राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस 

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात दमदार पाऊस कोसळत आहेत. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत राज्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी आणखीच पोषक वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धुव्वाधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.

हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोकणात अतिवृष्टी, तर कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. त्याचबरोबर धरणांमधील पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे.

परतीच्या पावसाला लवकरच होणार सुरुवात

यंदा भारतातील मान्सूनचा कालावधी संपला असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यातून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधील विविध भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु आहे. महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्यास सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागानं दिलेली आहे.

karmalamadhanews24: