू आहे. या विद्यार्थ्यांना मागील सलग चार वर्षांपासून फाउंडेशनच्या वतीने सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. यावर्षी यात हिसरे येथील विद्यार्थ्यांची भर झाली असून सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवारी करण्यात आले.

यावेळी जगदीशब्द फाउंडेशनचे संस्थापक जगदीश ओहोळ, उद्योजक अशोक शिंदे, कवी तानाजी शिंदे, जगदीशब्द फाउंडेशच्या सचिव छाया जायकर, सोगाव येथे गावातील स्वप्निल गोडगे (माजी सरपंच), नारायण भोसले, अनिल भोसले, भरत भोसले, पविन भोसले, नितीन भोसले, हर्षद भोसले, तर हिसरे येथे दिलीप ओहोळ, संतोष ओहोळ,दादा पवार सुजित पवार, रोहित ओहोळ, तायाप्पा सातपुते, अलीम शेख, संघर्ष पवार यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एखाद्याला भुकेल्या व्यक्तीला आपण अन्न दिले तर त्याची एकवेळची भूक भागेल, पण योग्य वेळी त्यास जर शिक्षण दिले तर तो भाकरीसाठी कोणासमोर हात पसरणार नाही. त्यामुळे आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक गरजापूर्ती व जनजागृती वर भर दिलेला आहे. कोरोनात आधार हरवलेल्या बालकांना बळ देणे हे आपले कर्तव्य होते ते आम्ही खंड न पडू देता करत आहोत. 

– जगदीश ओहोळ, वक्ते व प्रमुख जगदीशब्द फाउंडेशन

जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने मागील सलग चार वर्षांपासून आमच्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिले जात आहे, याचा आधार वाटतो. शैक्षणिक साहित्याच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. सर्वच पालक ती खरेदी करू शकतातच असं नाही, सबब अनेक गरीब अनाथ बालकं शाळा सोडतात पण अशा प्रकारे जगदीश ओहोळ सरांनी दरवर्षी आमच्या लेकरांना शैक्षणिक साहित्य दिल्याने त्यांना शाळेत जायला हुरूप येतो, ती आनंदने शाळेत जातात. 

– अंजली गोसावी, विद्यार्थ्यांची आई, सोगाव पश्चिम

सध्या कुणालाही इतरांचं पाहायला वेळ नाही, पण आमच्या मुलींच्या शिक्षणाची काळजी घेऊन जगदीश ओहोळ सरांनी हे शैक्षणिक साहित्य इथं गावात आणून दिले, आमच्या लेकरांना शाळा शिका, शिक्षण सोडू नका, पुढं उच्च शिक्षण घ्या असं सांगितलं त्याने खूप आधार वाटला. 

– सुप्रिया हरी काळे, विद्यार्थ्यांची आई, हिसरे

karmalamadhanews24: