आम्ही साहित्यिकपुणे

******** माणसातला काजवा ******** “हिथं प्रत्येकच जण काजवा आहे”

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

******** माणसातला काजवा ********

“हिथं प्रत्येकच जण काजवा आहे”


……….. हे बघा तो निसर्ग आहे काय करील काय नाही त्याचा काही बी नेम नाही पण आपल्याला आपण कितीही तंत्रज्ञान वापरू द्या. काही बी करू द्या पण निसर्गावर व त्याच्या नियमावर अतिक्रमण नाही करू शकत आता मस कडाक्याची थंडी पडलीयं नळाला पाणी येईना असं झालंय कारण पाईपलाईन मधल्या पाण्यानं बर्फाचा अवतार घेतलाय तरीपण आपण शाल… स्वेटर…शेकोटी…हिटर…नाही नाही ते प्रकार वापरून त्यापासून बचाव किंवा संरक्षण करू शकतो पण थंडी गायब करू शकत नाही किंवा आपल्या सोयीनुसार ऋतू सुद्धा बदलू शकत नाही.


खरं पाहायला गेलं तर माणसातील काजवा ही लिहिण्याची प्रेरणा काही दिवसापूर्वी पुणे शहरातील एक समाजसेवक व फुले शाहू आंबेडकर विचार मंच अभियान राबवणारे माननीय आयु. विठ्ठलराव गायकवाड यांच्या तीक्ष्ण नजरेतून निरीक्षण केल्यानंतर मी राहत असलेला ताडीवाला रोड प्रभाग झोपडपट्टी सदृश्य असल्यामुळे व माझ्यातील काही गुण अभियानाच्या दृष्टीने योग्य वाटल्यामुळे काही दिवसापूर्वी * झोपडीतील सूर्य * हा पुरस्कार देऊन मला गौरवण्यात आले तर मी म्हटले झोपडीतील सूर्य प्रमाणेच “माणसातील काजवा” पण आपण हुडकू म्हणून हा अट्टाहास…..


अगदी या काजव्या प्रमाणेच अशा काही देणग्या आपणास निसर्गानी दिलेल्या आहेत तसं पाहायला गेलं तर सगळ्यात मोठा जादूगार निसर्गच आहे प्रत्येकाचा जन्म निर्मिती कार्य ही सुद्धा एक जादूची कांडी फिरवावी अगदी तसंच आज आपण पाहू काजवा… कारण अंधारावर मात करण्यासाठी प्रकाश व्यवस्था हा एक पर्याय उरतो तो म्हणजे पणती… मेणबत्ती… दिवा…कंदील… किंवा नवीन काळातील विद्युत प्रकाश योजना पण घनदाट अरण्यामध्ये ज्यांचा रात्रीचा वावर आहे त्यांच्यासाठी वैयक्तिक स्वरूपात जन्मताच प्रकाशयोजना वितरित व्हावी या उद्देशाने काजव्यांनी अवतार घेतला.


कितीतरी काजवे एकत्रित रित्या पाहिल्यावर एकतर ते स्वयंप्रकाशित असतात ते समूह दृश्य काय दिसते काय तो निसर्गाचा नजाकत नमुना आता आपण प्रथम माणसातील काजवा याप्रमाणे राजकारणात सुद्धा एका बाजूने पूर्ण काळाकुट्ट अंधार आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा अंधारच आहे नव्हे आपण एका धोक्याच्या वळणावर उभे आहोत पण तिथं कोणीतरी समाजाला काजवा बनून चमकावतयं उजेड दाखवण्याचा प्रयत्न तरी करतय हे खूप महत्त्वाचं आहे काजवे तर दोघाकडे पण आहेत एक मात्र खिशात घालून आपल्या जवळच्या माणसांना रस्ता दाखवतो आहे आणि हेच तर खरं आत्ताचं राजकारण आणि इतर समाज बांधव दिसले की काजवा खिशात दडवून आम्ही पण अंधारात असल्यासारखं सोंग करत आहे
पण आता वेळ आहे काजवा नाही… दिवा पण नाही…हातात मोठी मशाल पेटवून समाजाला उजेड दाखवून योग्य रस्ता दाखवण्याची वेळ आहे कारण अंधारासोबत असणारा इवलासा काजवा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षा जास्त मोलाचा असतो काही माणसं खरंच काजव्यासारखी नुसत्या अंधारातचं ओझरतं दर्शन होतं पण आजूबाजूच्या काळोखामूळं त्या उजेडाचा ठिपका सर्वांचं लक्ष वेधून घेतो त्याचं अस्तित्व जागं करतो काही दिवसापूर्वी फेविक्विकची एक जुनी जाहिरात होती एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला अवखळ चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात होती एका साध्या काठीला चार-पाच फेविक्विक चे थेंब लावून मासे पकडणारा खेडवळ माणूस पाहिला की त्याच्या बुद्धिमत्तेचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही कारण स्मार्टवर्क करण्याचं कसब ही तशी सोपी गोष्ट नाही पण बहुतेकांना माहिती असतं पण जमत नाही म्हणतात ना कळतय पण वळत नाही
आणि बहुतेकांना ते जमत नसतं लिहिता येणं आणि शैलीदार लिखाण करणं यात जसा फरक आहे तसाच फरक काम करणाऱ्या पद्धतीत पण दिसून येतो साक्षरतेच्या दृष्टिकोनातून अशिक्षित माणसं व्यवहार ज्ञानाच्या बाबतीत मात्र पुष्कळ चतुर निघतात हे सत्य तर कोणीच नाकारू शकत नाही लिहिता वाचता न येणाऱ्या माणसानेच रायगड… प्रतापगड… सिंधुदुर्ग…जंजिरा…असे दुर्गम व अजिंक्य किल्ले उभारले…पुष्करणी बांधल्या… बारा बारा मोटांच्या विहिरी बांधल्या… तीन तीनशे वर्ष ऊन… वारा… पाऊस… समुद्राच्या लाटा… यांना अखंडपणे तोंड देत उभी असणारी बांधकामं करणारी माणसं साक्षर नव्हती का सिविल इंजिनियर पण नव्हती पण चतुर मात्र नक्की होती आणि तेच खरे माणसातले काजवे होते आता मात्र परिस्थिती उलटी आहे अन उलटी फिरलीयं पुस्तकी साक्षरता आली खरी पण व्यवहारातलं चातुर्य मात्र गमावलयं
आताच पोरगं किराणा दुकान चालवताना सामानाची यादी…भाव व गोळा बेरीज करताना कॅल्क्युलेटर हातात असताना तीन-चार वेळा प्रयत्न करून सुद्धा चुकतंय इकडं माझा चुलता वय 92 वर्ष डोळ्याला सोडावाटरच्या बाटलीच्या बॉटम सारखा मोठा भिंगाचा चष्मा अजून पण सोनार काम करतयं समोरनं बघितलं तर डोळा आणि त्याची खोबण पापण्या काही सुद्धा दिसत नाही त्या चष्म्याच्या काचेवर दिसतात फक्त डोळ्याच्या बाहुल्या अन बुब्बूळं ती पण कितीतरी पटीने मोठी एनलोर्ज केल्यावाणी अन त्यांचं एक सर धोपट गणित असतयं सोनं 52 550 रुपये तोळा पण साडेचार ग्रॅम 780 मिली सोन्याचा दागिना… घडणावळ… टॅक्स… धरून 26,635 रुपये दोन तीन मिनिटात हातावर बोटं मोजून कागद नाही…पेन नाही…का कॅल्सी नाही तो खरा काजवा तोही चालता आणि बोलता
आता आपण पाहू कपड्याचं जसं मॅचिंग असतं तसंच शब्दांना पण मॅचिंग असतं जसं विशिष्ट शब्द हा विशिष्ट शब्दाबरोबर शोभून दिसतो किंवा वापरला जातो आणि असे हे मॅचिंग शब्द तसे प्रगल्भ व समृद्ध भाषेचे एक लक्षण आहे मराठी मध्ये असे काजव्यासारखे असंख्य मॅचिंग शब्द सापडतील पण ओळखणाराने ओळखले पाहिजेत नाहीतर आपलं दे रे हरी पलंगावरी ते तसं नसतयं कारण माणसाचं आयुष्य हे काजव्यासारखं असतंय जगू तवा लखलखाट आणि नसू तेव्हा सारे निष्प्रभ म्हणून जाणार म्हणून जगू या आनंदे कारण मावळण्यापूर्वी लखलखण्याचा विचार अजून पण बाकी आहे माणसातील काजव्याचे झाड ही एक केवळ संकल्पना आहे कारण आनंदी राहणं ही त्याची प्रसन्न मानसिकता आहे जगण्यासाठी असंख्य पर्याय उपलब्ध असताना आनंदी राहण्याचा पर्याय त्यांनी निवडलाय म्हणजे तो काजव्यापेक्षा काही कमी नाही
रात्रीचा पहिला प्रहर आजूबाजूला किर्रर्रर्र अंधार त्या रात्री मी काजव्याचे झाड पाहिलं मनात भीती त्या अंधारामुळे निर्माण झाली नाही तर माझा अन भीतीचा 36 चा आकडा मला कधीच भीती वाटली नाही वाटली ती धारदार शब्दाची कारण त्याचा वार लय दिवस सोसावा लागतो आणि सांगावं लागतं माझ्याजवळ पण एक दागिना आहे मी ज्यावेळी ते झाड बघायला गेलो तेव्हा मोबाईल ऑन करायचा नाही…आवाज व दृश्य हालचाल करायची नाही… मोठ्याने बोलायचं नाही…नुसतं इशाऱ्यावर सर्व काही… त्या प्रजातीला व्यत्यय निर्माण होतो असचं पुढे पुढे चालताना ते अंगा खांद्यावर नक्षीकाम केलेलं काजवे आलेलं झाड त्या कुठं अंधारात दृष्टीपथात आलं ते नयनरम्य दृश्य पाहून माझे डोळे अगदी दिपत गेले दाट काळोखातील तो चमचमाट अवर्णनीय होता क्षणामध्ये पूर्ण अंधार आणि मग उजेडच उजेड मग मनात आलं झाडाकडे अशी काय जादू आहे की काजव्यांनी त्या झाडावरच आपली कॉलनी वसवावी व झाडाला श्रीमंत करून टाकावं सगळ्याच झाडांच्या वाट्याला तो लकलखाट नव्हता काजव्यांचा तो प्रकाश उत्सव पाहताना मन हरवून गेलं निसर्गाकडे ही किमिया कशी काय असावी असा भाबडा प्रश्न मनाला पडला जैविक विविधतेने नटलेला आपला देश खरोखरच श्रीमंत आहे जिथे झाडाला असे हिरे लटकलेले पाहायला मिळतात खरचं केवढा हा लकलखाट केवढी ती प्रकाशाची श्रीमंती निसर्गापुढे आपण अगदी नक्कीच थिटे आहोत ही जाणीव मनाला झाली आणि मन आतून प्रकाशमय झालं
रानमाळावर काळाकभिन्न अंधार त्या अंधाराला छेद देणारे आणि प्रकाशाचे गीत गाणारे हे काजवे म्हणजे निसर्गाचं एक आश्चर्यच म्हणावं लागेल तो काळ काजव्यांच्या प्रणय साधनेचा… कोणाच्या आयुष्यातील उत्तुंग शिखरच… वंश वेल वाढविण्याचा हंगाम…जीवनाच सार्थक…पाऊस पडण्याआधीचा प्रजोत्पादनाचा खरा तो काळ आणि ठराविक झाडावरच त्यांची वस्ती असं वाटतं झाडाला विद्युत रोशणाई केली दिवाळीच्या हंगामात हायवेवरील मोठ्या हॉटेलच्या दारात असणाऱ्या अवाढव्य वडाच्या झाडावर लाईटच्या माळा सोडून करतात अगदी तशी रोशणाई दिसत होती अजूनही डोळ्यासमोर ते काजव्याचे झाड येतं डोळे कसे दीपवून टाकले त्या काजव्यांनी त्यासाठी काळ्या कुट्ट काळोखात रानवाटा काटेकुटे तुडवले पाहिजेत आणि हा निसर्गाचा उत्सव अनुभवला पाहिजे
खरंतर खास काजवा महोत्सवाचं आयोजन त्यानिमित्ताने होत असतं पर्यटनाची संधी चालून येते पण काजव्यांचा एकांत भंग करण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही हेही मनाला कुरतडत असतं माणूस कधीकधी एकांत प्रिय पण उत्साहाच्या भरात तो काजव्यांची एकांतता भंग करीत जातो काळ्या रंगाची चंद्रकला डोळ्यासमोर तरळते…डोळ्यासमोर काजवे चमकले…असा वाक्यप्रचार सुद्धा आहे माणसाला खरंतर प्रकाशाची ओढ आहे अंधारातून प्रकाशाकडे त्याची वाटचाल असते खर तर अंधार कुठेच नसतो असतो तो प्रकाशाचा अभाव आपल्याला भावत जातो
मग ती देवघरातील मंद तेवणारी समई असो…लुकलुकणारी पणती…किंवा आकाशातील चंद्र…आणि चांदणे असो आपण आतून प्रकाशमान होत जातो प्रकाशात अचाट सामर्थ्य असतं त्याच्या ठाई भेदभाव मुळीच नसतो अंधकाराला छेद देणाऱ्या प्रकाशाला कुठलाही धर्म अथवा जात नसते केवळ समानतेच्या भावनेने विश्वाचा चराचर प्रकाशमय होत असतो तेजोवलयं लोहगोल सूर्याला आपण दररोज नमन करतोच ज्योतीने सूर्याची आरती कधी कधी होत असते अगदी तसंच हे अल्पजीवी काजवे मनात घर करत जातात आपल्या प्रत्येकामध्ये काजव्याचे झाड असावं अगदी नाताळच्या सणाला क्रिसमस ट्री सजवतात तसं पण निसर्ग मात्र एक जात काजवा महोत्सव सोहळा साजरा करीत असतो निसर्ग आपल्याला देत जातो त्याची नोंद कुठेही नाही काय दिले त्याचा हिशोब ही ठेवत नाही तर या समाजात काही म्हणजे फक्त अजूनही दोनच काजवे अस्तित्वात आहेत ते म्हणजे आईबाप
कारण त्यांनी स्वतः अंधारात राहून आपल्याला प्रकाशमय केलंय कारण आपण जे आहोत ते त्यामुळेच आपल्यासाठी सगळ्याच बाबतीत आणि हमेशा ऍडजेस्टमेंट करणारा काजवा म्हणजे आपला बाप त्याचं बनियन मळलं असेल त्यांनी उलटं करून घातलं असल स्लीपर चप्पल तुटली असेल बाभळीचा काटा लावून ह्या आठवडे बाजारात न घेता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवडे बाजारात घेतली असेल अन अजून एक मी जिवंत उदाहरण पाहिले बाप ही अशी विभूती आहे मग तो गरीब असो किंवा श्रीमंत मुलगा जराशी वात्रट स्वभावाचा थोडासा वाह्यात वागणारा घरात एक पैशाचा सुद्धा त्याचा आधार नाही का सहकार्य नाही सगळं बाप पुरवतोय याला फिरायला मोटरसायकल…मॉल मधले भारी भारी कपडे…स्पोर्ट शूज…पॉकेट मनी… पण सगळं बाप याचा पुरवतोय घरामधी याचं तसं पाहायला गेलं तर कोणत्याच प्रकारचं आर्थिक सहकार्य नाही पण तशातून पण कधीतरी अवसं पुनवेला एखादी गाय छाप पोरानं बापाच्या अंगावर टाकली तर बाप गावभर भेटल त्याला सांगतोय माझं पोरगं मला काय बी कमी पडू देत नाही असं म्हणतय यालाच बाप असं म्हणतात आणि बाप म्हणजेच माणसातला काजवा…….
**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002

litsbros

Comment here