दुर्दैवी: दोन दिवसांपूर्वी लग्न ठरलेल्या वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

दुर्दैवी: दोन दिवसांपूर्वी लग्न ठरलेल्या वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू

वीजेच्या खांबावर काम करत असताना वीजप्रवाह अचानक सुरु झाल्याने अवघ्या 25 वर्षीय अमित प्रकाश माने या तरुण वायरमनचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबेत घडली. महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महावितरणच्या गगनबावडा उपविभागांतर्गत येणाऱ्या पळसंबेत अमित कंत्राटी वायरमन म्हणून काम करत होता. बुधवारी दुपारी वीजपुरवठा दुरुस्त करण्यासाठी विजेच्या खांबावर चढला असतानाच विजेचा धक्का बसला. यानंतर अमितला उपचारासाठी गगनबावडा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. 

दोन दिवसांपूर्वीच विवाह ठरला

अमितचा अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाह निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असताना त्याच्या दुर्दैवी मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई, वडिल आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. 

अमितच्या मृत्यूने ग्रामस्थ आक्रमक

अमितच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. तालुक्यातील आसपासच्या ग्रामस्थांनी गगनबावडा उपविभागीय महावितरण कार्यालयावर धाव घेतली. यावेळी गगनबावडा येथे मोठ्या संख्येने जमाव जमा झाला. महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे घटना घडल्याचे सांगत संबंधित कर्मचाऱ्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी येथे येऊन ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका जमावाने घेत ठिय्या आंदोलन केले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी गगनबावड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी फौजफाटा मागवून घेतला. घटना घडून पाच तास उलटले तरी वरिष्ठ कार्यालयाचे अधिकारी पोहोचू शकले नव्हते. त्यामुळे जमाव संतप्त झाला. कोल्हापूर ग्रामीणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता साळी हे रात्री साडेसातच्या सुमारास दाखल झाले. त्यांनी दिलेले आश्वासन अमान्य झाल्यामुळे रात्री नऊ वाजेपर्यंत तोडगा निघाला नाही.

karmalamadhanews24: