दुःखद बातमी: लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकताच बापानेही घेतला जगाचा निरोप

दुर्दैवी: लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकताच बापानेही घेतला जगाचा निरोप

राशीन: एकुलत्या एक विवाहित लाडक्या लेकीच्या मृत्यूची खबर ऐकताक्षणीच बापानेही इहलोकीचा निरोप घेतला. बाप आणि लेकीवर काळाने अवेळी घातलेली ही झडप राशीनसह परिसरातील लोकांच्या जिवाला चटका लावून गेली. बाप आणि लेकीच्या जाण्याने नातेवाइकांनी फोडलेला टाहो आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रंदनात अवघी देशमुखवाडी शोकसागरात बुडाली. ही घटना शुक्रवारी घडली.

अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाक्षी सोमनाथ पवार (वय ३४, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. याची खबर त्यांचे वडील भागवत विष्णू दंडे (वय ६५, रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) यांना समजता क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

बाप-लेकीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने राशीनसह परिसरात हळहळ करीत चर्चा सुरू होती. मीनाक्षीच्या मागे पती, दोन मुले आणि सासू-सासरे, तर दंडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंडे, असा परिवार आहे. दंडे हे पैलवान असल्याने राशीनमध्ये वस्ताद नावाने सुपरिचित होते. मीनाक्षीवर डोर्लेवाडी येथे, तर दंडे यांच्यावर देशमुखवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line