राज्यात पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांना झोडपून काढणार
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळीमुळे खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान, पुढील काही दिवस अवकाळीचं संकट कायम राहिल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या ४८ तासात राज्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. शेतकऱ्यांनी शेतीपिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवार आणि शुक्रवारी मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण आदी ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
वादळी वाऱ्याचा जोर जास्त असल्याने काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना देखील घडल्या. पावसामुळे काही भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
येत्या ४८ तासांत या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
दरम्यान, येत्या ४८ तासांत मुंबई, पुणे ठाणे आणि पालघरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज आहे.