32 वर्षानंतर उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांनी अनुभवली आपली शाळा
केत्तूर (अभय माने) मित्रत्वाचे ऋणानुबंध, आपल्या गुरुजनाप्रती कृतज्ञता तसेच शाळेविषयी जिव्हाळ्याची भावना व सामाजिक भान जपत दहावीतील वर्गमित्रांनी तब्बल 32 वर्षांनी आपल्या शाळेत पुन्हा एकदा एकत्रित येत जुन्या आठवणींना उजाळा दिला तालुक्यातील केत्तूर येथील नेताजी सुभाष विद्यालयाच्या 1992 च्या बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट-टुगेदर अर्थात स्नेह मेळावा नुकताच आयोजित केला होता. या स्नेह मेळाव्यासाठी विद्यार्थी व त्यावेळचे शिक्षक आवर्जून उपस्थित होते.
या कार्यक्रमाला कोणी अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणे नव्हते तर माजी सर्व शिक्षक आणि माजी विद्यार्थी यांचे उपस्थितीत हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सर्व मान्यवर शिक्षक व विद्यार्थ्यांची सवादय मिरवणुक काढण्यात आली व तत्कालीन त्या वेळच्या शाळेप्रमाणे सर्व मुलांची प्रार्थना झाली.परिपाठ झाला. माजी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थी ज्या वर्गात शिकले त्या वर्गात पुन्हा एकदा जाऊन बसले व त्या वेळच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.जुन्या आठवणींना उजाळा दिला केलेली मस्ती. एकमेकांचा खाल्लेला डबा, गमतीजमती, शिक्षकांच्या केलेल्या नकला, मित्र व शिक्षकांची केलेल्या गमतीजमती या पुन्हा एकदा अनुभवल्या.
शाळेचे विद्यार्थी राजकारण,प्राध्यापक,वकील,शिक्षक, डॉक्टर,उद्योजक,शेतकरी,मजूर अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत आहेत या सर्वांनी मिळून विद्यालयातील प्रत्येक वर्गासाठी एक सिलिंग फॅन भेट म्हणून दिला.वाढते प्रदूषण व पर्यावरण संतुलनासाठी विविध झाडांचे शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून एक वेगळाच आदर्श घालून दिला. या वृक्षांची ” मैत्रीचे झाड ” म्हणून जपणूक करावी असा संदेश यावेळी देण्यात आला.तसेच दिवंगत विद्यार्थी व शिक्षक यांची आठवण जागृत करून त्यांना स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुरुवातीला शिक्षकांचा ढोल, ताशा, हलकीच्या दणदणाटात स्वागत करण्यात येऊन सर्वांना आपला परिचय करून देताना कोण कुठे राहतो ? काय करतो ? याची सविस्तर माहिती सांगितली 32 वर्षानंतर एकत्रित भेट झाल्याने आनंदाला उधान आले होते आपण कितीही मोठे झालो व कुठेही राहत असलो तरी बालपणीच्या मित्रांना भेटण्याची ओढ ही वेगळीच असते हे या कार्यक्रमातून अनुभवास मिळाले.
या कार्यक्रमासाठी 60 विद्यार्थी विद्यार्थिनींनी यावेळी हजेरी लावली होती.कोणी मुंबई,पुण्यावरून आले होते तर कोणी जळगाव, सोलापुर व दुरून आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.अजित विघ्ने,जितेश लिमकर यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक किशोर जाधवर यांनी केले.याप्रसंगी सातव ,भारत पांडव,सातव मॅडम,कळसाईत मॅडम यांची दिलखुलास भाषणे झाली. तर विद्यार्थी मित्रांमधुन नवनाथ गायकवाड,सुर्यकांत पाटील, दिपक शिंदे,शिवाजी मोरे,नाना आढाव, सुरेश माने,यांची भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांनी व नेताजी सुभाष विद्यालयाचे प्राचार्य भीमराव बुरुटे ,लक्ष्मण महानवर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले.शेवटी सर्वांनीच मिळून मिस्टान्न भोजनाचा आनंद घेतला.एकमेकांना शुभेच्छा दिल्या व निरोप घेतला.
छायाचित्र -केत्तूर:येथील नेताजी सुभाष विद्यालयात माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
(छायाचित्र- अभय माने, केत्तूर)