आम्ही साहित्यिककरमाळासोलापूर जिल्हा

** पोमाईच्या कुशीत हरवलेलं बालपण **

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

** पोमाईच्या कुशीत हरवलेलं बालपण **

…………. आता बघा या धकाधकीच्या जीवनात म्हणजे बरीच धावपळ जिथं तिथं घाई गडबड… घोंगाट…गर्दी…आणि अशा या गराड्यात कोणाचं तरी काहीतरी हरवत असतयं कोणाची ऐन टायमाला छत्री हरवती… कोणाचे पैसे हरवतात…तर कोणाचे शब्द हरवतात…आणि कोणाचं तरी नातं हरवतयं… पण एक आहे इथं माझं बालपण हरवलंय कारण याचा विचार जर करायचा झाला तर आपल्याला सुमारे 60 वर्ष मागं भूतकाळात जावं लागल मनाच्या डी.व्ही.डी.मध्ये ती जी काय आठवण डोळ्यासमोर येईल त्याची सी.डी. लावावी लागेल तवा याचा थोडा उलगडा होईल आता नातं हरवलं म्हणजे आमचा सख्खा मामा आम्ही राहतो तिथं पासन एक सात आठ किलोमीटरवर आईचं माहेर तवा माझं वय असेल 8-10 वर्षाचं नवीनच सायकल शिकलो होतो शाळेला पण चार-आठ दिवस नाताळच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या मी आपली आंघोळ केली चांगले कपडे घातले पचपचित तेल लावलं भांग पाडला आणि गेलो मामा काय घरी नव्हता कारखान्यावर कामाला जायचा गेल्यावर मी काही तसा मोठा झालो नव्हतो की मानपान आदर सत्कार नाही केला तर नाराज होईल किंवा राग येईल पण मामी लई खोडीची तिने कधी कुणाला जवळ केलं नाही मी गेल्यावर मामी थोडं उडत उडत बोलली आणि म्हणती कशी मामा घरी नाही एक-दोन दिवस तालुक्याला गेले आहेत म्हणजे शेताचं काहीतरी काम आहे आता मला सांगायची गरज नव्हती दुपार झाली दुपारची जेवायची काही विचारपूस नाही का काय नाही मी आपला दोन-तीन वाजता दुपारी निघून परत चार वाजता माझ्या घरी आलो तर बघा मामा घरी नव्हता काय घरातलं सगळं सामान घेऊन गेला होता व्हय पण काय करायचं हिला नातं ही घोळवायचं नव्हतं तेव्हाच मला थोडी कुणकुण लागली होती की इथं कुठं तरी नातं हरवलयं ही झाली पहिली पायरी

पण मी माझे विचार किंवा भावना आपल्याकडे पाठवायचं कारण की आपण पण पडताळा करावा कारण या लेखांमध्ये खरं बघाय गेलं ते हितं माझं बालपण हरवलंय ती काय कुणी हिसकून घेतलेलं नाही तर खरंतर माझं बालपण सोलापूर जिल्ह्याच्या नकाशावर तालुक्यासारखं उठून दिसणारी पोमलवाडी गाव माझं वय असेल 8-10 वर्षाचं तवाचं आपण थोडं थोडं बघू आता ही वय म्हणजे अगदी पाळण्यातलं बघू… पाळण्यातल्या बाळाला शि सु झालेली पण कळत नाही पण या वयाला सर्व जाणिवा असतात फक्त आकलन आणि समज नसती नुकतंच शाळेच्या विश्वामध्ये पाय टाकून वर्ष दोन वर्षे झालेली असतात ती पण भविष्यामध्ये काहीतरी किंवा कोणीतरी मोठे व्हायचंय म्हणून सारा आटापिटा हा त्यात आपण सकाळी उठल्यापासन रात्री झोपाय पर्यंत जो वेळ घालवतो ती बालपण कारण महान कवीने म्हटल्याप्रमाणे ” बालपणीचा काळ सुखाचा ” कारण आर्थिक पार्श्वभूमी कशीही असली तरी कोणत्याच गोष्टीचं टेन्शन आपल्यापर्यंत येत नसतं.

आता माझं बालपण म्हणजे काही काही गोष्टीत एक वेगळीच मजा होती माधवरावच्या किराणा दुकानात दोन-चार जिनसा आणायला गेल्यावर एखादी दोन पाच पैशाची लिमलेटची गोळी खाल्लीच आणि ती पण बिन विचारता म्हणून आईचा असा काय मार बसायचा की सगळा पुढचा कार्यक्रम माहिती पण असायचा तरीपण अगोदर आपलं तोंड गोड करून घ्यायचं आणि तेव्हा म्हणाल तर खेळ कसले एक रुपया पण भांडवल जमायचं नाही सगळं कसं नैसर्गिक…समजा कबड्डी नाहीतर शिवणा पाणी खेळताना पडलं गुडघ्याला लागलं तर कसलं आलयं आयडीन – ड्रेसिंग आणि कसलं आलयं आयोडेक्स आपलं लागलेल्या जागी ह्यो तंबाखूच्या डबीतला नखानी चुन्याचा गोळा काढायचा आणि लावायचा नाहीतर आपली लग्नाच्या आधीच चिमूटभर हळद घेऊन आपल्याच हाताने आपल्या अंगाला लावायची डब्बा डब्बी खेळताना त्यासाठी चिंध्याचा बॉल असायचा येथे विटी दांडू साठी दांडू तर लय भारी एक दीड दोन फुटाची झाडाची सरळ बघून फांदी घ्यायची वितभर लांबीची विटी तवा काही कुऱ्हाड किंवा वाकस नव्हती आपलं तोडीच्या दगडाचा चपटा कपचा घेऊन छोटेसं सुतार काम करायचं भवऱ्याच्या आरी दगडाने ठेचायच्या आधी कोळशाच्या इस्त्या मध्ये लाल करून स्क्रू ड्रायव्हर सारखी चपटी आरी करायची समोरच्याच्या भवऱ्याची दोन-चार फटक्यात वाट लागायची आणि तीच गत होती आंब्याच्या कोया बांगडीच्या काचा सोडा लेमन च्या बाटलीचे बिल्ले गोट्या हडक्या ही आमची खेळायची प्रॉपर्टी खेळायच्या नादात आईने मारलेल्या हाका कानामागं टाकायच्या मग आई येऊन मानापानानी म्हणजे मुंडकं धरून मान धरून घेऊन घरी नेऊन राहिलेला दोन चार फटक्याचा मानपान करायची ती वेगळच पण एक कळलं नाही की आता तवा लक्षात आलं की आपलं बालपण कुठेतरी हरवलयं जसं जसं आपण मोठं होत गेलो तशी आपण आपली जीवनशैली गुंतागुंतीची करून बसलोय.

लहानपणी असलेलं निरागस… सतत उत्साही…आनंदी व्हर्जन…मोठं होता होता खरच हरवलयं मोठं झाल्यावर आणि प्रौढ बनल्यावर जीवनाकडे बघून काही वेळा भ्रमनिरास व्हावा इतकं जीवन अळणी आणि बेचव हे खरयं का हा दृष्टिकोन पण मोठा भ्रामक आहे
आठवते का नुकतंच आपण रांगायला शिकलो होतो पांगुळगाडा घेऊन ती बिन ब्रेकची गाडी चालवताना कुठे पण धडकायचं ट्रॅफिकचे रूल तोडून कोणाच्या पण अंगावर घातली जायची कारण ” ड्रायव्हर शिकत आहे ” म्हटल्यावर कोणी काय म्हणत नसायचं किती वेळ चाललो तरी दमायला होत नव्हतं आईच रात्री गोधडी वर पडल्यावर पायाचे गोळे आणि पिंडऱ्या दाबायची कोणतीही वस्तू पाहिल्यावर हातात घेऊन बघायची भारी हौस तिथेच गॅरेज खोललं जायचं योगायोगाने ती खेळणीतली गाडी पण खोलावं लागायची गॅरेज मधी एक पण गाडी दुरुस्त कधी झाली नाही खेळताना मग स्वयंपाक घरातली सांडशी पक्कड म्हणून…उलथनं स्क्रू ड्रायव्हर म्हणून आणि वरवंटा हातोडी म्हणून वापरला पण बसवता न आल्यामुळे ते सगळे तुकडे तुकडे गोळा करून व्यवस्थित ठेवावे लागायचे.

त्यात आम्हाला आठवीच्या पुढे कार्यानुभव विषय होता म्हणजे बागकाम… स्टोव्ह दुरुस्ती… आणि रेडीओ दुरुस्ती… असे विषय होते आता खेडेगाव म्हटलं म्हणजे आम्हाला हे असले विषय म्हणजे त्यांच्या दृष्टीने कौतुकाची बाब घरचा रेडिओ मेकॅनिक तयार झाला असा त्यांचा गोड गैरसमज आम्ही एकदा नुसतं रेडिओचं मागचं पॅनल काढलं की नुसतं वायरीचं जाळं दिसायचं काय सुद्धा समजत नसायचं पण आवेगामध्ये सगळा रेडिओ स्पेअर पार्ट खोलायच दुरुस्ती तर कधीच नाही आणि कोणाला जमली पण नाही फडक्यात ती नट बोल्ट गुंडाळायचे आणखी गठुडं आणि खोललेलं ते रेडिओचं खोकं त्या माणसाच्या हवाली करावं लागायचं 10 पैसे तास भाड्याची छोटी सायकल मिळायची आता तास झाला हे समजायला अगोदर घड्याळ तर समजायला पाहिजे कवर पण आपली खेळायची चलती का नाम गाडी ही म्हण अगदी खरी हवा गेली तरी नाही तर पंक्चर झाली तरी नुसती रिम डबल सीट बसून खेळायचो आपण सायकल जमा नाही करायची सायकल वाला दुकानदार मालक पार खालच्या आळीला लोखंड्याच्या वाड्याकडे येऊन सायकल हिसकवून घेऊन जायचा गावात मालकीच्या तशा दोन-चार सायकली डिगा सोनार… पांडू रासकर… बंडिंगचे लांघे साहेब… तोडकर साहेब…आणि शिरसाट साहेब… अशी मोजकी मंडळी.

कारण सायकलीवर फिरावं एवढं गावाचं क्षेत्र नव्हतं…कधी नव्हत तालुक्यावरनं महाराष्ट्र शासनाची जीप आली तर त्याच्या मागं पुढं गर्दी करून नुसतं उभं राहायचं ती एक आम्हा पोरांना भारी कौतुक असायचं आणि जीप हलल्यावर त्याच्या मागनं पळत सुटायचं मी पाच वर्षाचा झाल्यापासून पुढे मला सगळ्या घटना आठवतात शाळा दुपारी 11 ची असायची दहालाच तयार होऊन बसावं लागायचं पाठीवर दप्तर अडकवून एकमेकांचे हात हातात धरून मराठी शाळेचा रस्ता धरायचा शाळेपुढे एक ग्राउंड आणि वडाचं. पिंपळाचं…आणि चिंचेचं…एक एक झाड होतं त्या झाडाखाली वेगवेगळे खेळ खेळायचो बर पाच वाजता शाळा सुटली की पळत आणि ओरडत सुटायचं आणि त्यात उद्या जर सुट्टी असली की मग अजून जास्त वरडा वरडी असायची बरं पळायचं कसं मागं बघायचं आणि पुढं पळायचं एका हातात दप्तर आणि दुसऱ्या हातात निसटणारी चड्डी पकडायची तरीपण पयलं कोण घरला जातंय ती शर्यत वेगळीच लहानपणी अगदी लहान लहान गोष्टीने पण आम्ही खूप आनंदी व्हायचो पाहुणा आल्यावर त्याला पोमाई देवी…नदीवरचा पंप… नाहीतर फिल्टर…दाखवायचा प्रोग्राम असायचा तवा लय आनंद वाटायचा
कधी कधी बागेतली घसरगुंडी कोपरं फुटेपर्यंत ढोपरं दुखेपर्यंत खेळायचं झोके खेळायचे तरीपण कधी कधी हातपाय थकायचे पण मन थकत नसायचं बाहेर असणाऱ्या भेळीच्या हातगाडीवर मग आम्हाला पाहुण्याबरोबर भेळ खायला मिळायची लॉटरी लागल्यावाणी वाटायचं कितीही तिखट असली तरी आम्ही ती खाऊन तृप्त होऊनच घरी परतायचो गल्लीत जवा एखाद्याचा वाढदिवस असायचा फोटोग्राफर बाहेरून यायचा तेव्हा त्याच्या गळ्यातल्या कॅमेराचं एक वेगळं आकर्षण असायचं आणि त्यांनी मारलेल्या प्रत्येक फ्लॅशवर आम्ही गलका करायचो ओरडायचो टाळ्या वाजवायचो इतका आनंद व्हायचा आणि तसंच वेड रेडिओचं पण होतं अभ्यास झाल्यावर तो घरातला बुश बॅरन कंपनीचा जुना रेडिओ त्या लाल चामड्याच्या कव्हर मध्ये पट्टा खांद्यावर अडकून फिरायला मजा वाटायची गावात काय तीन-चार जणांकडेच अन ग्रामपंचायत मध्ये असे पाच एक रेडिओ होते.

घरातली एखादी व्यक्ती बाहेर पडणार असं कळाल्यानंतर मी पण येणार असं भजन चालू व्हायचं नाही नेलं तर मग गडबड मग ती घरात असो नाहीतर अंगणात नाहीतर रस्त्यावर असो आपलं बिनधास्त पैकी गडा गडा लोळायचं ही रामबाण औषध होतं ताबडतोब लागू पडायचं जत्रेमधी उंच रंगीबेरंगी रहाटगाडगे पाळणे खेळण्याची किती तरी दुकानं गॉगल विकणारे बघून आमच्या आनंदाला भरतं यायचं गल्लीमध्ये क्रिकेट लगोरी किंवा शाळेमध्ये कबड्डी खेळताना हरलेलं आपल्याला कधीच आवडायचं नाही मी चिडायचो…भांडायचो… ओरडायचो… पण राग धरून बसायचं नाही उलट त्याच्या संग खुन्नस पकडल्यावानी जास्त भांडणं व्हायची तेच तर आपले जिगरी दोस्त असायचे तुझं माझं “जमेना आणि तुझ्या वाचून करमेना” अशी अवस्था झालेली असायची कारण आपण त्यावेळी प्रत्येक वस्तूवर आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीवर निखळ प्रेम करायचो मग तो पौर्णिमेचा चंद्र असो किंवा कापाकापीत काटलेला पतंग असो पाहिलं की आपल्या आनंदाला भरत येतं मांजा तो काय असणार एक दोन चार मीटरचा तुकडा पण त्याला लुटायचा म्हणायचं त्यासाठी केवढा जिवाचा आटापिटा उकिरडा म्हणू नका… दगड म्हणू नका… धोंडे म्हणू नका…किंवा काटे म्हणू नका…वेडं पिसं होऊन नुसतं धावत सुटायचं बागेतलं गवत हिरवळ दिसली की लोळायला व्हायचं…कोलांट्या उड्या खायच्या…रंगीबेरंगी फुलपाखरू बघितली की मन थुईथुई नाचायचं प्रवासाला निघालो की उलट्या दिशेने पळणारे हिरवे डोंगर… झाडं…मोठमोठे खडक… डोलणारी पिकं…बघून दंग व्हायचं त्या वेळेला आपण प्रेमासाठी भुकेलो आणि आसुसलेलं असायचं मायेचा स्पर्श आपल्याला हवाहवासा वाटायचा प्रेमाची उब पाहिजे असायची आपलं हक्काने आईच्या नाही तर बापाच्या मांडीवर खांद्यावर चढून खेळायचो तसा हट्ट पण करायचं दिवाळीमध्ये फटाके वाजवायला मिळायचे मग दिवाळीची वाट गणपती पासूनच बघायची… वाढदिवसाला गिफ्ट भेटायचं… नवे कपडे घालून सेलिब्रिटी म्हणून मिरवायचं… केक कापायचं प्रचंड आकर्षण होतं…पेन हे फक्त लिहिण्याचं साधन होतं पण आपल्या हातात आलं की विमान… हेलिकॉप्टर…घोडा…सैनिक..अशी पेनने चित्र काढायची अभ्यास सोडून इतरही खेळण्यासाठी सारं काही असायचं कारण त्या वेळेला आपल्या कल्पना शक्तीला कसल्याही मर्यादा नव्हत्या जग हे जादुमयी आहे यावर आपला विश्वास असायचा सेल बदलायसाठी बापानं रेडिओचं मागचं झाकण उघडलं की आत मध्ये एका वेगळ्या उत्कंठेपायी आमच्या सर्व मित्रमंडळींची आत मध्ये बघायची घाई असायची आता तुम्ही म्हणाल आत मध्ये बघाय सारखं काय आहे तर एक भ्रामक कल्पना सेल बदलायसाठी जेव्हा झाकण खोललेलं असायचं तवा आत मधी माणसं किती राहत असतील… कुठे बसत असतील… काय खात असतील…कुठे स्वयंपाक करत असतील… कुठे झोपत असतील… या भ्रामक कल्पना घेऊन अख्ख्या रेडिओचं चेकिंग करायचं लहानपणी काही दिलं नाही तर बापाच्या हातातली नोटांची बंडल बघून कधीकधी थोडसं मन जळायचं वाटायचं आपण पण पटकन मोठं व्हावं खूप पैसे कमवावेत खूप मजा करावी खूप स्वप्न बघायचो.

हेही वाचा – डॉक्टर करमाळयात नसल्याचा फायदा घेत, जागा लुबाडण्याचा प्रयत्न; कोर्टाने जामीन फेटाळला

खोटे लग्न लावून तरुणास फसवले, पावणेदोन लाखांचा गंडा; सोलापूरच्या माय-लेकीला अटक

कल्पनाविलास करण्यात मन रमून जायचं आणि लहानपणीचे सांगायचं झालं तर संडासला रानात जावं लागायचं अंधार पडल्यावर दोघे दोघं तिघं तिघं गठ्ठ्यांनी जायचं वेळप्रसंगी न येणारं बेसूर आवाजातलं गाणं पण म्हणायचं पण एकदा काय झालं…आम्ही दोघं बसलो होतो फूट दोन फुटाचं अंतर ठेवून नुसतच खाली बसलो होतो काय झालं ससा किंवा मुंगूस असं काय तरी जीवाच्या भ्यानी दोघांच्या मधनं सुमाट पळालं आणि त्या पळण्याच्या नादात त्या माझ्या दोस्ताचं टरमाळ्यातलं पाणी खाली सांडलं काय सांगू फजिती एक पाणी दोघात वापरून युद्ध पातळीवर आवरतं घेतलं होतं काय सांगू व्हट कोरडं पडलेलं होतं आणि सगळं अंग भीतीनं थरथर कापत होतं एवढं घाबरलो होतो तसेच गावात कधी कधी गुंजाळ म्हणून गारीगार वाला यायचा पाच पैशाला दोन प्रमाणे गारीगारच्या कांड्या द्यायचा पण कधी कधी ते दोन गरिगार खावले गेले नाहीत तर बाहेर दगडावर बसून शर्ट काढायचा आणि साबणाची वडी अंगाला लावल्यावाणी ती गरिगारची वडी अंगाला लावून कडक उन्हाळ्याची मजा लुटायची पण आता मघापासून मी सांगतोय काय अहो पोमलवाडीतलं म्हणजेच पोमाईच्या कुशीतलं माझं ती बालपण केव्हाच कुठं तरी हरवलयं
**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here