पाणलोट अन पोमलवाडी ……. ( माझी 50 वर्षांपूर्वीची पोमलवाडी )

पाणलोट अन पोमलवाडी
…….
( माझी 50 वर्षांपूर्वीची पोमलवाडी )

जरा थोडंसं…
आमची भारतीय रेल्वेशी नाळ जोडलेली पूर्ण जीवन रेल्वेशी निगडित माझ्या गावात गाडीने 4-5 स्टेशन प्रवास केल्यावर पाणी पिण्याकरिता गाड्या सुमारे 15-20 मिनिटे थांबत असे नाही तर समोरून येणारी किंवा पुढे गेलेल्या गाडीमुळे रस्ता मोकळा होण्यासाठी गाडीला साधारण अर्धा तास तरी लागायचा तेवढ्या वेळेत पाहुणा घरी येऊन जेवण करून पुन्हा गाडीत जाऊन बसत असे एवढी स्टेशनला चिकटून वसाहत असे आहो रात्री झोपताना फळीवरचे मोठे भांडे म्हणजे हंडा पातेले…तांबे…खाली काढून ठेवायचो आम्हाला सवय झाली होती पण बाहेरगावचा पाहुणा थ्रो गाडी गेल्यावर खडबडून जागा व्हायचा काही तर पळायचे सुद्धा मा. जहागीरदार स्रेशन मास्तरांसमवेत मा. सय्यद…कुलकर्णी… देशपांडे…देसाई… अशी चलाख टीम गाड्यांची सुरक्षितपणे ये -जा करायची सोबत मा. विठोबा कारंडे… किसन पानसरे…झुंबर पुणेकर…उद्धव खेडगीकर…मच्छिन्द्र सातपुते…सारखी मातब्बर मंडळी गाड्यांची योग्य रुळावर सोय करायची तर माझे मान्यवर कंकर भाई बाबुराव नलावडे हे सहकारी मास्तरांना विशेष सहकार्य करायची संध्यकाळी सिग्नलची दिवाबत्तीसारखी सौभाग्याची कामे ही तेच करीत असे स्टेशन परिसराला पाणी पुरवठा बहुतेक रेल्वेचाच असे अहो पेशंटच्या आरोग्यासाठी डॉक्टर जसे ओ. आर. एस. मिनरल्स देतात अगदी तसेच एवढ्या रेल्वेच्या प्रपंचासाठी मा. जोशी व मा. शंकर सखाराम कुलकर्णी ही जोडगोळी करीत असे पहाटे 4 ची मद्रास मेल गेल्यावर घड्याळाला गजर लावल्यासारखा गाव जागा व्हायचा.

दळणवळण म्हणजे फक्त पोस्ट त्यासाठी आर. एम. एस. चे मा मल्लेश माने व शिवाप्पा ही जोडी सोलापूरहून ये -जा करीत पैकी रोज एकजण मुक्कामास स्टेशनवर असायचा पॅसेंजर येण्याच्या अगोदर वाजणारी लयबद्ध घंटा मोठा 4 फुटी लोखंडाचा लटकविलेला तुकडा वाजवायला मोठा खिळा वाजवताना पण हृस्व पासून दीर्घ पुन्हा दीर्घ पासून ह्र्स्व क्षणभर थांबून दौंड हुन येण्यासाठी 3 व दौंडला जाण्यासाठी 4 टोलचे गुपित असे किंवा काही घडले तर मनसे जमा करण्यासाठी थांबून थांबून डबल अशी खूप वेळ घंटा वाजायची स्टेशनवर फक्त टी. आय. व लोको इन्स्पेक्टर आणि पी. डब्ल्यू. आय. मा. पाठक साहेबांशिवाय विश्रामगृहाचा वापर कोणी केला नाही मा. रामेश्वर जोशी यांचे रात्रंदिवस चालणारे असे उपहार गृह स्टेशनवर होते त्यांचे सुपुत्र मा. सुरेश…बिजू…हरीश…घनश्याम…बाळू अगदी संपूर्ण कुटुंब पार कुर्डुवाडी पर्यंत प्रवाशांना खाण्यापिण्याची सेवा पुरवीत असे दिवस कसे बहरलेले असायचे तसेच 24 तास प्रवाशांची पान…विडी…तंबाखू ची तल्लफ मा. अब्दुलचाचा भागवीत असत गाडी यायच्या अगोदर अर्धा तास आधी तिकीट काढायच्या मशीनचा तो ठेकेबाज आवाज तिकडे खातगावच्या कठीणात दिसणारा धूर तर इकडे केतूरच्या गांजेवाळणावरून वळण घेणारी रेल्वे प्रवाशांना सावध करीत असे अहो इकडे भीमा नदीवरच्या पंपावर मा. बाबुराव सोनार…मारुती खंदारे…बळीराम सातपुते… तर त्यांचे सहकारी मा. कासमभाई शेख… रामचंद्र रोंघे…व हाजीभाई शेख…अविरत परिश्रम घेत असे तेथेच आदिशक्ती आई जांभळाई देवीचे वास्तव्य दरवर्षी आषाढामध्ये तेथे सर्व गावाला मटणाचे जेवण देऊन उत्सव साजरा करायचे पण घरूनच ताट व भाकरी आणायची मटणाची पार्टी असे मातब्बर मंडळींची उपस्थिती असायची अहो पाऊस पडायला थोडा उशीर झाला तर नदीवरच्या महादेवाला कोंडून ठेऊन साकडं घालायचे केवढी ती श्रद्धा नदीला आलेला पूर जर 4-5 दिवस राहिला तर मा. नगरे व कणीचे बंधू कात्रज भागातून कमरेला भोपळा बांधून जीवावर उदार होऊन पूरात उडी टाकून पंपावरील लोकांना काठीला बांधलेले जेवण बेमालूम देऊन पुढे सुखरूप जात असे सलाम त्यांच्या कामगिरीला नंतर पूर ओसरल्यावर गावकऱ्यांतर्फे त्यांचा सत्कार व्हायचा आणि हो हुरड्याच्या हंगामात सोलापूर विभागातील सर्व टी. सी. साठी मा. देवकर तात्यातर्फे हुरडा पार्टी आयोजित केली जायची त्याची सर्व व्यवस्था मा. अण्णा बाबर व मा. दगडू फाळके करायचे अख्ख्या पोमलवाडीत दिवसभर टी. सी. च फिरताना दिसायचे
आणि हो पोमलवाडीत दर शुक्रवारी एक परमेश्वर अवतार घ्यायचा त्याचे नाव मा. हिंगमीरे डॉक्टर ते म्हणजे डॉक्टर कमी पण नातेवाईक अन भाऊबंदकीचेचं जास्त वाटायचे गोड बोलण्यानंच निम्मा थंडीताप दुखणं गायब कसली खुर्ची न कसलं टेबल डॉक्टर सतरंजीवर अन त्यांच्यापुढं आपण भुईला बसायचं सगळ्यांची खडा न खडा माहिती नव्हे कुंडलीच माहित असायची छोटी 2-5 टाक्यांची ऑपरेशन अन बाळंतपण सुद्धा शिताफीने करायचे दुखत नसलं तरी डॉक्टर कडे येऊन जायचे केवढी श्रद्धा या वर्दळीमुळे बाळू सुमंतांचं घर दिवसभर भरलेलं असायचे
आणि तिकडे आमचे लाडके मा. बाबूशेठ डॉक्टर म्हणजे बेअरर चेक केव्हाही जा अगदी रात्री झोपेतून उठवा मायेनं बरं करायचे पैशाचं विचारलं तर *अहो पैशाचं सोडा हो * हा शब्द ठरलेला खरंच या लोकांनी पैसा नाही तर माणसं कमावली ती पण खोऱ्यानी बरं का एका वामन नावाच्या अनाहुताने रात्रीची गस्त घालून गाव सतर्क ठेवला त्याचा मुक्काम मारुतीचे देऊळ नाही तर स्टेशन वर असे ग्राम पंचायतीच्या मा. हरिबा साळवे मामांची संध्याकाळची गावाची दिवाबत्तीची लगबग 5 वाजल्यापासूनच सुरु व्हायची गावकऱ्यांचा 10 दिवसाचा भरगच्च कार्यक्रमाचा गणेशोत्सव गावाची यात्रा हुरूप यायचा केतूरच्या मा. भाऊसाहेब गायकवाड बंधूंची लाइटिंग व लाऊड स्पीकर म्हणजे कार्यक्रमाची झालर असे पै पाव्हणे लेकीबाळी माय माहेरी यायच्या
मा. अण्णा माने (राजाराम माने यांचे आजोबा )म्हणजे चालते बोलते न्यायालय अहो घरगुती वाद म्हणजे पोरीला सासुरवास किंवा नांदायला नेत नाही भावकीचा वाद असो नाहीतर गावाचा एखादा निर्णय असो चुटकीसरशी फायद्याचा निर्णय घ्यायचे त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण…… त्यांच्यापुढे कोणी जात नसे करमाळा राशीनला जाण्यासाठी एस. टी. ची सोय होती काही दमलेल्या लाल पऱ्या तर विश्रांतीसाठी मुक्काम करायच्या शेताच्या बांधावरील मटणाच्या बर्बटची चव तर अहाहा |

चेहरा न अंग घामानी चिंब व्हायचं केवढा झन्नाटा होता ती चव आता ढाब्यावर सुद्धा नाही दिवस उगवताच साऱ्या माय माऊल्या धुणे धुण्यासाठी नदीवर जाताना कागदाच्या पुडीत गुळाचा खडा त्यातच चहा पावडर पंपावरील लोकांना मायेनी देत आम्ही तर गूळ न चहा पावडर कधीच विकत घेतली नाही अशी ती माया कशी विसरली जाईल सहज शेतात गेलं तर दोन दिवसाचं माळवं फुकट मिळायचं जवारी नाही बरं का |

गाव तसं छोटं पण मध्यवर्ती होतं मला आठवतयं आठवी नंतर आसपासची खेड्यातील मुलं तर रेल्वे पाहण्यासाठी गर्दी करायची घरगुती पूजा व्रत संकल्पाची कामे मा.लंके करीत असे मा.गोविंदराव जगताप… मा. मेहबूब भाई… मा. नेमिनाथ होरणे अन तिकडं. मा. सुखदेव माने हे गावात प्रसिद्ध टेलर तर मा.अमृतराव कुंभार सुंदर मूर्तिकार बंडिंग विभागाचे मा.शिरसाठ…लांघे…तोडकर आरोग्य विभागाचे डॉ.सपाटे व मा.दिलपाक मॅडम तसेच जनावरांचे डॉक्टर मा. वळेकर सुद्धा गावात होते आजपण पाणी ओसरल्यावर जुनी पोमलवाडी तेथे ओढीने जाऊन बघतो ते दिसणारे अवशेष पाहून मन सुन्न होते जुन्या आठवणी जाग्या होतात मनाची अवस्था विदारक झाल्याशिवाय राहत नाही आणि हा आत्ता आठवले त्या काळी संध्याकाळी 7 पासून रात्री 10 वाजे पर्यंत घरावर आपोआप दगडं पडायची ती एक वेगळीच दहशत होती ते गूढ काय कुणाला उलगडले नाही एकंदर मला तर पुन्हा पोमलवाडीत गेल्यासारखे वाटते
**********************************
किरण बेंद्रे
पुणे
9860713464


karmalamadhanews24: