म्हसेवाडी तलाव भरण्यासाठी दहीगाव उपसा सिंचन मधून पाणी सोडण्याची गणेश चिवटे यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील म्हसेवाडी तलाव पावसाळ्याच्या दिवसांमध्येही भरला नाही, तो तलाव दहिगाव उपसा सिंचन योजनेतून भरण्यात यावा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी लघुपाटबंधारे विभाग, करमाळा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सध्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात ओव्हर फ्लो पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र त्याचा लाभ म्हसेवाडी तलावाला मिळत नसल्याने गावकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

म्हसेवाडी तलावावर म्हसेवाडीसह पांडे, करंजे, भालेवाडी आणि अर्जुननगर ही चार ते पाच गावे अवलंबून आहेत. तलाव रिकामा असल्याने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासोबत शेतीसाठीही पाण्याची गंभीर परिस्थिती ओढवली जाणार आहे. चिवटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळ्यात पुरेशा पावसाचे आगमन झाले असले तरीही पाण्याची योग्य नियोजनबद्ध सोय न झाल्याने तलाव रिकामा राहिला आहे. त्यामुळे दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून तलाव भरणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला आहे असे चिवटे यांनी यावेळी सांगितले.

स्थानिक ग्रामस्थांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेला हा विषय तातडीने सोडवून म्हसेवाडी तलाव भरला तर पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा म्हसेवाडी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गणेश चिवटे यांच्याकडे व्यक्त केली होती.
यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस आजिनाथ सुरवसे , उपसरपंच अमोल पवार ,पत्रकार दिनेश मडके , जयंत काळे पाटील, नानासाहेब अनारसे उपस्थित होते.






































