पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन; रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम; वाचा सविस्तर

पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन; रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम; वाचा सविस्तर

केत्तूर(अभय माने) करमाळा तालुक्यातील मध्य रेल्वेच्या पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडयांचे थांब्याचे मागणी करीता आज शनिवार (ता.9) रोजी असणारे रेल रोको आंदोलन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे ठोस आश्वासनानंतर तुर्तास मागे घेण्यात आले आहे. हा निर्णय प्रवासी ग्रामस्थ व व्यापारी यांनी घेतला असुन, मागणी पुर्ण होईपर्यंत लोकसभेच्या मतदान प्रक्रियेवर घेतलेला बहिष्काराचा निर्णय मात्र कायम ठेवला आहे.

शनिवारी प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, ग्रामस्थ यांनी पारेवाडी रेल्वे स्टेशनला जाऊन याबाबतचे निवेदन स्टेशन प्रबंधक यांचेमार्फत तसेच रेल्वे पोलिस यंत्रणेचे अधिकारी यांना दिले. याप्रसंगी उपस्थितांनी रेल्वे बोर्ड व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेवर विश्वास व्यक्त करत तुर्तास रेल रोको स्थगित केल्याचे सांगितले, परंतु आमची मागणी मान्य न केल्यास रेल्वे बोर्डाचे विरुद्ध कोर्टात जाऊन सनदशीर परवानगीने रेल रोको पुन्हा करू असाही सुचक इशारा यानिमित्ताने दिला आहे. या प्रसंगी केत्तूर व परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

एक्सप्रेस थांबण्यासाठी परिसरातील केत्तूरसह पारेवाडी, हिंगणी, पोमलवाडी, राजुरी, गुलमोहरवाडी – भगतवाडी, खातगाव, देलवडी, गोयेगाव ग्रामपंचायतीनी पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडी ला थांबा न दिल्यास आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे व तशा प्रकारचे ठरावही संबंधित प्रशासनाला दिले आहेत.

मुंबई कन्याकुमारी हा रेल्वे मार्ग सर्वात मोठा रेल्वे असून करमाळा तालुक्यातील पुढील 7 रेल्वे स्थानकावरून जिंती, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज, जेऊर, ढवळस व केम जात आहे. ही करमाळा तालुक्यासाठी गौरवाची बाब आहे.या रेल्वे स्थानकापैकी केम व जेऊर या स्थानकावरच एक्सप्रेस गाड्या थांबत आहेत.
पुर्वी ब्रिटीशकालीन रेल्वे भिगवण- कात्रज- पोमलवाडी- वाशिंबे अशी स्थानके होती, पारेवाडी रेल्वे स्टेशन हे पुर्वीचे पोमलवाडी स्टेशन उजनी धरणामुळे विस्थापित झाल्यामुळे तयार झालेले आहे. जुन्या पोमलवाडी रेल्वे स्थानकावर पुर्वी प्रत्येक रेल्वे गाडीचा थांबा होता, त्यामुळे या भागातील लोकांना त्या वेळी कधीही रेल्वे साठी झगडावे लागले नाही, परंतु नवीन स्थलांतरीत स्टेशन वर एक्सप्रेसची मागणी होऊनही अद्याप गाडीचा थांबा दिला नाही. पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील 30 गावांची गेली अनेक वर्षांची मागणी असुन या करीता येथील प्रवासी नागरिकांनी 1997 साली रेल्वे रोको केला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी रेल्वे विभागाकडे सततचा पाठपुरावा केलेला आहे.2023 मधे भव्य एल्गार मोर्चा ही काढला होता.

हेही वाचा – वीट येथे रिटेवाडी उपसासिंचन योजनेसाठी रस्ता रोको आंदोलन  आचार संहिता पूर्वी योजना मार्गी लागली नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार -शेतकऱ्यांचा एल्गार

केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबा यात्रेनिमित्त ‘या’ विविध कार्यक्रमाचे आयोजन

शाळकरी मुलांसह टाळकरी, शेतकरी , व्यापारी, महिला यांनी मागणी करूनही अद्यापही रेल्वे प्रशासन गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे. विद्यमान खासदार नागरिकांना दिलेला शब्द पाळतात का ? हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या 30-35 वर्षापासून सुरू असलेला संघर्ष संपणार की नाही हाच प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

छायाचित्र : पारेवाडी : रेल्वे रोको स्थगीत केल्याचे पत्र संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना ग्रामस्थ.

karmalamadhanews24: