दुर्दैवी! दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

दुर्दैवी! दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 वर्षे रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गूळदगड (वय 45 वर्षे रा.शेवते ता.पंढरपूर जि.सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावं आहेत. गुरुवारी दुपारी 3.30 च्या सुमारास ही घटना घडली. या दुर्देवी घटनेमुळे आटपाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. आटपाडी तलावात पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी हे दोघे जण गेले असताना त्यांना विजेचा शॉक बसला, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला.


वीजप्रवाह पाण्यात उतरला अन्..
अनिकेत विभूतेची माडगुळे इथे शेती आहे. त्यासाठी आटपाडी तलावातून 12 किलोमीटरची पाईपलाईन करुन पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी अनिकेत आणि त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणी कमी झाल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे दोघांनाही विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. तलावाजवळच्या काही लोकांनी ही घटना पाहिली.
काहींनी घटनास्थळी धाव घेतली. वीजप्रवाह बंद करुन दोघांनाही तलावातून बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात नेले, पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आटपाडी तलावातून शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाईपलाईन करुन पाण्याची सोय केली आहे. माडगुळे येथील सोमनाथ विभुते आणि मधुकर विभुते यांच्यासह चार-पाच जणांची सामुदायिक पाईपलाईन आहे. तलावातील पाणी साठा कमी झाल्याने विद्युत मोटर पुन्हा पाण्यात बसवावी लागत आहे.

दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
सोमनाथ विभुते यांनी अनिकेत विभुतेला ‘मोटर पाण्यात सोडण्यासाठी जाऊ’ असे सांगण्यासाठी फोन केला. यावेळी अनिकेतने ‘मी आटपाडी येथे आहे. तुम्ही तुम्ही येऊ नका मी मोटर बसवतो’ असे सांगितले. त्यानंतर अनिकेत विभुते हा पंढरपूर तालुक्यातील शेवते गावातून आलेल्या विलास गुळदगड आणि सखाराम पाटील या नातेवाईकांना घेऊन तलावावर गेला. सखाराम पाटील हे बांधावर थांबले. तलावाच्या बांधावरुन अनिकेत विभुते आणि विलास गुळदगड यांनी विद्युत मोटर पाण्यात ठेवली. यावेळी दोघांना अचानक विजेचा शॉक बसला आणि ते पाण्यात पडले. या घटनेत दोन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

karmalamadhanews24: