दगड बांधून विहिरीत ढकलून तरुणाचा खून; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या पंढरपूर शहरामधील एका तरुणाचा अज्ञात व्यक्तीनी दगड बांधून विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना आज सोमवार दिनांक २२ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
लखन गांडुळे असं मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत लखन गांडुळे हा तरुण दोन दिवसांपासून बेपत्ता होता.
लखनचा शोध सुरु असताना आज दुपारी पंढरपूर शहरापासून जवळ असलेल्या कोर्टी गावच्या हद्दीतील एका विहिरीमध्ये त्याच्या अंगाला दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असून ही हत्या कोणत्या कारनात्सव करण्यात आली, त्याला दुसरीकडे मारुन या विहिरीमध्ये टाकलं आहे की याच ठिकाणी त्याच्या अंगाला दगड बांधून विहिरीत ढकललं आहे हे अद्याप उघड झालेलं नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे कोर्टी गावासह पंढरपूर शहरामध्ये भीतीचं वातावरण आहे.
Comment here