माढा ते खैराव एसटी चव्हाणवाडी मार्गे सोडण्याची आगार प्रमुखांकडे मागणी आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी बसफेरी सुरू करण्याचे दिले आश्वासन ; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आ.बबनदादा शिंदे व श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाच्या पाठपुराव्याला यश

माढा ते खैराव एसटी चव्हाणवाडी मार्गे सोडण्याची आगार प्रमुखांकडे मागणी

आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी बसफेरी सुरू करण्याचे दिले आश्वासन ; विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार

आ.बबनदादा शिंदे व श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयाच्या पाठपुराव्याला यश

माढा / प्रतिनिधी – मागील वर्षापासून माढा-मानेगाव-खैराव ही एसटी बससेवा सकाळी व सायंकाळी एक फेरी अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुरू आहे परंतु या मुख्य मार्गापासून अडीच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चव्हाणवाडी गावाला वगळून ही बससेवा सुरू केल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय व कुचंबना होत आहे.

तेंव्हा ही बससेवा चव्हाणवाडी मार्गे सुरु करावी याकरिता आमदार बबनदादा शिंदे व श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय आनंदनगर-मानेगाव, केवड-चव्हाणवाडी ग्रामपंचायत व प्रवाशी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी मागणी व पाठपुरावा कुर्डूवाडी आगारप्रमुखांकडे केला होता त्यास सकारात्मक प्रतिसाद देत बसफेरी सुरू करण्याचे आश्वासन आगार‌ व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी दिले आहे.

केवड-चव्हाणवाडी या संयुक्त ग्रामपंचायत असलेल्या चव्हाणवाडी गावाची लोकसंख्या 400 च्या दरम्यान असून गावात फक्त इयत्ता चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत त्यामुळे पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना मानेगाव व माढ्याकडे जावे लागते ही वस्तुस्थिती आहे.या गावातील दररोज 30 ते 35 विद्यार्थी व नागरिक कामाच्या निमित्ताने माढा व मानेगावकडे जातात परंतु त्यांना बस पकडण्यासाठी पाच किलोमीटर कडक ऊन, वारा,पाऊस व थंडीत पायपीट करावी लागते त्यामुळे विद्यार्थी व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे लोटली तरीही चव्हाणवाडी गाव हे एसटी बसने जोडलेले नाही.मागील वर्षांपर्यंत खराब रस्त्याचे कारण होते परंतु आता आ.बबनदादा शिंदे यांच्या प्रयत्नातून एक कोटींच्या निधीतून गावापर्यंत संपूर्ण रस्त्याचे पक्के डांबरीकरण झाले आहे त्यामुळे एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याने कुर्डूवाडी आगारप्रमुख व आ.बबनराव शिंदे यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही बससेवा तातडीने सुरू होणार आहे.

हेही वाचा – ध्येय प्रतिष्ठान माढा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार संपन्न मोफत करिअर व मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वारीच्या नावाखाली सीना कोळेगाव धरणातून पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन करू; कुणी दिला इशारा? वाचा सविस्तर..

कूर्डूवाडी येथील आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे चव्हाणवाडी मार्गे बससेवा सुरू करण्याची मागणी करताना सहाय्यक वाहतूक अधिक्षक विजय हांडे, लेखाकार विजय बुटे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक शिवराज पाटील, मुख्याध्यापक प्रवीण लटके यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

फोटो ओळी – कुर्डूवाडी आगार व्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे चव्हाणवाडी मार्गे बससेवा सुरू करण्याची पत्राद्वारे मागणी करताना मुख्याध्यापक प्रवीण लटके, विजय हांडे,विजय बुटे,शिवराज पाटील व इतर मान्यवर.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line