दुर्दैवी! ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू

दुर्दैवी! ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू

विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र थांबता थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या जखमा ताज्या असतानाच समृद्धी महामार्गावर आणखी एक भयानक दुर्घटना घडली आहे. 

महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू आहे.या ठिकाणी एकूण १७ कामगार आणि ९ इंजिनिअर काम करत होते. सोमवारी रात्रीच्या सुमारास पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा कामगार जखमी असल्याची माहिती आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजूनही बचावकार्य सुरू असून आता या क्रेन व ग्रेडर खाली किती जण दाबले गेले आहेत, हे संपूर्ण ग्रेडर बाजूला केल्यावर समजले. गेल्या महिनाभरात समृद्धी महामार्गावरील अपघाताची ही दुसरी मोठी घटना असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line