सांगोला तालुक्यातील विद्यार्थी इतिहास घडवतील
प्रा. गणेश करे- पाटील.
गुणवंत विद्यार्थी गौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन…
केत्तूर ( अभय माने) इंग्रजी भाषा कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक संघाने विशेष प्रयत्नाने उंचावली असून येथील विद्यार्थी गुणवत्तेचा इतिहास घडवतील असे मत प्रा. गणेश करे- पाटील यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सांगोला तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष फिरोज आतार व सचिव बाळासाहेब नवत्रे यांचे सांघिक प्रयत्न विशेष कौतुकास्पद असल्याचे प्रा.करे-पाटील यांनी आवर्जुन सांगितले.
इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत सांगोला तालुक्यातील सर्व प्रशालेत इंग्रजी विषयात प्रथम क्रमांकांने यश मिळवलेल्या सांगोला तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रा. करे-पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
सोलापूर जिल्हयातील इंग्रजी भाषेसाठी विशेष योगदान देणाऱ्या इंग्रजी अध्यापक संघातील शिक्षकांसाठी लवकरच इंग्रजी भाषा कॉन्फरन्सचे यशकल्याणी संस्थेच्या पुढाकाराने परदेशात आयोजन करण्यात येणार असल्याचे सूतोवाच या प्रसंगी प्रा. करे-पाटील केले.
याप्रसंगी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील, प्रमुख पाहुणे जिल्हा संघाचे माजी अध्यक्ष प्रा.गुरूनाथ मुचंडे, विद्यमान अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, उपाध्यक्ष प्रा.शशीकांत चंदनशिवे, यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनचे संचालक व करमाळा तालुकाध्यक्ष, प्रा. कल्याणराव साळुंके, जीवन शिक्षण फौंडेशनचे अध्यक्ष प्रा.जयेश पवार, सिंहगड कॅम्पसचे संचालक प्रा. संजय नवले सांगोला तालुका अध्यक्ष फिरोज आतार, सचिव, बाळासाहेब नवत्रे उपस्थित होते.
इंग्रजी भाषेसाठी योगदान दिलेले शिवणे विद्यालयाचे शिक्षक हेमंत रायगावकर सर व डोंगरगाव येथील महात्मा फुले विद्यालयाचे संजय देवकते सर या दोघांना तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
सांगोला विद्यामंदिर प्रशालेची कु. अपूर्वा अजित पाटील हिने बोर्ड परीक्षेत इंग्रजी भाषा विषयात 99 गुण मिळवल्या बद्दल तिला सांगोला तालुका अध्यापक संघाकडून प्रा. करे-पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
इयत्ता दहावीमध्ये उज्वल यश मिळवत इंग्रजी विषयात प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व . गुणवंत विद्यार्थ्यांना पालकांसह अध्यक्षांचे हस्ते सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापकपदी बढती मिळाल्या बद्दल परवीन बागवान व राजेंद्र कांचनकोटी यांचाही सन्मान करण्यात आला.
संघटनेच्या कार्याचा आढावा तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष फिरोज आतार यांनी घेतला.
प्रास्ताविक सूर्यकांत कांबळे यांनी केले. सूत्रसंचलन संघाचे सचिव बाळासाहेब नवत्रे यांनी केले तर राजेंद्र कांचनकोटी यांनी उपस्थितांचे आभार मानले.