………… मळदचा जागरण गोंधळ…………….            ( एक अनुभवलेलं देवकार्य )                      ***********

………… मळदचा जागरण गोंधळ…………….

           ( एक अनुभवलेलं देवकार्य )

                     ***********

       एक साधा योगायोग बघा त्यावेळी मी दौंडला रहात होतो लग्न होऊन नुकतेच काही दिवस झालेले होते मोठी मुलगी साधारण दीड दोन वर्षाची असेल माझी मालकीण म्हणजे साधारण पाच भावंडाच रेशन कार्ड म्हणजे बघा माझा थोरला मेव्हणा त्याच्या लग्नाचे जागरण गोंधळ आणि लहानपणीचे जावळ दोन्ही कार्यक्रम त्यांना त्याच्या लग्नानंतर साधारण आठ दहा वर्षांनी करण्याचा योग आला असो काहीतरी तांत्रिक अडचण असेल म्हणा पण जागरण गोंधळ हा विधी साधारण लग्नानंतर 16 दिवसाच्या आत करावा असा नियम.

       आणि हा जागरण गोंधळाचा योग जुळून आला आणि मी धाकटा जावई म्हणून रात्रभर दिवटीवर तेल घालायचा मान मला मिळाला आणि तो कार्यक्रम दौंड जवळ असणाऱ्या मळद या गावी संपन्न झाला त्यावेळी न्यारोगेज रेल्वे होती सासरवाडीचं घर अगदी रेल्वे गेटला लागूनच होतं तसा मी जवळून अविस्मरणीय जागरण गोंधळ सोहळा पाहिलेला आहे साधारण रात्रीचे दीड वाजलेले असावेत अंगणात मुहूर्तमेढ रोवलेली होती छान लहानसा मांडव बांधलेला होता शेजारीत मनगटा एवढ्या जाडजूड उसाचा चौक बांधला होता अनेक प्रकारची फळं…नागवेलीचे पान…सुपारी…यांनी चौक रंगीबेरंगी दिसत होता समोर देवीचे अन खंडोबाचे टाक वगैरे होते

       तिथंच वितभर उंचीची दिवटी आणि पितळी बुधला होता त्या दिवटीचा अन जमिनीत खोचलेल्या मशालीचा उजेड चौकावर पडल्याने तो मोहक दिसत असला तरी भीतीदायक सुद्धा दिसत होता अंगणात एक दोन प्रखर पिवळ्या प्रकाशाचे दिवे सुद्धा लावलेले होते त्याचा काही प्रकाश रात्रभर कार्यक्रमाच्या काही भागावर पडत होता सात-आठ गोंधळाच्या भोवतीला मोठे कडे करून श्रोते बसले होते साडेनऊ दहाची गर्दी एव्हाना कमी झालेली होती लहान मुलांना झोपवायला गेलेल्या आया परतल्या नव्हत्या कामाची पुरुष मंडळी केव्हा झोपायला गेली होती 52 बिराची विद्या ही आख्यान लावलेलं होतं लोककलेची आवड असलेले व घरातील ज्यांना थांबणं आवश्यक आहे अशी मोजकीच तिथे उरली होती काही म्हाताऱ्या बाया बापड्या गोंधळ्याने केलेला विनोद सुद्धा हात जोडून श्रद्धेने ऐकत होत्या चांदव्याची कोर नुकतीच उगवली होती रात्र पहाटेकडं सरकत होती बाहेर थंडी आणि संबंळाची काडी इरेसरीने चढीला लागली होती त्यातच तुणतूण्याची तुण तुण घाईला येऊन भर घालत होती

       आणि समोरच्या दिवटीत बुधलीने तेल घालायचं काम माझ्याकडे असलं तरी त्याचा मला विसर पडला होता त्यात गोंधळी हे पलीकडच्या गावातले म्हणजे शिरसुफळचे असल्यामुळे गाण्याच्या प्रत्येक कडव्यात घरातल्या माणसांचा आवर्जून उल्लेख व्हायचा अगदी मन लावून मी त्या संबळावरच्या समेळ आणि घुमावर फिरणारी आणि दाबून आपटणारी काडी मी मन लावून बघत होतो दोन मांड्यामध्ये दाबून धरलेला आणि पायाचा उजवा पंजा पुढच्या पाच बोटावर उचलून बेभान होऊन वाजवणारा मी पहिल्यांदाच बघत होतो तुणतुण्याच्या घाई सोबत माझ्या कानड्या मल्हारी या ओळीवर नकळत हात वर करून अंग अशी sss जोरदार आरोळी बहुतेकांच्या डोळ्यावरची झोपेची तार उडवायची त्यातच बाया बसलेल्या होत्या त्यांच्या मागून एक धिप्पाड माणूस नशेत असल्यासारखा तोल सावरीत घुमत चौकसमोर आला…येताना त्यांनी एक दोन बायांच्या मांड्यावर पाय दिल्याने त्या बिचाऱ्या कळवळल्या होत्या

       कुणीतरी उठून त्या माणसाने बांधलेल्या लांब केसाचा लहान अंबाडा मोकळा केला त्याच्या कपाळावर हळद-कुंकू लावत आई राजा उदो उदो… खंडोबाच्या नावानं चांगभलं…अशी जोरदार हाळी दिली पण यामध्ये एक आवर्जून सांगावसं वाटतं काय तो संबळ वाजत होता ना त्याची खरंच कमाल… देवाची करणी असते कारण हा ना जातीने गोंधळी… ना घरात संगीताचे वेड.. ना संबळ हे वाद्य आवर्जून शिकावे असे काहीतरी… हे संबळ वाजवतंय कार्ट…त्याचा संबळ ऐकून साक्षात खंडोबा पण तल्लीन होईल त्याची ती कांडी संबंळावरच नाही करत समोरच्याच्या छाताडावर चालते आणि त्यांचं एक विशेष टिमवर्क असतं म्हणजे बघा त्यांच्यातील वक्ता व गायक हे दोन्ही कामं करणारा एक पटाईत असतो… एक तुणतुणं वाजवणारा… एक दोन्ही हातात दोन सुट्टी टाळ पण मागं लाकडाची मूठ म्हणजे मनी पण ती बोटात धरून मान विशिष्ट लकब करून हलवायची… आणि हे मध्येच या किंवा अंगाशी असं म्हणून त्या गायकाला एक स्फूर्ती द्यायची…तिसरा असतो संबळ वाजवणारा…आणि चौथा असतो कोरस देणारा… आणि पाचवी मुरळी…खूप छान टिमवर्क असतं

        आता आपण या मुख्य कार्यक्रमाबद्दल विशेष माहिती घेऊ जागरणाचा शब्दशः अर्थ घेतला तर रात्रभर जागून काढणे किंवा जागरण करणे असा होतो मात्र देवाला जागृत करण्यासाठी जागरण केले जाते प्रत्येक घराण्याला एक कुळधर्म कुलाचार राहतो आणि तो परंपरेप्रमाणे चालत आलेला असतो तर खंडोबारायाच्या कुलचारात कुलधर्माचा उद्धार करण्यासाठी घरातील लग्न…मुंज…घरभरणी… अशा शुभ कार्यप्रसंगी जागरण केले जाते रात्रभर समोरील अंगणात वाघ्या मुरळीच्या साथीने जागरण पार पडते ही देखील महाराष्ट्रातील एक समृद्ध अशी लोककला आहे आणि वाघ्या मुरळी हे त्यातील लोक कलावंत आहेत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जागरण आणि गोंधळ यात साम्य आहे ते आपल्याला त्याच्या मांडणीवरून लक्षात येते. अंगणाच्या मध्यभागी पाट मांडून त्यावर स्वच्छ वस्त्र टाकले जाते… वस्त्रावर अष्टदल काढून धान्याची रास ठेवून… त्यावर कलश आणि नारळ व विड्याच्या पानावर सुपारी… देवाचे टाक… उसाच्या पाच ताटाचे मखर…त्याला हार फुलं आणि भंडारा लावून जागरणाला सुरुवात होते वाघ्या मुरळी नृत्य करून देवाला जागरणाला येण्याचं आवाहन करतात वाघ्याच्या हातात दिमडी तर मुरळीच्या हातात घाटी आणि सोबतीला असलेलं तुणतुणं असतं नंतर पाच पावली…तळी भरणे…कोटम भरणे…घटस्थापना…लंगरतोड…ओझं उतरवणे… आणि तळी भरताना खंडोबाचा जयघोष केला जातो

       गोंधळी लोक जगदंबेचा गोंधळ हे पारंपरिक नाट्य सादर करतात वाघ्या मुरळी प्रमाणेच गोंधळी बांधवांनी सुद्धा लोककलेत आपले विशिष्ट असं स्थान निर्माण केलेलं गोंधळी हे देवीचे तर वाघे हे खंडोबाचे उपासक असतात गोंधळ्याच्या मध्ये रेणूराई व कदमराही या दोन मुख्य पोट जाती रेणूराई हे रेणुका भक्त तर कदमराई हे तुळजापूरच्या भवानीचे भक्त गोंधळामध्ये संबळ तुणतुणे हे असते तर या गोंधळात पण काकड्या आणि संबळ्या असे दोन प्रकारचे गोंधळ तर काकड्या गोंधळ करण्यास सर्वांना मुभा असते पण संबळ्या गोंधळ फक्त गोंधळीच सादर करतात गोंधळ्यांचा खूप मान असतो त्यांच्या गीतामध्ये जोगवा…माळ परडी… पोत…बाण…वारं…यांना विशेष प्राधान्य असतं

       गोंधळ्यांनी अन वाघ्यांनी सर्व देवांना या कार्यक्रमाला बोलावल्यानंतर त्या घराण्याच्या कुलदेवतेसह अन्य मान्यवर देवी देवतांना सुद्धा या कार्यासाठी आमंत्रित केले जाते गोंधळी लोकांचा खडा आवाज विशिष्ट चाली त्या स्तुती स्तवनास दिलेली संबंळाच्या वाद्याची जोड सोबत टाळ घेऊन यांचा साधलेला ठेका त्यामुळे गोंधळ ऐकण्यात एक विशेष आनंद मिळतो गोंधळाची सांगता पोत पाजळवून होती दिवट्या नाचवीत संबळ वाजवीत मोठ्या भक्तीभावाने आरती करून कार्यक्रमाची सांगता केली जाते या गोंधळी बांधवांना पूर्वी राज दरबारी खूप मानाचे स्थान दिले जात असे आज ही समाजात एक मानाचे आणि प्रतिष्ठेचे असे त्यांना स्थान आहे…

………………..***********…………………

किरण बेंद्रे

 पृथ्वी हाइट्स… मांजरी… पुणे

7218439002

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line